मराठी

पुनरुत्थान काळातील सहावा आठवडा

सत्याच्या आत्म्याचे आगमन

पुनरुत्थान काळातील सहावा रविवार (वर्ष अ)

“तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल, तर माझ्या आज्ञा पाळाल. आणि मी पित्याला विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा कैवारी देईल, जो सदैव तुमच्याबरोबर राहील, म्हणजे सत्याचा आत्मा, ज्याचा जग स्वीकार करू शकत नाही…” योहान 14:15–17

आज, पुनरुत्थानकाळातील या सहाव्या रविवारी, आपण पवित्र आत्म्याच्या आगमनाकडे आपले लक्ष वळवू लागतो. वर दिलेल्या उताऱ्यात येशू सांगतो की, आपल्याबरोबर सदैव राहण्यासाठी दुसरा साहाय्यकर्ता पाठवावा, अशी विनंती तो पित्याला करणार आहे. हा साहाय्यकर्ता म्हणजे पवित्र आत्मा.

विशेष म्हणजे, येशू पवित्र आत्म्याला “सत्याचा आत्मा” असे संबोधतो. जग पवित्र आत्म्याचा स्वीकार करू शकत नाही, हेही तो स्पष्ट करतो.

आपण सध्या अशा काळात जगत आहोत, ज्याला “पवित्र आत्म्याचे युग” असे म्हणता येईल. याच युगाविषयी येशूने आपल्या प्रेषितांना सांगितले होते. म्हणून पवित्र आत्म्याचे आगमन येशूने जसे उलगडून सांगितले, तसे ते समजून घेणे योग्य ठरेल.

सर्वप्रथम, “सत्याचा आत्मा” या नावावर चिंतन करताना आपण स्वतःला विचारावे: पवित्र आत्म्याचा स्वीकार केल्यावर आपल्याला जे सत्य लाभते, ते संपूर्णपणे स्वीकारण्याची आपली तयारी आणि क्षमता आहे का? आपण जगाचे होऊन त्यातील लौकिक विचार आणि मूल्ये स्वीकारत असू, तर पवित्र आत्म्याचा स्वीकार आपल्याला करता येणार नाही. पण आपल्या जगातील चुका आणि त्यात रूढ झालेली अनेक चुकीची मूल्ये आपल्याला ओळखता आली, तर ती मूल्ये नाकारून पवित्र आत्म्याचा आणि तो प्रकट करीत असलेल्या अनेक सत्यांचा स्वीकार करणे आपल्याला अधिक सोपे जाईल.

शिवाय, पवित्र आत्म्याच्या आगमनासाठी आपण आपली अंतःकरणे खुली ठेवली, तर जीवनात लाभू शकेल असा सर्वश्रेष्ठ साहाय्यकर्ता आपल्याला लाभेल. पवित्र आत्माच तो साहाय्यकर्ता आहे; म्हणजेच, आपल्याला आवश्यक असलेला तो एकमेव साहाय्यकर्ता आहे. पवित्र आत्म्याने आपले संपूर्ण जीवन व्यापून टाकले, तर जीवनासाठी आवश्यक असलेली प्रत्येक कृपा आपल्याला मिळते.

येशूने आपल्या प्रेषितांना दिलेले वचन पूर्ण झाले आहे आणि त्या वचनाचे फल तुम्हाला इथे आणि आत्ताच तुमच्या जीवनात स्वीकारता येते, यावर आज चिंतन करा. पवित्र आत्म्याला प्रार्थना करा आणि दोन आठवड्यांनी येणारा पेन्टेकॉस्ट रविवार साजरा करण्याची आतुरतेने वाट पाहा.

हे पवित्र आत्म्या, ये. तुझ्या विश्वासू जनांची अंतःकरणे भरून टाक आणि त्यांच्यात तुझ्या प्रेमाचा अग्नी प्रज्वलित कर. तुझा आत्मा पाठव, म्हणजे ते निर्माण होतील आणि तू पृथ्वीचे स्वरूप नवे करशील.

हे देवा, तू पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने विश्वासू जनांच्या अंतःकरणांना बोध केलास. त्याच पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला खरे शहाणपण लाभावे आणि त्याचे सांत्वन आम्हाला सदैव अनुभवता यावे, अशी कृपा कर. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे ही प्रार्थना करतो. आमेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


आपले प्राण अर्पण करणे

पुनरुत्थानकाळातील सहावा रविवार (वर्ष ब)

“आपल्या मित्रांसाठी स्वतःचा जीव देणे, यापेक्षा मोठे प्रेम कोणाचेही नाही.”  योहान 15:13

प्रेम म्हणजे दुसऱ्या व्यक्तीविषयी वाटणारी तीव्र भावना, असे अनेकदा समजले जाते. एखाद्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे खूप आकर्षण वाटले की आपण म्हणतो, ‘माझं तिच्यावर प्रेम आहे.’ पण हे प्रेम आहे का? खऱ्या अर्थाने हे प्रेम आहे का? तसे नाही. प्रेमात भावनांना नक्कीच स्थान असते, पण प्रेम भावनांवर आधारलेले नसते.

मग प्रेम म्हणजे काय? प्रेम ही एक निवड आहे. वर दिलेल्या शुभवर्तमानाच्या उताऱ्यात येशू सांगतो त्याप्रमाणे, प्रेम म्हणजे ‘आपल्या मित्रांसाठी आपला जीव देण्याची’ निवड.

आपला जीव देण्यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. पहिली म्हणजे, प्रेमाचे स्वरूपच असे आहे की आपण स्वतःला पूर्णपणे अर्पण करतो. जीव देणे अर्धवट होऊ शकत नाही. एकतर आपण जीव देतो किंवा देत नाही. यावरून दिसते की प्रेम खऱ्या अर्थाने प्रेम असण्यासाठी त्यात आपले संपूर्ण जीवन, शंभर टक्के, अर्पण करण्याची बांधिलकी असावी लागते.

या उताऱ्यातून हेही स्पष्ट होते की प्रेमासाठी त्याग करावा लागतो. आपला जीव देणे यातून स्पष्ट होते की प्रेम करण्यासाठी एका अर्थाने स्वतःला मरावे लागते. म्हणजेच, आपण आधी दुसऱ्याचा विचार करावा आणि स्वतःच्या गरजांपेक्षा त्याच्या गरजांना प्राधान्य द्यावे. त्यासाठी खरा त्याग आणि निःस्वार्थपणा आवश्यक आहेत.

