मराठी

पुनरुत्थानकाळाचा तिसरा आठवडा

समजुतीचे वरदान

पुनरुत्थानकाळातील तिसरा रविवार (वर्ष अ)

तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखले; पण तो त्यांच्या दृष्टीआड झाला. मग ते एकमेकांना म्हणाले, “वाटेत तो आपल्याशी बोलत होता आणि आपल्याला पवित्र शास्त्राचा अर्थ उलगडून सांगत होता, तेव्हा आपली अंतःकरणे जळत नव्हती का?” लूक 24:31–32

वरच्या उताऱ्यात एका अनोख्या आशीर्वादाचा अनुभव दिसतो. येशूने प्रेषितांची मने उघडली, त्यामुळे त्यांना पवित्र शास्त्र नव्या रीतीने समजले. ही साधीसुधी माणसे होती, पण त्यांना समजुतीचे असामान्य वरदान मिळाले. दीर्घ अभ्यासाने किंवा कठोर परिश्रमाने ते त्यांना मिळाले नाही. उलट, ख्रिस्ताला आपल्या जीवनात सामर्थ्याने कार्य करू देण्यास ते तयार होते, म्हणून त्यांना ते मिळाले. येशूने त्यांच्यासाठी स्वर्गराज्याची रहस्ये उलगडली. त्यामुळे जी सत्ये त्यांना स्वतःच्या बळावर कधीच समजली नसती, ती त्यांना अचानक उमगली.

आपल्याही बाबतीत असेच आहे. देवाच्या रहस्यांना मर्यादा नाहीत. ती गहन आहेत आणि आपले जीवन बदलून टाकतात. तरी कितीतरी वेळा ती आपल्याला समजत नाहीत. अनेकदा ती समजून घेण्याची इच्छाही आपल्याला नसते.

तुमच्या आयुष्यात सध्या घडणाऱ्या किंवा पूर्वी घडलेल्या ज्या गोष्टींमुळे तुम्ही गोंधळून गेला आहात, त्यांचा विचार करा. त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्म्याच्या एका विशेष वरदानाची गरज आहे. पवित्र शास्त्रात देवाकडून आपल्याला मिळणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टींचा अर्थ समजून घेण्यासाठीही हे वरदान आवश्यक आहे. हेच समजुतीचे वरदान. हे आध्यात्मिक वरदान आपल्यासाठी जीवनातील अनेक रहस्ये उलगडते.

समजुतीच्या वरदानाशिवाय आपल्याला स्वतःच्या बळावरच जीवनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा लागतो. संकटे आणि दुःखे यांना सामोरे जाताना हे विशेषतः जाणवते. उदाहरणार्थ, सर्वशक्तिमान आणि सर्वांवर प्रेम करणारा देव चांगल्या व निरपराध लोकांना दुःख का भोगू देतो? माणसांवर दुःखद प्रसंग ओढवतात, तेव्हा कधीकधी देव तिथे नाही असे का वाटते?

पण खरे तर देव अनुपस्थित नसतो. प्रत्येक गोष्टीत त्याचा सहभाग असतो, आणि तो मध्यवर्ती असतो. देवाचे गहन आणि गूढ मार्ग समजून घेण्याची दृष्टी आपल्याला मिळायला हवी. पवित्र शास्त्र, मानवी दुःख, माणसांमधले नातेसंबंध आणि आपल्या जीवनात देव कसे कार्य करतो, हे आपल्याला समजून घ्यायला हवे. पण येशूला आपली मने उघडू दिल्याशिवाय हे कधीच घडणार नाही.

येशूला आपली मने उघडू देण्यासाठी श्रद्धा आणि समर्पण आवश्यक आहे. म्हणजे आधी श्रद्धा ठेवणे आणि मग समजून घेणे. आपल्याला दिसत नसले तरी त्याच्यावर भरवसा ठेवणे. संत ऑगस्टीन एकदा म्हणाले, “जे तुम्हाला दिसत नाही त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा. ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता ते पाहायला मिळणे, हे श्रद्धेचे प्रतिफळ आहे.” न पाहताही विश्वास ठेवायला तुम्ही तयार आहात का? जीवनाचा किंवा जीवनातील एखाद्या विशिष्ट प्रसंगाचा अर्थ लागत नसतानाही देवाच्या चांगुलपणावर आणि प्रेमावर विश्वास ठेवायला तुम्ही तयार आहात का?

