मराठी

अडतिसावा दिवस: पवित्र युखरिस्त

पवित्र गुरुवार

आपल्या परिपूर्ण दैवी ज्ञानामुळे येशूला आपण काय करत आहोत याची नेमकी जाणीव होती. झावळ्यांच्या रविवारी त्याने यरुशलेममध्ये प्रवेश केला, तो संपूर्ण आठवडा तेथे राहिला आणि गुरुवारी पास्काच्या भोजनाची तयारी करण्यासाठी त्याने आपल्या प्रेषितांना पाठवले. त्या रात्री तो आपल्या प्रेषितांना संस्काररूपाने स्वतःला देणार होता, हे त्याला माहीत होते. त्या पहिल्या युखरिस्तानंतर बागेत तो पित्याच्या इच्छेला संमती देणार होता, हेही त्याला माहीत होते. आपली प्रार्थना संपताच आपल्याला अटक होईल, हेही त्याला ठाऊक होते. त्याला सर्व काही दिसत होते, सर्व काही माहीत होते आणि त्या सर्वाला त्याने संमती दिली.

येशूच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याला या पवित्र क्षणाकडे घेऊन आली. या क्षणाची सुरुवात शेवटच्या भोजनाने झाली. ते भोजन एक चिरंतन स्मरणविधी बनले, ज्यात सहभागी होण्याचे आमंत्रण आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. त्याचे पवित्र शरीर व रक्त, आत्मा आणि देवत्व या देणगीतून बळ मिळाल्याने, आपल्या जीवनाच्या प्रत्येक दिवशी त्याच्या व्याकुळतेत आणि पित्याच्या इच्छेला त्याने दिलेल्या संमतीत, तसेच त्याच्याशी झालेल्या विश्वासघातापासून त्याची अटक, दुःखसहन, मरण आणि पुनरुत्थान यांपर्यंत आपल्याला आपल्या प्रभूची सोबत करण्याचे आमंत्रण आहे. ही वाट आपण दररोज चालली पाहिजे. तरीही प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला ज्या अंतिम प्रवासात सहभागी होण्याचे आमंत्रण आहे, त्याचे स्मरण आपण पवित्र गुरुवार, पवित्र शुक्रवार आणि पुनरुत्थानाचा रविवार या पवित्र त्रिदिनात सहभागी होताना विशेष रीतीने करतो.

या सर्वाची सुरुवात पवित्र गुरुवारी होते. जेव्हा आपण मिस्साबलिदानात सहभागी होतो, तेव्हा आपण शेवटच्या भोजनात सहभागी होतो. पवित्र युखरिस्ताची संस्काररूपी देणगी काळाच्या मर्यादा ओलांडून आपल्याला वरच्या माडीवरील खोलीत असलेल्या आपल्या प्रभूच्या वेदीपाशी घेऊन जाते. पवित्र गुरुवार, पवित्र शुक्रवार आणि पुनरुत्थानाचा रविवार या तिन्ही दिवसांत घडलेले एकच अखंड कृत्य म्हणजे ही देणगी. आपण पवित्र युखरिस्तात सहभागी होतो, तेव्हा पवित्र शुक्रवारी त्याने अर्पण केलेल्या बलिदानाचे आणि रविवारी झालेल्या त्याच्या पुनरुत्थानाचे फळ आपल्याला पूर्णपणे लाभते. स्वर्गात आपल्याला देवाचे प्रत्यक्ष आनंदमय दर्शन लाभेल, तेव्हाच हे गहन रहस्य आपल्याला पूर्णपणे उमगेल. त्या क्षणी, पवित्र त्रिदिनात येशूने जे काही केले त्याबद्दल आपण सदैव विस्मयचकित राहू. तोवर प्रार्थनेद्वारे त्या रहस्याचा अधिक खोलवर वेध घेण्याचा आणि देव आपल्या अंतःकरणाशी जे बोलतो ते ऐकण्यासाठी मन खुले ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