आपण इतरांसाठी आपले जीवन अनेक प्रकारे देतो. त्यात काही कृती लहान असतात, तर काही मोठ्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक व्यक्तीच्या भल्याची मनापासून काळजी घेण्याची वृत्ती आपण जोपासली पाहिजे. जेव्हा आपण इतरांकडे लक्ष देतो आणि त्यांच्यासाठी आपले हृदय खुले करतो, तेव्हा त्यांच्यासाठी आपले जीवन देण्याचे असंख्य मार्ग आपल्याला दिसू लागतात. दयाळूपणाच्या छोट्या कृती, प्रोत्साहनाचे शब्द, एखाद्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेणे, एखाद्या कामात मदत करणे, अशा कितीतरी छोट्या मार्गांनी आपण दररोज स्वतःला इतरांसाठी देतो. याहून मोठ्या कृती म्हणजे मोठ्या धैर्याने क्षमा करणे, प्रेम करावेसे वाटत नसतानाही प्रेम करणे, एखादी व्यक्ती दयेस पात्र नाही असे वाटत असतानाही तिच्यावर दया करणे, आणि आपल्या धावपळीच्या दिनक्रमात वेळ नसतानाही खास प्रयत्न करून एखाद्याच्या पाठीशी उभे राहणे.

मुद्दा असा आहे की, स्वतःला झळ पोहोचेपर्यंत आपण इतरांसाठी स्वतःला देतो, तेव्हा आपला प्रत्येक लहानमोठा त्याग त्यांच्यासाठी आशीर्वाद ठरतो आणि आपल्यासाठी गौरवशाली प्रतिफळ ठरतो. त्यागमय जीवन अनेक प्रकारे खरे समाधान देते आणि अखेरीस, असे जीवन जगण्यासाठीच आपल्याला निर्माण करण्यात आले आहे.

आज चिंतन करा: स्वतःसाठी काहीही राखून न ठेवता तुम्ही इतरांसाठी आपले जीवन किती उदारपणे अर्पण करता? इतक्या गाढ प्रेमाला स्वतःला वाहून घेण्यास मागेपुढे पाहू नका. स्वतःला पूर्णपणे देऊन टाकण्यातच तुम्हाला स्वतःची खरी ओळख होते आणि आपल्या दैवी प्रभूची उपस्थिती जाणवते.

हे माझ्यासाठी स्वतःचे अर्पण करणाऱ्या प्रभू, इतरांना पहिले स्थान द्यायला मला मदत कर. दुःख सहन करावे लागले तरी प्रेम करत राहायला मला मदत कर. आणि प्रेमापोटी केलेल्या त्या त्यागात तुझ्या दैवी हृदयातील प्रेम मला सापडू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


देवाचे प्रेम

पुनरुत्थानकाळातील सहावा रविवार (वर्ष क)

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जो माझ्यावर प्रेम करतो तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रेम करील, आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याजवळ वस्ती करू.” योहान 14:23

आपल्या प्रभूने तुमच्याकडे यावे आणि तुमच्या आत्म्याच्या गाभाऱ्यात वस्ती करावी, असे तुम्हाला वाटते का? बहुधा तुम्ही सहजच ‘हो’ म्हणाल. हे घडावे यासाठी देवावर प्रेम करा आणि त्याचे वचन पाळा. तुम्ही असे कराल तेव्हा पवित्र त्रैक्य तुमच्यामध्ये येऊन वस्ती करील.

देवाचे आपल्यावरचे प्रेम हे आपण त्याच्यावर प्रेम करतो की नाही यावर अवलंबून असल्यासारखे वाटते, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. म्हणजे आपण आधी देवावर प्रेम केले तरच तो आपल्यावर प्रेम करतो का? खरे तर, आपण देवावर प्रेम केले किंवा नाही केले, तरी तो आपल्यावर परिपूर्ण प्रेम करतो. पण प्रेमाचा स्वीकार होतो आणि त्याला प्रेमानेच प्रतिसाद मिळतो, तेव्हा त्या प्रेमाला एक नवेच रूप येते. म्हणून देवावर प्रेम करण्याचे आपण निवडतो, तेव्हा आपल्याला अचानक उमगते की आपल्या प्रेमामुळे त्याच्यासाठी दार उघडते. तो आपल्यामध्ये येऊन वस्ती करतो, आपले रूपांतर करतो आणि आपल्या हृदयाला आपले पवित्र मंदिर बनवतो. किती अद्भुत देणगी!

देवावर प्रेम करणे म्हणजे, इतर गोष्टींबरोबरच, त्याच्या आज्ञेत राहणेही होय, हे लक्षात घेण्यासारखे आहे. देवाचा स्वभावच तसा आहे. तो स्वतः प्रेम आहे; म्हणून त्याच्यावर प्रेम करणे म्हणजे आपली इच्छा त्याच्या इच्छेला पूर्णपणे समर्पित करणे. प्रत्येक बाबतीत त्याच्या आज्ञेत पूर्णपणे राहणे हा त्याच्यावर प्रेम करण्याचा प्रभावी मार्ग आहे. अशा आज्ञापालनाने तुम्ही त्याला तुमच्यामध्ये वस्ती करू देता आणि तुमच्या इच्छेची सूत्रे त्याच्या हाती सोपवता. तेव्हाच तुम्ही आपल्या संपूर्ण अस्तित्वाने त्याच्यावर अधिक परिपूर्णपणे प्रेम करू शकता.

परमपवित्र त्रैक्याने तुमच्या आत्म्यात येऊन वस्ती करावी, अशी जी तुमची इच्छा आहे, तिच्यावर आज विशेष चिंतन करा. हेच आपल्या जीवनाचे सर्वांत महत्त्वाचे ध्येय असावे. देव आपल्यामध्ये वस्ती करीत असेल, तर जीवनातील बाकीच्या सर्व गोष्टी योग्य मार्गी लागतील. सर्व गोष्टी भल्यासाठी घडतील आणि आपल्यामध्ये व आपल्याद्वारे देवाचा गौरव होईल. आज त्याच्या आज्ञेत राहून त्याच्यावर प्रेम करण्याची निवड करा; मग त्याच्याशी असलेले तुमचे प्रेमाचे नाते झपाट्याने दृढ होईल.

हे परमपवित्र त्रैक्या, माझे तुझ्यावर खरोखर प्रेम आहे आणि आज तुझ्यावर अधिक परिपूर्ण रीतीने प्रेम करण्याची माझी इच्छा आहे. सर्व बाबतींत तुझ्या परिपूर्ण इच्छेला शरण जायला मला मदत कर. सदैव पूर्ण आज्ञाधारकपणे वागायला मला मदत कर. अशा प्रेमाने मी तुझ्या इच्छेला शरण जात असताना, ये आणि माझ्या ठायी वस्ती कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


येशू आपल्याला तयार करतो

पुनरुत्थानकाळातील सहाव्या आठवड्याचा सोमवार

“ते तुम्हाला सभास्थानांतून हाकलून देतील. इतकेच नव्हे, तर अशी वेळ येत आहे की जो कोणी तुम्हाला ठार मारील, त्याला वाटेल की आपण देवाची उपासना करत आहोत. ते असे करतील, कारण त्यांनी पित्यालाही ओळखले नाही आणि मलाही ओळखले नाही. त्यांची वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला हे सांगितले होते, याची तुम्हाला आठवण व्हावी म्हणून मी हे तुम्हाला सांगितले आहे.” योहान 16:2–4

आपल्याला सभास्थानांतून हाकलून दिले जाईल आणि ठारही मारले जाईल, असे येशू सांगत असताना बहुधा शिष्यांनी ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिले असावे. त्या शब्दांनी ते थोडे अस्वस्थ झाले असतीलही, पण बहुधा त्यांनी त्याची फारशी चिंता न करता लवकरच तो विषय सोडून दिला असावा. पण म्हणूनच येशू म्हणाला, “त्यांची वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला हे सांगितले होते, याची तुम्हाला आठवण व्हावी म्हणून मी हे तुम्हाला सांगितले आहे.” आणि शास्त्री व परुशी यांनी शिष्यांचा छळ केला, तेव्हा त्यांना येशूच्या या शब्दांची नक्कीच आठवण झाली असेल.