आज समजुतीच्या वरदानावर चिंतन करा. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे एका व्यक्तीवर विश्वास ठेवणे. काही परिस्थितींचा अर्थ आपल्याला लागत नसला, तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. विश्वास ठेवण्याचे हे वरदान, म्हणजेच श्रद्धेचे वरदान, आपल्याला सत्य इतक्या खोलवर समजून घेण्याची वाट उघडते, की तेवढी समज आपल्याला स्वतःच्या बळावर कधीच प्राप्त झाली नसती.

हे सर्व सत्याच्या देवा, मला समजुतीचे वरदान दे. तुझी ओळख होण्यासाठी आणि माझ्या जीवनात तू कसे कार्य करतोस हे समजून घेण्यासाठी मला मदत कर. विशेषतः आयुष्यातील सर्वांत कठीण क्षणी तुझ्याकडे वळायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


येशूचे निरोपाचे शब्द

पुनरुत्थानकाळातील तिसरा रविवार (वर्ष ब)

मग पवित्र शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांची मने उघडली. तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की ख्रिस्त दुःख भोगील आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठेल. यरुशलेमपासून सुरुवात करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पापांच्या क्षमेसाठी पश्चात्ताप करण्याचा संदेश दिला जाईल. तुम्ही या गोष्टींचे साक्षीदार आहात.” लूक 24:45–48

लूकच्या शुभवर्तमानात नोंदवलेली ही येशूची शिष्यांना झालेली शेवटची भेट होती. या भेटीत येशूने प्रेषितांना आपले हातपाय दाखवले. संदेष्ट्यांनी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला दुःख भोगावे लागणार, मरावे लागणार आणि पुन्हा उठावे लागणार, हे त्याने त्यांना समजावून सांगितले. “या गोष्टींचे साक्षीदार” होण्याचे आवाहन त्याने त्यांना केले आणि पवित्र आत्मा लवकरच पित्याकडून येईल असेही सांगितले. मग तो त्यांच्याबरोबर बेथानीपर्यंत चालत गेला आणि तिथून तो स्वर्गात आरोहण करून गेला. पृथ्वीवरील आपल्या या शेवटच्या शब्दांत येशूने त्या प्रेषितांचे आणि आपल्या सर्वांचेही कार्य काय आहे, हे स्पष्ट केले.

“तुम्ही या गोष्टींचे साक्षीदार आहात,” असे येशू म्हणाला. कोणत्या गोष्टींचे? प्रेषितांना पास्का रहस्याचे, म्हणजे येशूच्या दुःखभोगाचे, मृत्यूचे आणि पुनरुत्थानाचे साक्षीदार व्हायचे होते. या सत्यांची घोषणा करणे हे येशूच्या प्रेषितांचे आणि आपल्या सर्वांचेही मुख्य कार्य आहे.

पास्का रहस्याचा तुम्ही किती वेळा विचार करता? कदाचित हे शब्द तुम्ही ऐकले असतील, पण त्यांचा नेमका अर्थ तुम्हाला पूर्णपणे समजला नसेल. “पास्का रहस्य” म्हणजे काय? येशूने प्रेषितांना याच रहस्याचे साक्षीदार व्हायला सांगितले. येशू पित्याकडून आला, आपल्या पापांसाठी त्याने मृत्यू सोसला, पापावर विजय मिळवण्यासाठी तो मेलेल्यांतून उठला आणि मग आपण त्याच्यामागे यावे असे आमंत्रण देण्यासाठी त्याने स्वर्गात आरोहण केले, याची साक्ष त्यांनी इतरांना द्यायची होती. हाच आपल्या श्रद्धेचा सर्वांत महत्त्वाचा संदेश आहे.

कधीकधी आपण आपल्या ख्रिस्ती श्रद्धेकडे आपल्या उद्धाराची तारणदायी सत्ये म्हणून पाहण्याऐवजी, ‘चांगले वागण्याचे धडे’ देणारे एखादे पुस्तक म्हणून पाहतो. नैतिक नियम समजून घेणे आणि प्रेमाने इतरांची सेवा करण्याचे आवाहन समजून घेणे आवश्यक आहे. तरीही शुभवर्तमानाच्या केंद्रस्थानी तारण आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला आणि मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा उठला, जेणेकरून आपल्याला स्वर्गाच्या वैभवात प्रवेश मिळावा. आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला स्वर्गात प्रवेश मिळतो असे नाही; पास्का रहस्यातील तारणकारी कृतीमुळेच आपल्याला तो प्रवेश मिळतो. ही तारणकारी कृती आपल्याला इतरांची प्रेमाने सेवा करत जगण्यास बोलावते. तरीही अशी सेवा हे आपल्या श्रद्धेचे मुख्य उद्दिष्ट नसून, ती आपल्या तारणाचे फळ आहे.