युखरिस्ताचे रहस्य तुम्हाला समजते का? पहिल्या युखरिस्ताच्या ग्रहणानंतर आपला प्रभू पेत्र, याकोब आणि योहान यांना सोबत घेऊन गेथसेमनीच्या बागेत गेला. हे तिन्ही प्रेषित आपल्या सर्वांचे प्रतिनिधित्व करतात आणि युखरिस्त ग्रहण केल्यावर आपल्याला कोणते आमंत्रण मिळते, हेही दाखवतात. युखरिस्त आपल्याला बागेत येशूची सोबत करण्याचे आणि आपल्या जीवनात पित्याच्या इच्छेला पूर्ण संमती देण्याचे आमंत्रण देतो. सर्व दुःख प्रेमाने स्वीकारण्याचे, आपल्यावर होणारा अन्याय स्वेच्छेने सोसण्याचे, आपल्याला दिलेला क्रूस उचलून वाहण्याचे, आपल्या प्रभूबरोबर मरण्याचे आणि त्याच्या पुनरुत्थानात सहभागी होण्याचे आमंत्रण तो आपल्याला देतो. परमपवित्र युखरिस्ताकडून बळ मिळाले नाही, तर दुःख स्वीकारणे आपल्याला अशक्य होईल आणि त्या तिन्ही प्रेषितांप्रमाणे आपणही झोपी जाऊ. त्या तिघांना आणि इतर प्रेषितांना (यहूदा वगळता) युखरिस्ताचे पूर्ण फळ नंतरच लाभले. तेव्हाच ते जागरूक राहिले, त्यांनी संमती दिली, ते मरण पावले आणि पुन्हा उठले.

या रात्रीच्या सौंदर्यावर चिंतन करा. आज रात्रीच्या सर्वांत सुंदर भक्तिप्रथांपैकी एक म्हणजे जगभरातील चर्चमध्ये मिस्साबलिदानानंतर मध्यरात्रीपर्यंत चालणारी पवित्र साक्रामेंताची आराधना. या आराधनेत काही वेळ घालवणे तुम्हाला शक्य असेल, तर तसे जरूर करा. आराधना करताना या गोष्टीवर चिंतन करा: केवळ युखरिस्त ग्रहण करणे पुरेसे नाही. उर्वरित पवित्र त्रिदिनात आपल्या प्रभूची सोबत करता यावी, यासाठी युखरिस्त ग्रहणातून मिळणारे बळ आपण स्वीकारले पाहिजे. या वाटेवर दुःख सोसावे लागेल आणि त्याग करावा लागेल, तरी पुनरुत्थानाचा आनंद प्रत्येक त्यागाहून मोठा ठरेल. अशा रीतीने पवित्र गुरुवार आणि पवित्र शुक्रवार आपल्याला कितीतरी महान अशा ध्येयाकडे नेणारे मार्ग ठरतात.

हे युखरिस्तातील माझ्या प्रभू, तुझ्या पुनरुत्थानाच्या गौरवात सहभागी होण्याचे आमंत्रण मला देण्यासाठी, पवित्र गुरुवार आणि पवित्र शुक्रवारच्या तुझ्या परिपूर्ण बलिदानाचे चिरंतन स्मरण तू पवित्र मिस्साबलिदानात स्थापित केलेस. या पवित्र देणगीबद्दल मी मनःपूर्वक तुझे आभार मानतो आणि प्रार्थना करतो की, प्रत्येक वेळी युखरिस्त ग्रहण करताना मला अधिक पूर्णपणे तुझी सोबत करता यावी. मला तुझ्याबरोबर जगता आणि मरता येवो, जेणेकरून शेवटच्या दिवशी मी तुझ्याबरोबर पुन्हा उठेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हेही पाहा: अडतिसावा दिवस: क्रूसाच्या पायथ्याशी ४० दिवस

अनुक्रमणिका

पवित्र आठवडा

प्रायश्चित्तकाळासाठी आणखी साहित्य