आपल्याच धर्मनेत्यांकडून असा छळ सहन करणे हा त्यांच्यासाठी जड क्रूस ठरला असणार. ज्यांनी त्यांना देवाकडे नेणे अपेक्षित होते, तेच त्यांच्या जीवनात उलथापालथ घडवत होते. अशा वेळी निराश होण्याचा आणि श्रद्धा गमावण्याचा मोह त्यांना झाला असावा. पण ही कठीण परीक्षा येणार आहे हे येशूला आधीच माहीत होते, म्हणून त्याने त्यांना त्याची पूर्वसूचना दिली.

पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे येशूने काय सांगितले नाही. प्रतिकार करा, दंगल घडवा, क्रांती उभारा, असे काहीही त्याने त्यांना सांगितले नाही. उलट, या विधानाचा संदर्भ पाहिला तर येशू त्यांना सांगतो की पवित्र आत्मा सर्व गोष्टींची काळजी घेईल, त्यांना मार्ग दाखवील आणि येशूची साक्ष देण्यास समर्थ करील. येशूची साक्ष देणे म्हणजे त्याचे साक्षीदार होणे. आणि येशूचे साक्षीदार होणे म्हणजे त्याच्यासाठी रक्तसाक्षी होणे. अशा रीतीने, धार्मिक नेत्यांकडून होणाऱ्या छळाचा जड क्रूस वाहण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांना तयार केले. त्याची साक्ष देण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना बळ देईल, हे त्याने त्यांना सांगितले. आणि हे घडू लागले, तेव्हा येशूने सांगितलेले सर्व काही शिष्यांना आठवू लागले.

ख्रिस्ती असणे म्हणजे छळालाही सामोरे जावे लागणे, हे तुम्हीही लक्षात घेतले पाहिजे. आजच्या जगात ख्रिस्ती लोकांवरील विविध दहशतवादी हल्ल्यांतून आपल्याला हा छळ दिसतो. काहींना तो कधीकधी ‘घरगुती चर्च’ म्हणजेच कुटुंबातही अनुभवावा लागतो. आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांची थट्टा होते आणि त्यांना कठोर वागणूक मिळते. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे, भांडणे, राग, मतभेद आणि एकमेकांना दोषी ठरवणे यातून खुद्द चर्चमध्येही असा छळ दिसून येतो.

या सगळ्यात पवित्र आत्मा सर्वांत महत्त्वाचा आहे. आज आपल्या जगात पवित्र आत्म्याची भूमिका फार महत्त्वाची आहे. ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी तो आपल्याला बळ देतो, जेणेकरून दुष्टाने कसाही हल्ला केला तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकू. म्हणून कोणत्याही प्रकारच्या छळाचा दबाव तुम्हाला जाणवत असेल, तर लक्षात ठेवा की येशूने हे शब्द केवळ आपल्या पहिल्या शिष्यांसाठी नव्हे, तर तुमच्यासाठीही उच्चारले.

आज तुमच्या जीवनात कोणकोणत्या प्रकारे छळ अनुभवावा लागतो, यावर चिंतन करा. पवित्र आत्म्याच्या वर्षावाने हा अनुभव प्रभूमध्ये आशा ठेवण्याची आणि त्याच्यावर भरवसा ठेवण्याची संधी बनू द्या. तुम्ही त्याच्यावर भरवसा ठेवलात, तर तो तुमची साथ कधीही सोडणार नाही.

हे प्रभू, जगाचे किंवा छळाचे ओझे मला जाणवते तेव्हा माझ्या मनाला आणि अंतःकरणाला शांती दे. मला पवित्र आत्म्याद्वारे बळ दे, म्हणजे मी आनंदाने तुझी साक्ष देऊ शकेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


हे पवित्र आत्म्या, ये!

पास्काच्या सहाव्या आठवड्यातील मंगळवार

“पण मी तुम्हाला खरे सांगतो, मी जाणे तुमच्या हिताचे आहे. कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. पण मी गेलो, तर त्याला तुमच्याकडे पाठवीन.” योहान 16:7

प्रेषितांच्या मनात परस्परविरोधी भावना होत्या. त्यांची अंतःकरणे दुःखाने भरली होती, तरीही येशूने त्यांना जे सांगितले त्यावर भरवसा ठेवण्याचा ते प्रयत्न करत होते. आपण आपल्या पित्याकडे वर जात आहोत आणि आपले जाणे त्यांच्यासाठी अधिक चांगले आहे, असे येशूने त्यांना सांगितले. का? कारण तो गेला तर तो त्यांच्याकडे पवित्र आत्म्याला पाठवील.

मानवी दृष्टीने पाहिले तर येशूबरोबरचा रोजचा सहवास संपणार आहे, हे स्वीकारणे प्रेषितांना फार कठीण गेले असेल. येशूला स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येत नाही, त्याला स्पर्श करता येत नाही, त्याचा आवाज ऐकू येत नाही, याची उणीव त्यांना नक्कीच भासली असेल. पण आपण जात असलो तरी सदैव त्यांच्याबरोबर राहू, हे येशूने स्पष्ट केले. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, धैर्य देण्यासाठी आणि संपूर्ण सत्य शिकवण्यासाठी तो त्यांच्यावर पवित्र आत्मा पाठवणार होता. यापुढे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांच्याद्वारे येशू जगात उपस्थित राहणार होता.

प्रेषितांनी येशूला जसे पाहिले, तसे त्याला पाहण्याचे सौभाग्य आपल्याला लाभले नाही. पण येशू सदैव आपल्याबरोबर असण्याचे तेच सौभाग्य आपल्यालाही लाभले आहे. आणि पवित्र आत्म्याला त्याच्या पूर्णतेत स्वीकारण्याचे तेच सौभाग्यही आपल्याला लाभले आहे. ही चांगली गोष्ट आहे. खरोखरच फार चांगली गोष्ट आहे. पण या देणगीकडे आपले अनेकदा दुर्लक्ष होते. आपण दृढीकरणाचा संस्कार स्वीकारला असेल, तरीही पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात प्रवेश करू देण्यात आणि आपले जीवन बदलू देण्यात आपण कमी पडत असू.