वर उद्धृत केलेल्या शुभवर्तमानाच्या उताऱ्यात असेही म्हटले आहे की येशूने ‘त्यांना पवित्र शास्त्र समजावे म्हणून त्यांची मने उघडली.’ म्हणून प्रेषितांप्रमाणे आपल्यालाही शुभवर्तमान, येशूच्या जीवनाचा मुख्य उद्देश आणि आपल्या स्वतःच्या जीवनाचा मुख्य उद्देश समजून घ्यायचा असेल, तर आपण त्याला आपलीही मने उघडू दिली पाहिजेत. आपण येशूला पास्का रहस्य आपल्यासमोर उलगडू दिले पाहिजे, कारण ते आपल्या स्वतःच्या बळावर समजून घेणे किंवा उलगडणे आपल्याला शक्य नाही.

ख्रिस्ताच्या जीवनाचा उद्देश तुम्हाला किती स्पष्टपणे समजला आहे, यावर आज चिंतन करा. त्याचे मानवी जीवन, त्याचे दुःखभोग, त्याचा मृत्यू आणि त्याचे पुनरुत्थान यांतील रहस्ये तुम्हाला समजतात का? आपल्या श्रद्धेतील या सत्यांनी तुमच्या अंतःकरणात किती खोलवर परिवर्तन घडवले पाहिजे, हे तुम्हाला समजते का? आणि श्रद्धेच्या या रहस्यांची साक्ष इतरांना देणे हे तुमचे कर्तव्य आहे, याची तुम्हाला जाणीव आहे का? या प्रश्नांवर शांतपणे विचार करा आणि ते मनात खोलवर उतरू द्या, जेणेकरून तुम्हीही प्रेषितांप्रमाणे उद्धाराच्या देणगीत सहभागी व्हाल आणि जगाला शुभवर्तमान सांगण्याच्या आवाहनाला प्रतिसाद द्याल.

हे माझ्या तारणाऱ्या प्रभू, तुझे जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थान ही आजवर मिळालेली सर्वांत महान देणगी आहे. या पास्का रहस्याद्वारे आपण पापातून मुक्त होतो आणि स्वर्गातील तुझ्या पित्याची मुले बनतो. ही महान देणगी मला अधिक पूर्णपणे समजावी म्हणून माझे मन उघड आणि गरजवंत जगासमोर तुझी साक्ष देता यावी म्हणून मला आवश्यक ती कृपा दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


स्वतःला पूर्णपणे झोकून देणे!

पुनरुत्थानकाळातील तिसरा रविवार, वर्ष क

मग येशूचा लाडका शिष्य पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” तो प्रभू आहे हे ऐकताच शिमोन पेत्राने आपले वस्त्र खोचले, कारण त्याच्या अंगावर फारसे कपडे नव्हते, आणि त्याने समुद्रात उडी मारली. योहान 21:7

पेत्राने तर शब्दशः स्वतःला झोकून दिले. वरचा उतारा येशूने आपल्या पुनरुत्थानानंतर प्रेषितांना दिलेल्या एका दर्शनातील आहे. रात्रभर मासेमारी करूनही त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. येशूने किनाऱ्यावरून त्यांना होडीच्या उजव्या बाजूला जाळे टाकायला सांगितले. त्यांनी तसे केले तेव्हा इतके मासे सापडले की ते आवरणे त्यांना शक्य झाले नाही. तो येशू आहे हे योहानाच्या लक्षात आले आणि त्याने तसे सांगितले. तेव्हा पेत्राला आपला आनंद आवरेना आणि आपल्या प्रभूला भेटायला त्याने पाण्यात उडी मारली.

चिंतन करण्यासारखे हे किती सुंदर दृश्य आहे! विशेषतः पेत्राच्या मनात दाटून आलेल्या त्या आनंदाचा विचार करा: त्याच आनंदाने त्याला पाण्यात उडी घेऊन पोहत किनाऱ्यावर जायला लावले. त्याचा आनंद त्याला आवरत नव्हता.

आपल्या प्रभूकडे जाण्यासाठी तुम्ही तलावात उडी माराल का? हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल, पण त्याचा शब्दशः विचार करायला हरकत नाही. पुनरुत्थित प्रभू तुमच्या समोर आला, तर त्याला पाहून तुम्हाला इतका आनंद होईल का की त्याच्याजवळ जाण्यासाठी तलावात उडी मारावी लागली तरी तुम्ही ती माराल? पेत्राच्या या कृतीकडे आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी एक प्रतीक म्हणून पाहिले पाहिजे. पेत्राने क्षणभरही संकोच केला नाही; येशू आपल्याला भेटतो तेव्हा आपण कसा प्रतिसाद द्यावा, हे त्याच्या कृतीतून दिसते.

