प्र. माझ्या एका मित्राने मला विचारले, “वेगवेगळ्या श्रद्धांवर आधारलेले इतके धर्म असताना, कोणती श्रद्धा स्वीकारावी किंवा कोणता धर्म निवडावा, याचा शोध कसा घ्यायचा? योग्य काय हे कसे ओळखायचे?” तो म्हणाला की हे आंधळ्या माणसांच्या आणि हत्तीच्या गोष्टीसारखे आहे. त्यांच्यापैकी कोणालाही हत्तीचे संपूर्ण स्वरूप कळत नाही. मी त्याला काय सांगू?
उ. या प्रश्नाचे उत्तर अगदी गुंतागुंतीच्या तात्त्विक पद्धतीने देता येईल किंवा अगदी सोप्या आणि सरळ भाषेतही देता येईल. मी या दोन्हींच्या मधला मार्ग घेईन.
मला वाटते, तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख करत आहात, त्यात काही आंधळ्या माणसांना हत्ती “पाहायला” नेले जाते. प्रत्येकजण हत्तीच्या वेगवेगळ्या भागाला हात लावून तो कसा आहे हे जाणून घेतो. कोणी सुळ्यांना, कोणी शेपटीला, कोणी कानाला, तर कोणी सोंडेला किंवा अंगाच्या बाजूला हात लावतो. हत्ती कसा आहे याचा प्रत्येकाला वेगळा अनुभव येतो. त्यामुळे प्रत्येकाला हत्तीविषयी केवळ अंशतः समज किंवा ज्ञान मिळते. काहींचे म्हणणे आहे की जगातील निरनिराळ्या धर्मांचेही असेच आहे. प्रत्येक धर्माला सत्याचा थोडासा अंश गवसला आहे, पण कोणत्याही धर्माला संपूर्ण सत्य गवसलेले नाही.
हे उदाहरण जरा पुढे नेऊया. त्या अंध माणसांपैकी एकाचे अंधत्व दूर झाले आणि त्याला दिसू लागले, तर काय होईल? मग त्याला हत्तींच्या सहवासात बरेच दिवस घालवण्याची संधी मिळाली तर? त्याने हत्तींचा अभ्यास केला, त्यांचे निरीक्षण केले आणि त्यांच्याविषयी जितके शिकता येईल तितके शिकून घेतले. मला असे वाटते की आपली कॅथलिक श्रद्धा आपल्याला नेमके हेच देते: दृष्टीचे वरदान!
हे उदाहरण इथे विशेष समर्पक आहे, कारण येशूने अंधांना दृष्टी दिली, हे सर्वश्रुत आहे. येशूच्या या चमत्कारातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यांपैकी एक ही की, सत्याची परिपूर्णता आपल्याला दिसावी म्हणून आपले श्रद्धेचे डोळे उघडण्याची त्याची इच्छा आहे. कॅथलिक म्हणून आपण मानतो की त्या सत्याची परिपूर्णता कॅथलिक चर्चमध्ये आढळते. इतर धर्मांतही सत्याचे काही अंश आढळू शकतात, हे आपण नाकारत नाही. उदाहरणार्थ, आपण इतरांशी दयाळूपणे वागले पाहिजे, हे एक सत्य आहे. पण देवाने जे प्रकट केले आहे, त्याचे सर्वांत परिपूर्ण प्रकटीकरण आपल्याला केवळ कॅथलिक श्रद्धेतच मिळते, असे आपण ठामपणे जाहीर करतो.
खरा प्रश्न असा आहे: “कॅथलिक चर्चमध्ये दैवी प्रकटीकरणाची आणि सत्याची परिपूर्णता एखाद्याला कशी उमगते?” यालाच आपण श्रद्धेचे वरदान म्हणतो!
कधीकधी श्रद्धेचा अर्थ चुकीचा लावला जातो. एखादी गोष्ट खरी मानणे एवढेच म्हणजे श्रद्धा, असे कोणाला वाटू शकते. श्रद्धेचा अर्थ जर एवढाच असेल, तर केवळ खरे मानल्याने परग्रहांवर जीव आहेत अशी “श्रद्धा” आपल्याला ठेवता येईल. किंवा, केवळ खरे मानल्याने उद्या मला लॉटरी लागणार आहे अशी “श्रद्धा” मी ठेवू शकेन. पण ही खरी श्रद्धा नाही. खऱ्या श्रद्धेची सुरुवात देवापासून होते. देव स्वतःची आणि जे काही सत्य आहे त्या सर्वाची आपल्याला ओळख करून देतो, तेव्हा श्रद्धेची सुरुवात होते. तो आपल्या सदसद्विवेकबुद्धीशी अशा रीतीने बोलतो की एखादी गोष्ट खरी आहे याची आपल्याला आध्यात्मिक खात्री पटते. देवाने जे प्रकट केले आहे, त्याला मग आपण संमती द्यायची असते. देव आपल्याला जे सांगतो त्याला आपण संमती देतो, म्हणजेच त्याचा स्वीकार करतो, तेव्हा त्याच क्षणी आपल्याला श्रद्धेचे अलौकिक वरदान मिळते आणि देवाने जे सांगितले आहे ते खरे आहे, याबद्दल आपल्या मनात शंकेची थोडीशीही छाया राहत नाही.
हे कदाचित समजायला कठीण वाटेल, पण मी तुम्हाला एवढेच सांगू शकतो की खरी श्रद्धा आणि देवाचे खरे ज्ञान मिळणे शक्य आहे. देवाने आपल्याला जे काही प्रकट केले आहे, विशेषतः त्याच्या चर्चद्वारे, ते सर्व खरे आहे, याची निःसंशय खात्री होणे शक्य आहे.
तुमच्या मित्राला सत्याचा शोध घ्यायला आणि देवाचा आवाज ऐकण्यासाठी मन खुले ठेवायला सांगा, असे मी सुचवेन. त्याने खरोखरच मन खुले ठेवले, तर देव त्याला हे सत्य प्रकट करील आणि श्रद्धेचे अद्भुत वरदान स्वीकारण्यासाठी त्याला तयार करील, असा मला विश्वास आहे!