दोन आठवड्यांपेक्षाही कमी काळात आपण पेन्टेकॉस्टचा महोत्सव साजरा करू. येशूच्या या वचनाची पूर्तता झाल्याचा हा वार्षिक उत्सव आहे. पवित्र आत्मा आला आहे आणि आता आपण पवित्र आत्म्याच्या युगात आहोत, याचे स्मरण आपण त्या दिवशी करतो.

आज आणि येत्या दोन आठवड्यांत पवित्र आत्म्याविषयी चिंतन करा. पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनात अधिक जिवंतपणे कार्य करू देण्याची गरज असेल, तर ती नम्रपणे स्वतःशी कबूल करा. तुम्ही पवित्र आत्म्याला त्याच्या पूर्णतेत स्वीकारावे, अशी येशूची इच्छा आहे, यावर विश्वास ठेवा. आणि पवित्र आत्म्याशी हे ऐक्य घडू देण्यास भिऊ नका.

हे पवित्र आत्म्या, कृपया माझ्याकडे ये. माझ्या जीवनातील तुझ्या उपस्थितीची ज्योत प्रज्वलित करण्यास मला मदत कर. येशूने ज्याचे वचन दिले, त्या तुला तुझ्या पूर्णतेत स्वीकारण्याची कृपा मला लाभो. हे पवित्र आत्म्या, हे दैवी येशू, हे दयाळू पित्या, माझा तुमच्यावर विश्वास आहे.


सत्याचा आत्मा

पास्काच्या सहाव्या आठवड्यातील बुधवार

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मला अजून तुम्हाला पुष्कळ काही सांगायचे आहे, पण ते आता तुम्हाला झेपणार नाही. पण जेव्हा तो, सत्याचा आत्मा, येईल, तेव्हा तो तुम्हाला संपूर्ण सत्याकडे नेईल.” योहान 16:12–13

पेन्टेकॉस्टचा अद्भुत महोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतसे आपण पवित्र आत्म्यावर आपले लक्ष केंद्रित करत राहतो. या उताऱ्यात पवित्र आत्म्याचा खास उल्लेख “सत्याचा आत्मा” असा केला आहे.

येशू पवित्र आत्म्याची ओळख या नावाने करून देतात, हे लक्षवेधी आहे. ते सांगतात की त्यांना शिष्यांना अजून पुष्कळ काही सांगायचे आहे, पण ते आता त्यांना पेलणार नाही. दुसऱ्या शब्दांत, पवित्र आत्मा त्यांच्यात जिवंतपणे वावरत नसेल आणि त्यांना शिकवत नसेल, तर हे ‘सत्य’ त्यांना पेलणार नाही. यातून चिंतन करण्यासारख्या दोन सुंदर गोष्टी आपल्याला उमगतात.

पहिली गोष्ट अशी की, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला आणि उपस्थितीला आपण आपल्या जीवनात खरोखर वाव दिला नसेल, तर सत्य आपल्याला पेलणार नाही, हे निश्चित. पवित्र आत्मा आपल्यामध्ये जिवंतपणे वावरत नसेल, तर देवाची गहन सत्ये आपल्याला समजू शकत नाहीत आणि त्यांवर आपण विश्वासही ठेवू शकत नाही. हा विचार भयावह आहे: पवित्र आत्म्याने एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन व्यापले नसेल, तर सत्याच्या बाबतीत ती पूर्णपणे अंधारात राहते. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे आपण अंधारात आहोत, हेही त्या व्यक्तीला कळत नाही!

जर हे तुम्हाला उमगत नसेल, तर कदाचित तुमच्याही जीवनात सत्याच्या आत्म्याची उपस्थिती काहीशी कमी पडत असेल. का? कारण जेव्हा सत्याचा आत्मा तुमच्या अंतःकरणात जिवंत असतो, तेव्हा तुम्हाला सत्य खरोखर उमगले आहे, याची तुम्हाला खात्री असते.

दुसरे म्हणजे, जेव्हा तुम्ही आपले मन आणि अंतःकरण पवित्र आत्म्यासाठी पूर्णपणे खुले कराल, तेव्हा तुम्हाला सत्याची भूक लागेल. पवित्र आत्मा “तुम्हाला संपूर्ण सत्याकडे नेईल.” आणि या मार्गदर्शनाचा एक परिणाम असा असेल की हा प्रवास तुम्हाला थक्क करून सोडेल. अनेक गोष्टींचा अर्थ तुमच्या मनात उलगडत जाईल आणि ते पाहून तुम्ही विस्मयचकित व्हाल. तुम्हाला गोष्टी नव्या रीतीने समजू लागतील. पवित्र आत्मा हा परिपूर्ण “मार्गदर्शक” आहे आणि सत्याकडे जाणारा हा प्रवास गौरवशाली आहे.

स्वर्गातील पित्याच्या मनात असलेल्या सत्यावर आज चिंतन करा. सत्य स्वीकारण्यास तुम्ही कितपत तयार आहात? देव तुम्हाला जे काही प्रकट करू इच्छितो, ते तुम्ही किती पूर्णपणे स्वीकारता? पवित्र आत्म्यासाठी स्वतःला अधिक पूर्णपणे खुले करा आणि तो तुम्हाला जे काही प्रकट करू इच्छितो, त्याचा शोध घ्या.

हे पवित्र आत्म्या, ये आणि माझे संपूर्ण जीवन व्यापून टाक. मला शिकव आणि संपूर्ण सत्याकडे ने. हे पवित्र आत्म्या, हे दैवी प्रभू, हे दयाळू पित्या, माझा तुमच्यावर विश्वास आहे.


दुःखाचे आनंदात रूपांतर

पास्काकाळातील सहाव्या आठवड्याचा गुरुवार (प्रभूच्या स्वर्गारोहणाचा महोत्सव रविवारी साजरा करण्यासाठी हलवला असल्यास)

“आमेन, आमेन, मी तुम्हाला सांगतो: जग आनंद करील, तेव्हा तुम्ही रडाल आणि शोक कराल; तुम्ही दुःखी व्हाल, पण तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर होईल.” योहान 16:20

दुःख, शोक आणि अश्रू ढाळणे हेदेखील जीवनाचा भाग आहेत. लहान मुले अगदी किरकोळ अडचण आली तरी अनेकदा रडतात; पण आपल्या सर्वांनाच आयुष्यभर दुःखाला आणि शोकाला सामोरे जावे लागते.

वरील उताऱ्यात येशू आपल्या प्रेषितांना सांगतात की दुःख आणि शोक त्यांच्या जीवनाचा भाग असतील. आपल्या प्रभूचे हे विधान गंभीर आहे, पण ते वास्तवाला धरून आहे. पुढे कोणत्या संकटांना सामोरे जावे लागेल, हे प्रेषितांना आधीच स्पष्टपणे सांगण्यात त्यांचे प्रेम दिसून येते.