या उताऱ्यात पेत्राला जसा पुनरुत्थित येशू प्रत्यक्ष, देहरूपाने भेटला, तसा तो आपल्याला भेटत नाही, हे उघड आहे. पण त्याला पाहण्याची दृष्टी असेल, तर तो आपल्याला दररोज भेटतो. प्रार्थनेतून आणि आपल्या अंतःकरणात तो स्वतः वास करतो म्हणून, तो आपल्या हृदयात जिवंत आहे. दररोज भेटणाऱ्या लोकांमध्ये तो खरोखर उपस्थित आहे. आणि संस्कारांमध्ये, विशेषतः परमपवित्र युखरिस्तामध्ये, तो निःसंशयपणे उपस्थित आहे.

या उताऱ्याच्या संदर्भात तुम्ही दोन प्रश्नांचा विचार करावा. पहिला प्रश्न असा: दिवसभरात तुम्हाला येशूच्या उपस्थितीची खरोखर जाणीव होते का? येशू पेत्राशी आणि नावेतल्या इतरांशी बोलला, तरी सुरुवातीला पेत्राने त्याला ओळखले नाही. चमत्कार घडल्यावरच तो येशू आहे हे त्यांना कळले. दुसरा प्रश्न असा: येशूच्या उपस्थितीची जाणीव होते तेव्हा तुम्ही कसा प्रतिसाद देता? तुम्ही उदासीन राहता का? तुम्हाला उत्साह वाटत नाही का? की तुमचे मन आनंदाने भरून जाते?

आज या दोन प्रश्नांवर चिंतन करा आणि दररोज, दिवसभर, आपल्या प्रभूच्या उपस्थितीची अधिक जाणीव ठेवण्याचा निश्चय करा. येशू दिसतो तेव्हा पेत्रासारखा प्रतिसाद देण्याचाही निश्चय करा. तुमचे मन आणि तुमची सारी ओढ त्याच्याकडे वळू द्या आणि अपार आनंदाने व उत्साहाने त्याला प्रतिसाद द्या. आपल्या प्रभूला स्वतःला पूर्णपणे समर्पित करायला घाबरू नका!

हे प्रभू, माझ्या जीवनात, इतरांच्या जीवनात आणि तुझ्या ख्रिस्तसभेत, विशेषतः परमपवित्र युखरिस्तामध्ये, तू जिवंत आहेस हे मला पाहू दे. माझ्या सभोवताली तुझी दैवी उपस्थिती असूनही कितीतरी वेळा ती मला दिसत नाही. दररोज तुला पाहण्यास मला मदत कर. तुझ्या दैवी उपस्थितीला मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने प्रतिसाद देण्यासही मला मदत कर. हे माझ्या प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यावर आणखी प्रेम करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


येशूचा शोध

पुनरुत्थानकाळातील तिसऱ्या आठवड्याचा सोमवार

येशूने त्यांना उत्तर दिले, “आमेन, आमेन, मी तुम्हाला सांगतो: तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून माझा शोध घेत नाही, तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध घेता. नाश पावणाऱ्या अन्नासाठी श्रम करू नका, तर शाश्वत जीवनासाठी टिकणाऱ्या अन्नासाठी श्रम करा. ते अन्न तुम्हाला मानवपुत्र देईल.” योहान 6:26-27

पवित्र शास्त्रातील हा उतारा आपल्या जीवनात आपण कशाला प्राधान्य देतो, या मूळ प्रश्नालाच हात घालतो. तुम्ही कशासाठी श्रम करता? “नाश पावणाऱ्या अन्नासाठी” तुम्ही खूप कष्ट करता आणि “शाश्वत जीवनासाठी टिकणाऱ्या अन्नासाठी” अगदी थोडेच श्रम करता का? की याच्या उलट आहे?

काही कारणाने या जगातल्या “गोष्टी” मिळवण्याच्या धडपडीत आपण सहज गुरफटून जातो. वरच्या उताऱ्यात लोक येशूचा शोध घेत होते, कारण आदल्या दिवशी त्याने त्यांना खाऊ घातले होते आणि आता त्यांना पुन्हा भूक लागली होती. ते खरोखरच खाण्यासाठी अन्न शोधत होते. येशू सौम्यपणे त्यांची चूक दाखवून देतो आणि त्यांनी त्याचा शोध का घ्यावा, हे सांगण्याची संधी साधतो. खरे कारण हे आहे की त्याला त्यांना शाश्वत जीवनाचे आध्यात्मिक अन्न द्यायचे आहे. तुम्ही कोणते अन्न शोधावे, अशी येशूची इच्छा आहे? या प्रश्नाचे उत्तर आपल्या प्रभूला तुमच्या अंतःकरणात देऊ द्या.

प्रभूला आपल्याला उत्तर देता यावे म्हणून आपण येथे दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर विचार केला पाहिजे. पहिला प्रश्न: “मला जीवनात काय हवे आहे?” या प्रश्नासाठी वेळ द्या. एकांतात थोडा वेळ घालवा आणि या प्रश्नाचे प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय हवे आहे? तुमच्या मनाची खरी इच्छा काय आहे? प्रामाणिकपणे स्वतःच्या इच्छांना सामोरे गेलात, तर तुमच्या काही इच्छा, कदाचित अनेक इच्छाही, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात रुजवलेल्या नाहीत, हे बहुधा तुमच्या लक्षात येईल. त्या इच्छा कोणत्या हे ओळखणे, ही येशू तुम्हाला देऊ इच्छित असलेले खरे अन्न कोणते हे जाणून घेण्याची पहिली पायरी आहे.

दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे: “तुम्ही योग्य कारणासाठी येशूचा शोध घेत आहात का?” आपण आजारी पडलो की बरे होण्यासाठी डॉक्टरांकडे जातो. एखाद्या मुलाला दुखापत झाली की ते अनेकदा धीर मिळावा म्हणून आईकडे किंवा वडिलांकडे धाव घेते. यात काही गैर नाही. आपणही तसेच करतो. काय करावे हे सुचत नाही आणि मनाचा गोंधळ उडतो, तेव्हा आपण अनेकदा उत्तरांसाठी आणि मदतीसाठी देवाकडे वळतो. पण कालांतराने आपण केवळ बरे होण्यासाठी किंवा दिलासा मिळवण्यासाठी नव्हे, तर त्यापलीकडे जाऊन देवाचा शोध घ्यावा. शेवटी आपण प्रेमापोटी देवाचा शोध घेऊ. आपले त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याच्यावर आणखी प्रेम करावेसे वाटते, एवढ्याच कारणासाठी आपण त्याचा शोध घेऊ.

येशूचा शोध घेण्याची ओढ तुमच्या मनात आहे की नाही, यावर आज चिंतन करा. येशूवर तुमचे प्रेम आहे आणि ते आणखी वाढावे अशी तुमची इच्छा आहे, एवढ्याच कारणाने तुम्ही त्याचा शोध घेऊ लागता, तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर असता. त्या मार्गावर पुढे जाताना तो तुम्हाला परम आनंद आणि परिपूर्ण समाधान देणारा मार्ग आहे, हे उमगते.

हे येशू, तुझा शोध घेण्यास मला मदत कर. मला ज्या मदतीची आणि आरोग्यदानाची गरज आहे, त्यासाठी मी तुझा शोध घ्यावा म्हणून मला मदत कर. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, प्रेमापोटी मी तुझा शोध घ्यावा म्हणून मला मदत कर. हे माझ्या येशू, माझे खरोखरच तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यावर आणखी प्रेम करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


पवित्र युखारिस्ताची भूक आणि तहान

पुनरुत्थानकाळातील तिसऱ्या आठवड्याचा मंगळवार

येशू त्यांना म्हणाला, “मी जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.” योहान 6:35

पुन्हा कधीच भूक किंवा तहान लागली नाही, तर किती छान होईल, नाही का? विशेष गोष्ट अशी की, येशू या अगदी स्वाभाविक मानवी अनुभवांतून आपल्याला स्वतःविषयी शिकवतो. भूक आणि तहान यांतून तो आपल्याला दाखवतो की आपल्या अंतरंगालाही आध्यात्मिक तृप्तीची ओढ आहे. आणि ही आध्यात्मिक भूक व तहान भागवण्याचा एकच मार्ग आहे—तो म्हणजे येशूद्वारे.

आपल्या स्वाभाविक भुकेत आणि तहानेत आपल्या आध्यात्मिक ओढीचे प्रतिबिंब कसे दिसते, यावर चिंतन करणे हा एक चांगला आध्यात्मिक सराव आहे. शरीराला ठरावीक वेळाने भूक आणि तहान लागणे स्वाभाविक आहे. आपण खातो, पितो; पण काही तासांनी पुन्हा भूक आणि तहान लागते. हे चक्र आपण टाळू शकत नाही. आपल्या शरीराला पुन्हा पुन्हा अन्नपाण्याची गरज भासते.