आनंदाची बातमी अशी की, हे सांगितल्यावर लगेच येशू त्यांना आशा देतात: ‘तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर होईल.’ येशूंच्या बोलण्यातला हाच सर्वांत महत्त्वाचा भाग आहे.

आपल्याही जीवनात हेच खरे आहे. आपले जीवन संकटे आणि वेदना यांपासून मुक्त असेल, असे वचन येशू आपल्याला देत नाहीत. त्यांच्या मागे गेल्याने आयुष्यातले सगळे काही सोपे होईल, असेही ते सांगत नाहीत. उलट, आपण त्यांचे अनुसरण करायचे ठरवले, तर त्यांनी ज्या वाटेवर पाऊल टाकले त्याच वाटेने आपल्यालाही जावे लागेल, हे त्यांना आपल्याला समजावे असे वाटते. त्यांनी दुःख सोसले, त्यांना वाईट वागणूक मिळाली आणि शेवटी त्यांना ठार मारण्यात आले. पण ते मृतांतून उठले, स्वर्गात आरोहण केले आणि आधीच्या सर्व दुःखांचे व वेदनांचे रूपांतर जगाच्या तारणाच्या साधनात केले. असे झाले नसते, तर ती एक शोकांतिका ठरली असती.

आपण त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत असू, तर आपल्या जीवनातील अगदी लहानसे दुःखही अनेकांसाठी कृपेचे साधन ठरू शकते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. जीवनातील संकटांना आपण श्रद्धेने आणि आशेने सामोरे गेलो, तर अखेरीस कोणतेही संकट आपल्याला खचवू शकणार नाही. प्रत्येक गोष्ट देवाच्या गौरवासाठी उपयोगी पडू शकेल आणि त्यातून मोठा आनंद मिळेल.

येशूंच्या या शब्दांवर आज चिंतन करा. हे शब्द त्यांनी केवळ आपल्या प्रेषितांनाच नव्हे, तर तुम्हालाही उद्देशून म्हटले, हे लक्षात ठेवा. आयुष्यात एखादी अडचण आली, तर त्यामुळे धक्का बसू देऊ नका किंवा तुमची श्रद्धा डळमळू देऊ नका. दुःखाला सामोरे जावे लागले, तर आशा सोडू नका. सर्व काही आपल्या प्रभूच्या हाती सोपवा आणि शेवटी जो आनंद देण्याचे वचन त्यांनी दिले आहे, त्या आनंदात या सर्वांचे रूपांतर त्यांना करू द्या.

हे सर्व आशेच्या प्रभू, माझ्या जीवनातील सर्व दुःख मी तुला समर्पित करतो. माझा शोक, माझ्या अडचणी, माझ्या वेदना आणि माझा गोंधळ मी तुझ्या हाती सोपवतो. तू सर्वशक्तिमान आहेस आणि सर्व गोष्टींचे रूपांतर तुझ्या गौरवाच्या साधनांत करावे, अशी तुझी इच्छा आहे, यावर माझा विश्वास आहे. निराशेच्या वेळी मला आशा दे आणि जीवन कठीण होते तेव्हा तुझ्यावर भरवसा ठेवण्याची कृपा दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


(जगभरातील अनेक धर्मप्रांतांत प्रभूच्या स्वर्गारोहणाचा सण येत्या रविवारी साजरा केला जातो.)

आपल्या प्रभूची अखंड उपस्थिती

प्रभूच्या स्वर्गारोहणाचा महोत्सव

मग त्यांच्याशी बोलल्यानंतर प्रभू येशूला स्वर्गात वर घेण्यात आले आणि तो देवाच्या उजवीकडे आसनस्थ झाला. पण ते बाहेर पडले आणि त्यांनी सर्वत्र उपदेश केला. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता आणि त्यांच्या उपदेशाबरोबर घडणाऱ्या चिन्हांद्वारे त्या वचनाला पुष्टी देत होता. मार्क 16:19–20 (वर्ष ब मधून)

येशू पृथ्वीवरील आपले कार्य पूर्ण करतो आणि आपल्या गौरवशाली सिंहासनावर सदासर्वकाळ विराजमान होण्यासाठी स्वर्गात आरोहण करतो. पण खरोखरच तो आपले कार्य पूर्ण करतो का? याचे उत्तर ‘हो’ही आहे आणि ‘नाही’ही. हो, तो आपल्या गौरवशाली सिंहासनावर विराजमान होतो; पण नाही, पृथ्वीवरील त्याचे कार्य संपत नाही. स्वर्गारोहण हा शेवटही आहे आणि आरंभही. पित्याच्या परिपूर्ण योजनेतील हा पुढच्या टप्प्याकडे जाण्याचा क्षण आहे. ही योजना कशी उलगडत जाते, हे समजले की आपण आश्चर्यचकित आणि विस्मयचकित व्हायला हवे.

प्रेषित काहीसे घाबरलेले आणि गोंधळलेले असावेत. येशू त्यांच्याबरोबर होता. मग तो मरण पावला, पुन्हा उठला, अनेकदा त्यांना दर्शन दिले आणि नंतर त्यांच्या डोळ्यांदेखत स्वर्गात पित्याकडे गेला. पण आपले जाणे चांगले आहे, असेही त्याने त्यांना सांगितले होते. खरे तर, आपण जाणेच अधिक हिताचे आहे, असे तो म्हणाला होता. त्यामुळे ते गोंधळले असणार. त्यांना संपूर्ण सत्याकडे नेण्यासाठी त्याचा कैवारी येईल, असेही येशूने त्यांना सांगितले होते. अशा रीतीने प्रेषितांनी आधी आनंद, मग भीती, नंतर दिलासा आणि पुन्हा अधिक आनंद, त्यानंतर गोंधळ आणि दुःख, आणि शेवटी उत्सुकता आणि अनिश्चितता अनुभवली.

हे ओळखीचे वाटते का? काहींना आपले जीवनही असेच वाटत असेल. चढ-उतार, अनपेक्षित वळणे, सुख-दुःख. प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवे, काहीतरी आव्हानात्मक, काहीतरी गौरवशाली किंवा काहीतरी दुःखद आपल्यासमोर येते. आनंदाची बातमी ही आहे की पित्याची योजना अगदी सुरळीतपणे उलगडत आहे.