आध्यात्मिक जीवनातही असेच आहे. एकदा प्रार्थना केली म्हणून आपली आध्यात्मिक भूक कायमची भागत नाही. येशूवर विश्वास ठेवला की आपण कायमचे तृप्त होतो, असेही नाही. का? कारण दररोज आणि दिवसभर आपण प्रार्थना केली पाहिजे आणि येशूशी एकरूप राहिले पाहिजे.

पवित्र युखारिस्त आपल्याला आपले ‘रोजचे’ अन्न देतो आणि त्यामुळे ही भूक व तहान समजून घ्यायला मदत होते. ही अशी देणगी आहे जिचा आपण दररोज शोध घेतला पाहिजे. काही संस्कार आपल्याला एकदाच दिले जातात (बाप्तिस्मा आणि दृढीकरण). पण पवित्र युखारिस्त ही अशी देणगी आहे की ती आपण वारंवार ग्रहण केली पाहिजे आणि तिची ओढ सतत बाळगली पाहिजे. आपण नियमितपणे मिस्साला जाऊन पवित्र युखारिस्त ग्रहण करणे आवश्यक आहे, यावरून कळते की एकदाच एखादा ठाम निर्णय घेतल्याने आपले ख्रिस्ती जीवन परिपूर्ण होत नाही. उलट, त्या जीवनाला दररोज पोषण आणि तृप्तीची गरज असते.

ख्रिस्ताविषयीची ही ओढ तृप्त करण्यासाठी तुम्ही दररोज काय करता? कदाचित तुम्हाला रोज मिस्साला जाता येत नसेल; पण ख्रिस्ती म्हणून तुमच्या मनात असलेली ख्रिस्ताची ओढ तृप्त करण्याचा प्रयत्न तुम्ही दररोज करता का? जो जीवनाची भाकर आहे, त्या येशूचा शोध तुम्ही दररोज घेता का? आपली तहान ख्रिस्ताकडून भागवून घेण्याचा प्रयत्न तुम्ही दररोज करता का?

येशूवर प्रेम करण्याचा आणि त्याच्या मागे चालण्याचा निर्णय केवळ दररोज नव्हे, तर दिवसभर पुन्हा पुन्हा नव्याने घेतला पाहिजे. शरीराला जेव्हा जेव्हा भूक किंवा तहान लागते, तेव्हा तेव्हा या निर्णयाचे नूतनीकरण केले पाहिजे.

अन्नपाण्याची गरज तुम्हाला स्वाभाविकपणे भासते. आज तिच्यावर चिंतन करा, म्हणजे ख्रिस्तासाठी तुमच्या अंतरंगात असलेल्या त्याहून कितीतरी खोल आध्यात्मिक ओढीची तुम्हाला सतत आठवण राहील. त्याच्याकडे प्रार्थना करणे, त्याचे ऐकणे आणि त्याला आपल्या आत्म्यात स्वीकारणे, हे असे अन्न आहे की त्यासारखी तृप्ती दुसरे काहीही देऊ शकत नाही. येशू हीच जीवनाची खरी भाकर आहे आणि तोच तुमचे खरे आध्यात्मिक पेय आहे. तुम्ही त्याच्यासाठीच निर्माण झाला आहात. तुमच्या जीवनातील सर्वांत खोल इच्छा त्याला तृप्त करू द्या!

हे प्रभू, मला खरोखरच तुझी ओढ आहे. माझे मन तृप्त व्हावे अशी मला आस आहे. प्रत्येक वेळी आणि प्रत्येक बाबतीत तुझ्याकडे वळण्यास मला मदत कर. मला तुझीच गरज आहे आणि तूच माझे मन तृप्त करू शकतोस, हे मला नेहमी लक्षात ठेवू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


कधीही नकार नाही, सदैव प्रेम!

पुनरुत्थानकाळातील तिसऱ्या आठवड्याचा बुधवार

“माझ्याकडे येणाऱ्या कोणालाही मी नाकारणार नाही.” योहान 6:37

या छोट्याशा वाक्यात आपल्या प्रभूच्या दैवी दयेविषयी पुष्कळ काही सांगितले आहे. संत फाऊस्तिना यांच्या दैवी दयेविषयीच्या दैनंदिनीत हे वाक्य वारंवार येते. अनेकांना हे शब्द ऐकण्याची गरज आहे.