या महापर्वात आपण देवाच्या परिपूर्ण योजनेच्या अशा टप्प्यावर येतो, जिथे येशू देवाचे राज्य स्थापन करण्याच्या आपल्या कार्याचे संचालन स्वर्गातून करू लागतो. एका अर्थाने, आपल्या जीवनाची सूत्रे त्याच्या सिंहासनावरून हलतात. या क्षणापासून येशू स्वर्गातून आपल्या जीवनात सतत उतरू लागतो. तो प्रेषितांच्या जीवनात आणि त्यांच्याद्वारे, तसेच आपल्या सर्वांच्या जीवनात आणि आपल्याद्वारे, आपले कार्य पूर्ण करतो. स्वर्गारोहणाचा अर्थ येशू आपल्याला सोडून गेला असा नाही; उलट, जो कोणी त्याच्याकडे वळतो आणि त्याच्या कार्यासाठी आपले जीवन समर्पित करतो, त्या प्रत्येकाजवळ येशू आता उपस्थित असतो. स्वर्गातून येशू सर्वांजवळ उपस्थित राहू शकतो. तो आपल्यामध्ये वास करू शकतो आणि आपल्यालाही त्याच्यामध्ये वास करण्याचे आमंत्रण देतो. ही ख्रिस्तसभेची नवी सुरुवात आहे. आता प्रेषितांना फक्त पवित्र आत्म्याच्या अवतरणाची वाट पाहायची आहे.

आज आपल्या जीवनातील प्रभूच्या अखंड आणि जिव्हाळ्याच्या उपस्थितीवर चिंतन करा. येशू तुम्हाला त्याच्या कार्यात सहभागी होण्याचे आमंत्रण देतो, हे लक्षात ठेवा. आपल्या गौरवशाली सिंहासनावरून आपण ‘सर्वत्र उपदेश करावा’, अशी त्याची इच्छा आहे. आपापली भूमिका पार पाडण्यासाठी तो आपल्यापैकी प्रत्येकाला आमंत्रण देऊ इच्छितो. पित्याच्या योजनेत आपल्यापैकी प्रत्येकावर सोपवलेली जबाबदारी दुसऱ्या कोणावरही सोपवलेली नाही. त्या योजनेत आपल्या सर्वांचा वाटा आहे. तुमचा वाटा कोणता? येशू तुमच्याद्वारे आपल्या कार्याला कशी दिशा देतो? आज या प्रश्नावर मनन करा. त्याची परिपूर्ण योजना गौरवाने उलगडत असताना, त्यात तुमच्यावर सोपवलेल्या भूमिकेला तुम्ही ‘हो’ म्हणता, तेव्हा तो तुमच्यासोबत असतो, हे जाणून घ्या.

हे स्वर्गारोहण केलेल्या माझ्या प्रभू, माझ्या जीवनात कितीतरी चढ-उतार आणि वळणे आहेत, हे मला जाणवते. त्यात सुखदुःखे आहेत, संभ्रमाचे क्षण आहेत, तसेच सारे स्पष्ट होण्याचेही क्षण आहेत. प्रत्येक परिस्थितीत तुझ्या योजनेला सतत “होय” म्हणण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


शुभवर्तमानाची साक्ष देणे

आपल्या प्रभूचे स्वर्गारोहण (वर्ष क)

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “असे लिहिले आहे की ख्रिस्त दुःख सोसेल आणि तिसऱ्या दिवशी मृतांतून उठेल; आणि यरुशलेमपासून सुरुवात करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाचा संदेश दिला जाईल. तुम्ही या गोष्टींचे साक्षीदार आहात. पाहा, माझ्या पित्याने ज्याचे अभिवचन दिले आहे ते मी तुमच्यावर पाठवत आहे; पण वरून येणाऱ्या सामर्थ्याने तुम्ही परिधान केले जाईपर्यंत शहरातच थांबा.” लूक 24:46–49

आणि अशा रीतीने येशूचे पृथ्वीवरील कार्य पूर्ण झाले आणि त्याने स्वर्गारोहण केले. पण खरोखरच त्याचे कार्य पूर्ण झाले होते का? होय, पण एवढ्याच अर्थाने की मृत्यूचा नाश करून नवे जीवन देऊ करण्याचे आपल्या प्रभूचे कार्य त्याच्या जीवनाने, मृत्यूने आणि पुनरुत्थानाने सिद्धीस गेले होते. आता मानवी स्वभावाला कृपेच्या नव्या जीवनात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले होते.

प्रार्थनेत अशी कल्पना करा की तुम्ही स्वर्गारोहणाच्या डोंगरावर आपल्या प्रभूबरोबर उभे आहात. त्याच्याकडे पाहत असताना, त्याच्या संपूर्ण सार्वजनिक सेवाकार्यातही तुम्ही त्याच्यासोबत होता, अशी कल्पना करा. त्याचे अनेक चमत्कार, त्याने अत्यंत कठोर अंतःकरणांचेही केलेले परिवर्तन, तो ज्या अधिकाराने बोलत असे, त्याला झालेली अटक, त्याचा छळ, त्याचा मृत्यू आणि त्यानंतर त्याचे पुनरुत्थान या साऱ्यांचे तुम्ही साक्षीदार आहात, असे मनात आणा. त्याचे एकेकाळी छेदलेले हात आणि पाय पाहा; त्या जखमांतून आता गौरवाचे तेज झळकत आहे, अशी कल्पना करा. आपल्या प्रभूला अशा रीतीने पाहताना, तो तुमच्याकडे प्रेमाने पाहून तुम्हाला सांगत आहे, अशी कल्पना करा: त्याची साक्ष देण्यासाठी आणि तुम्ही जे काही पाहिले व अनुभवले त्याची साक्ष देण्यासाठी जगात पाठवायला त्याने तुमची निवड केली आहे. तुम्हाला पुढे जायचे आहे आणि तुमच्या भेटीस येणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या जीवनाची, मृत्यूची आणि पुनरुत्थानाची सुवार्ता सांगायची आहे.

पहिली गोष्ट म्हणजे, आपल्या प्रभूने खरोखरच आपले संपूर्ण जीवन तुमच्यासमोर उलगडले आहे. शुभवर्तमान ग्रंथ वाचताना येशूने जे काही केले आणि सिद्धीस नेले, त्याचे तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार होता. त्याचे वचन जिवंत आहे आणि त्याच्या पहिल्या अनुयायांना जशी त्याची स्वतःची ओळख त्यातून झाली, तशीच ती तुम्हालाही होते. दुसरी गोष्ट म्हणजे, येशू खरोखरच तुम्हाला पुढे जाऊन ही जिवंत सुवार्ता जगाला सांगण्यास बोलावतो. म्हणून तुम्ही हे कसे करू शकता, यावर मनन करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष कशी देऊ शकता? तुम्ही लोकांचे जीवन कसे बदलू शकता? स्वतः येशूचे कार्य तुम्ही कसे पुढे नेऊ शकता?

स्वर्गारोहणाच्या डोंगरावर आपल्या प्रभूने शिष्यांना दिलेले अभिवचन तुम्हालाही दिले आहे. “वरून येणाऱ्या सामर्थ्याने” तुम्हाला परिधान करण्यासाठी तो तुमच्यावर पवित्र आत्मा पाठवण्याचे अभिवचन देतो. ते सामर्थ्य स्वीकारून त्याचा पूर्ण उपयोग केलात, तरच आपल्या प्रभूने तुमच्यावर सोपवलेले कार्य तुम्ही पार पाडू शकाल. म्हणून तुम्ही पवित्र आत्म्याच्या स्वागतासाठी आपले अंतःकरण खुले कराल का आणि ख्रिस्ताचे कार्य पुढे नेण्यासाठी स्वतःला वाहून घ्याल का?

येशूकडून आपल्याला मिळालेले कार्य आपण पूर्णपणे समजून घेतले, तर आपल्या अंतःकरणात पवित्र भय दाटून येईल. पण देव आपल्याकडून काय अपेक्षा करतो याची जाणीव झाली की अनेकदा त्याऐवजी अपवित्र भीती आपल्याला ग्रासते. इतरांना सुवार्ता सांगणे, आपला विश्वास त्यांच्याशी वाटून घेणे, आपल्या कृतींनी सत्याची साक्ष देणे, आपल्या शत्रूंवर प्रेम करणे आणि केवळ सुवार्तेसाठी जगणे, या साऱ्याचा विचार केला की हे आपल्या आवाक्याबाहेरचे वाटू शकते. तुमच्याही बाबतीत असे होत असेल, तर हे लक्षात ठेवा: ही अपवित्र भीती दूर होऊ शकते आणि तिची जागा पवित्र भयाचे वरदान घेऊ शकते. पवित्र भय हे पवित्र आत्म्याचे वरदान आहे. देवाचा आणि त्याने आपल्यावर सोपवलेल्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेताना, त्या दोन्हींची महानता जाणण्यास हे वरदान आपल्याला प्रेरणा देते. ते आपल्याला प्रेरित करते, धीर देते आणि आपले अंतःकरण विस्मयाने व आदराने भरून टाकते. त्यातूनच पवित्र आत्म्याचे हे वरदान आणि त्याची इतर सर्व वरदाने आपल्याला ख्रिस्ताचे कधीही न संपणारे कार्य पार पाडण्यास समर्थ करतात.

देवाने खास तुमच्यावर सोपवलेल्या कार्याचे आज चिंतन करा. स्वर्गारोहणाच्या डोंगरावर उभा राहून तुमच्याकडे पाहणाऱ्या येशूकडे प्रार्थनापूर्वक पाहा. तो तुमच्याकडे पाहत असताना, तो स्वतः कोण आहे हे तर त्याला तुम्हाला उलगडून दाखवू द्याच; पण पृथ्वीच्या टोकापर्यंत शुभवर्तमान पोहोचवण्याचे जे कार्य तो आजही करत आहे, त्यात तुमचा नेमका वाटा कोणता आहे, हेही त्याला दाखवू द्या. हे कार्य धैर्याने, आनंदाने आणि पवित्र भयाने स्वीकारा. त्याचा आदर करा, त्याचा गोडवा अनुभवा, त्यावर मनन करा आणि ते आपलेसे करा. पृथ्वीवरील आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत ख्रिस्ताचे साक्षीदार होण्याचा संकल्प करा आणि अशा रीतीने त्याच्या जीवनातील या गौरवशाली सहभागासाठी स्वतःला समर्पित करा.

हे माझ्या स्वर्गारूढ प्रभू, तू शरीर व आत्म्यासह आपल्या पित्याच्या पूर्ण आणि गौरवमय सान्निध्यात प्रवेश केलास, तेव्हा पृथ्वीवरील तुझे कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी तू आपल्या शिष्यांवर सोपवलीस. हे प्रिय प्रभू, माझ्या जीवनात मला तुझी हाक ऐकू येते आणि पृथ्वीवर तुझे कार्य पुढे चालू ठेवण्याच्या गौरवशाली सेवेसाठी मी स्वतःला समर्पित करतो. तुझ्या इच्छेप्रमाणे माझा उपयोग कर आणि स्वर्गीय सामर्थ्याने मला भरून टाक, म्हणजे तुझे तारणदायी वचन पृथ्वीच्या टोकापर्यंत पोहोचवण्यास मला हातभार लावता येईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


व्यथेचे आनंदात रूपांतर

पुनरुत्थानकाळातील सहाव्या आठवड्याचा शुक्रवार

“प्रसूतीच्या वेळी स्त्रीला क्लेश होतात, कारण तिची वेळ आली आहे; पण बाळाला जन्म दिल्यावर, जगात एक बाळ जन्माला आले या आनंदाने तिला त्या वेदना आठवत नाहीत. तसेच आताही तुम्ही क्लेशात आहात. पण मी तुम्हाला पुन्हा भेटेन, तेव्हा तुमची अंतःकरणे आनंदित होतील आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही.” योहान 16:21–22

जीवनात क्लेश होणे सामान्य आहे. दररोज लहानसहान गोष्टींमुळे आपल्याला क्लेश होतात. आणि अधूनमधून एखाद्या प्रसंगामुळे आपल्याला अतिशय तीव्र वेदनाही भोगाव्या लागतात.

तुम्हाला क्लेश होत आहेत, याचा अर्थ तुम्ही देवाच्या कृपेत नाही असा होतो का? देवाने तुम्हाला सोडले आहे, असा त्याचा अर्थ होतो का? किंवा तुमच्या हातून काही चुकीचे घडत आहे, असा त्याचा अर्थ होतो का? नक्कीच नाही. हे समजून घेण्यासाठी येशूच्या जीवनाकडे पाहिले तरी पुरे. आपल्या पित्याच्या कार्यात तो अधिकाधिक खोलवर सहभागी होत गेला, तसे पृथ्वीवरील त्याच्या संपूर्ण जीवनात त्याला सतत क्लेश सहन करावे लागले. आपले सार्वजनिक सेवाकार्य सुरू करण्याच्या अगोदर त्याने वाळवंटात चाळीस दिवस क्लेश सोसले. आपल्या संपूर्ण सार्वजनिक सेवाकार्यात त्याने पृथ्वीवरील जीवनातील क्लेश आणि थकवा अनुभवला. त्याला लोकांची टीका, गैरसमज, उपहास, नकार, कठोर वागणूक आणि आणखीही कितीतरी गोष्टी सहन कराव्या लागल्या. शेवटी क्रूसावर त्याला काय भोगावे लागले, हे आपल्याला माहीत आहे.

आपल्या धन्य मातेचे हृदय ‘दुःखाच्या तलवारीने’ भेदले. विवाह झालेला नसताना ती गूढ रीतीने गर्भवती राहिली, त्यामुळे सुरुवातीपासूनच लोकांनी तिचा गैरसमज करून घेतला आणि तिची थट्टा केली. आपल्या पुत्रावर तिचे परिपूर्ण प्रेम होते. तो वाढत असताना, पुढे त्याचे काय होईल या विचाराने तिला क्लेश होत होते. अनेक जण त्याच्यावर प्रेम करत होते, तर काही जण त्याला त्रास देत होते, हे तिने पाहिले. त्याच्याविरुद्ध चालवलेला न्यायाचा फार्स आणि त्याला क्रूसावर खिळलेलेही तिने पाहिले.