हे ऐकणे का महत्त्वाचे आहे? कारण नाकारले गेल्याचे ओझे आपण अनेकदा मनात बाळगतो. अनेकांना आयुष्यात नाकारले गेल्याचा अनुभव आलेला असतो. त्यामुळे पुन्हा दुखावले जाण्याच्या भीतीने नात्यात मन मोकळे करायला आपण घाबरतो, याची त्यांना स्वतःलाही जाणीव नसते. एखाद्या नात्यात एकदा मन दुखावले की आपण पुढे जपून वागतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती, जोडीदार, मित्र किंवा ज्याच्याशी आपण प्रेमाने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला अशी कोणतीही व्यक्ती आपल्याला दुखावू शकते, नाकारू शकते. आणि त्याची वेदना होते.

येशूचे शब्द विशेष महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यावर आपण भरवसा ठेवू शकतो, अशी खात्री ते आपल्याला देतात. आपण त्याच्याकडे जाऊ शकतो, त्याच्यासमोर आपले हृदय उघडू शकतो आणि आपल्या सगळ्या जखमा व कमकुवतपणा त्याच्यापासून न लपवता त्याच्यासमोर येऊ शकतो. तो आपल्याशी अत्यंत हळुवारपणे, आदराने, प्रेमळपणे आणि काळजीपूर्वक वागेल. आपण स्वतःची जितकी काळजी घेतो, त्याहूनही अधिक काळजी येशू आपली घेईल!

आज येशूच्या या शब्दांवर चिंतन करा. ते पुन्हा पुन्हा म्हणा: “जो कोणी माझ्याकडे येतो, त्याला मी नाकारणार नाही.” तुम्ही त्याच्याकडे यावे आणि आपले अंतःकरण त्याच्यासमोर पूर्णपणे उघडावे, अशी त्याची इच्छा आहे, हे लक्षात ठेवा. असे केल्याने तो तुमच्यावरचे आपले प्रेम प्रकट करू शकेल आणि तुम्हाला कधी शक्य वाटले नसेल इतका गाढ विश्वास तुम्ही त्याच्यावर ठेवू शकाल.

हे प्रभू, दुःख सोसताना आणि इतरांकडून नाकारले जाताना मला तुझ्याकडे यायचे आहे. तू आरोग्य देणारा दैवी वैद्य आहेस आणि माझ्या आत्म्याला दिलासा देशील, हे मला ठाऊक आहे. तुझ्यावर भरवसा ठेवण्यास आणि तुझे प्रेम स्वीकारण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


येशूकडे ओढले जाणे

पुनरुत्थानकाळातील तिसऱ्या आठवड्याचा गुरुवार

येशू लोकसमुदायाला म्हणाला, “ज्या पित्याने मला पाठवले, त्याने एखाद्याला माझ्याकडे ओढल्याशिवाय तो माझ्याकडे येऊ शकत नाही; आणि शेवटच्या दिवशी मी त्याला उठवीन.” योहान 6:44

पवित्र शास्त्रातील हा उतारा आपल्याला एक सुंदर आध्यात्मिक तत्त्व उलगडून दाखवतो. देवाच्या अधिक जवळ जायचे असेल, तर हे तत्त्व समजून घेऊन त्यानुसार जगणे आवश्यक आहे. ते तत्त्व असे की, पिता आपल्याला येशूकडे ओढतो.

सर्वप्रथम, येशूच्या वचनाचा पहिला भाग समजून घेणे महत्त्वाचे आहे: ‘जोपर्यंत … तोपर्यंत कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.’ यावरून आपल्याला कळते की श्रद्धेने येशूकडे येणे, त्या श्रद्धेत वाढणे आणि देवावरील आपले प्रेम वाढणे हे केवळ आपल्या स्वतःच्या बळावर शक्य नाही. श्रद्धेकडे येणे
हा आपल्या जीवनात देवाने केलेल्या कृतीला दिलेला प्रतिसाद आहे.

ख्रिस्ताशी खरे नाते जोडायचे असेल, तर हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण त्या नात्यात देवाला पहिले पाऊल उचलू द्यायचे आहे, हे यातून स्पष्ट होते. आपण त्याला पहिले पाऊल उचलू दिल्यावर त्याला प्रतिसाद देण्याची जबाबदारी आपली आहे.

अर्थात, याचा अर्थ असा नाही की आपण काहीही न करता देव आपल्याकडे येण्याची वाट पाहत बसावे. देव सतत आपल्या दिशेने हात पुढे करतो, आपल्याशी बोलतो आणि आपल्याला स्वतःकडे ओढतो. म्हणून तो आपल्याला प्रेमाने आणि हळुवारपणे कसा साद घालतो, याकडे लक्ष देणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. त्याच्या कृपेच्या सौम्य प्रेरणांतून ही साद आपल्यापर्यंत पोहोचते. त्या प्रेरणा आपल्याला दररोज अधिक पूर्णपणे त्याच्याकडे वळण्याचे आणि स्वतःला अधिक पूर्णपणे त्याच्या स्वाधीन करण्याचे आमंत्रण देतात.