पण आता त्यांचे जीवन कसे आहे, याचा विचार करा. आता ती सर्व संतांची वैभवशाली राणी म्हणून आणि तो विश्वाचा राजा म्हणून स्वर्गातून राज्य करतात. ते आता अनंतकाळ वैभवात जगतात. त्यांच्या दुःखाचे रूपांतर परिपूर्ण आनंदात झाले आहे.

आज तुमच्या स्वतःच्या जीवनातील परीक्षांवर चिंतन करा. ज्या व्यक्ती या परीक्षा श्रद्धेने सहन करतात, त्यांना देव कोणते वचन देतो, हे वरील पवित्र शास्त्रातील उताऱ्यातून दिसते. आपल्या वाट्याला अन्याय आला आहे किंवा आपल्याला अन्यायाने वागवले गेले आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर असे अनुभवणारे तुम्ही एकटे नाही; येशू आणि मरिया यांनीही हे अनुभवले. महत्त्वाचे हे आहे की देवाच्या कृपेने आणि प्रतिष्ठेने जीवनाची वाट चालावी. या जीवनातील परीक्षांमुळे किंवा वेदनांमुळे खचून जाऊ नका. देवाने तुमच्यासाठी ठरवलेल्या मार्गावर तुम्ही विश्वासू राहून चालत राहिलात, तर शेवटी तुम्ही आनंदित व्हाल, हे लक्षात ठेवा! हे सत्य आहे. ती आशा सोडू नका आणि अंतिम ध्येयावर लक्ष ठेवा. शेवटी तुमचे प्रयत्न सार्थ ठरतील.

हे माझ्या करुणामय प्रभू, माझे क्लेश आणि माझी ओझी मी तुला अर्पण करतो. ती मी तुझ्या क्रूसाशी जोडतो आणि माझ्या जीवनातील प्रत्येक प्रसंगात तू माझ्यासोबत चालशील असा विश्वास ठेवतो. माझी दृष्टी ध्येयावर स्थिर राहो आणि तुझ्या अढळ प्रेमात मला आनंद लाभो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


स्पष्टपणे बोलणे

पुनरुत्थान काळातील सहाव्या आठवड्याचा शनिवार

“मी तुम्हाला हे रूपकांतून सांगितले आहे. अशी वेळ येत आहे की, तेव्हा मी यापुढे तुमच्याशी रूपकांतून बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हाला स्पष्टपणे सांगेन.” योहान 16:25

येशू स्पष्टपणे बोलण्याऐवजी ‘रूपकांच्या भाषेत’ का बोलतो? हा चांगला प्रश्न आहे.

येशूने सांगितलेल्या अनेक दाखल्यांतही हेच दिसते. त्याचे दाखले ऐकून परत जाताना लोक बहुधा एकमेकांना विचारत असतील, “यातून त्याला काय सांगायचे होते, असे तुम्हाला वाटते?” मग येशू स्पष्ट आणि थेट बोलण्याऐवजी आडवळणाने का बोलतो?

याचे उत्तर आपल्यातच आहे: सत्य स्वीकारायला आपले मन पुरेसे खुले नसते. सत्यासाठी आपले मन पूर्णपणे खुले असते आणि सत्य काहीही असले तरी ते स्वीकारण्याची आपली पूर्ण तयारी असती, तर येशू आपल्याशी स्पष्टपणे बोलू शकला असता आणि आपण त्याला लगेच प्रतिसाद दिला असता. पण असे क्वचितच घडते. हे समजून घेण्यासाठी, देवाची इच्छा जाणणे आणि ती लगेच पूर्ण करण्याची तयारी असणे यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, हे समजून घेतले पाहिजे.

अनेकदा आपल्याला असे वाटते की येशूने आधी आपल्याला त्याची इच्छा सांगावी, मग आपण त्यावर विचार करावा, तिचा नीट विचार करून नंतर त्याला आपले उत्तर द्यावे. पण तसे घडत नाही. उलट, येशूने आपल्याशी स्पष्टपणे बोलावे असे वाटत असेल, तर त्याला काय हवे आहे हे कळण्याआधीच आपण त्याला ‘हो’ म्हटले पाहिजे. त्याची इच्छा समजून घेण्यासाठी आधी ती स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे.

आपल्या धन्य मातेने दिलेला होकार हे अर्थातच याचे परिपूर्ण उदाहरण आहे. देवदूत तिच्याकडे येण्यापूर्वीही ती देवाच्या इच्छेला नेहमी ‘हो’ म्हणत असे. मग देवदूताने येऊन काय घडणार आहे ते तिला सांगितले, तेव्हा तिने त्याबद्दल अधिक स्पष्टपणे सांगण्याची विनंती केली. तिच्या प्रश्नाला थेट उत्तर देऊन देवदूताने ते तिला खरोखरच स्पष्ट केले. तो म्हणाला, “पवित्र आत्मा तुझ्यावर छाया करील आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर येईल…” देवाचा संदेशवाहक इतक्या स्पष्टपणे बोलला, याचे एकमेव कारण हे होते की देवाची योजना काहीही असो, ती मनापासून स्वीकारण्यास आपण पूर्णपणे तयार आहोत, हे तिने आधीच दाखवले होते.

देव तुमच्याशी बोलतो ते तुम्हाला किती स्पष्टपणे ऐकू येते, यावर आज चिंतन करा. तो काय सांगतो हे तुम्हाला अधिक स्पष्टपणे समजावे असे वाटते का? त्याने तुमच्याशी अधिक स्पष्टपणे बोलावे अशी तुमची इच्छा आहे का? तसे असेल, तर देवाची इच्छा काय आहे हे अजून माहीत नसतानाही, स्वतःची इच्छा त्याच्या इच्छेपुढे अधिक पूर्णपणे समर्पित करण्याचा प्रयत्न करा. उद्या देव तुमच्याकडून जे काही मागेल, त्याला आजच ‘हो’ म्हणा. लगेच ‘हो’ म्हणण्याची सवय लावलीत, तर देव तुम्हाला जे काही सांगू इच्छितो ते अधिक स्पष्टपणे समजू लागेल.

हे प्रभू, माझे उत्तर ‘हो’ आहे. आज, उद्या आणि सदैव तुझी इच्छा पूर्ण करणे हीच माझी निवड आहे. तुझ्या इच्छेशिवाय मी दुसरे काहीही निवडत नाही. तुला ‘हो’ म्हणताना, तू माझ्याकडून जे काही मागतोस ते मला अधिकाधिक स्पष्टपणे समजू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पास्काचा सातवा आठवडा

अनुक्रमणिका


मऊ बांधणीच्या पुस्तकाच्या स्वरूपात & ई-पुस्तक म्हणूनही उपलब्ध