आपल्या धावपळीच्या जगात, आपले लक्ष वेधून घेण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या अनेक आवाजांमुळे आपले लक्ष सहज विचलित होते. जग आणि त्यातील प्रलोभने आपल्याला कधी ओढतात, तर कधी ढकलतातही; हे सहज जाणवते. आपले लक्ष फार काळ टिकत नसले, तरी ते पटकन वेधून घ्यायला आणि क्षणिक समाधान द्यायला जग चांगलेच शिकले आहे. पण शेवटी हे समाधान आपल्याला आतून रिकामेच ठेवते.

पण देवाचा आवाज आणि त्याचे आमंत्रण अगदी वेगळे आहेत. अंतःकरणाच्या शांततेत आपल्याला त्याचा आवाज आणि आमंत्रण ऐकू येते. ही आंतरिक शांतता लाभण्यासाठी मठात राहण्याची गरज नाही. त्याऐवजी, दररोज निष्ठेने प्रार्थनेसाठी वेळ देऊन आणि प्रत्येक गोष्टीत देवाकडे वळण्याची सवय लावून घेतल्याने ती लाभते. देवाच्या हाकेला पुन्हा पुन्हा प्रतिसाद दिल्यानेही ती लाभते. अशा रीतीने देवाची ओढ अनुभवण्याची, त्याची हाक ऐकण्याची आणि तिला प्रतिसाद देण्याची सवय लागते. मग तो आपल्याला आणखी जवळ ओढतो आणि आपण पुन्हा त्याला प्रतिसाद देतो.

आज तुम्ही देवाचे बोलणे किती लक्षपूर्वक ऐकता, यावर चिंतन करा. आज निदान काही मिनिटे (किंवा त्याहून अधिक वेळ) शांततेत घालवण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटा आणि ऐका. देव तुमच्याशी काय बोलतो ते ऐका. तो तुम्हाला आपल्याकडे ओढतो तेव्हा त्याला उदार मनाने प्रतिसाद द्या. दररोज तुम्ही करू शकता अशी ही सर्वांत चांगली निवड आहे!

हे प्रभू, कृपया मला तुझ्याकडे ओढ, मला तुझ्या जवळ घे आणि तुझा आवाज ओळखण्यास मला मदत कर. तुझी हाक ऐकू येते तेव्हा तुला उदार मनाने प्रतिसाद देण्यास मला मदत कर. हे माझ्या प्रिय प्रभू, माझे जीवन तुझे आहे. तुझी ओढ माझ्या मनात आणखी वाढू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


येशूची दृढ खात्री

पुनरुत्थानकाळातील तिसऱ्या आठवड्याचा शुक्रवार

यहुदी आपापसांत वाद घालू लागले. ते म्हणाले, “हा मनुष्य आपल्याला स्वतःचे मांस खायला कसे देऊ शकतो?” येशू त्यांना म्हणाला, “आमेन, आमेन, मी तुम्हाला सांगतो: तुम्ही मानवपुत्राचे मांस खाल्ले नाही आणि त्याचे रक्त प्यायले नाही, तर तुमच्यामध्ये जीवन नाही.” योहान 6:52-53

हा उतारा परमपवित्र युखरिस्ताविषयी नक्कीच बरेच काही उलगडून सांगतो. त्याचबरोबर, सत्य स्पष्टपणे आणि ठामपणे सांगण्याचे येशूचे सामर्थ्यही तो दाखवतो.

येशूला विरोध आणि टीकेला सामोरे जावे लागत होते. काही जण अस्वस्थ झाले होते आणि त्याच्या शब्दांना आक्षेप घेत होते. इतर जण आपल्याला बारकाईने जोखतात आणि आपल्यावर संतापतात, तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण माघार घेतात. लोक आपल्याबद्दल काय म्हणतात आणि आपण मांडलेल्या सत्यामुळे आपल्यावर काय टीका होईल, याची गरजेपेक्षा जास्त चिंता करण्याचा मोह आपल्याला होतो. पण येशूने नेमके उलट केले. इतरांच्या टीकेपुढे तो झुकला नाही.

इतरांच्या कठोर बोलण्याला सामोरे जाताना येशूने अधिक स्पष्टपणे आणि अधिक आत्मविश्वासाने उत्तर दिले, हे पाहून आपल्याला प्रेरणा मिळते. युखरिस्त हे आपले शरीर आणि रक्त आहे, या विधानाचा अर्थ त्याने आणखी ठळक केला. तो म्हणाला, “आमेन, आमेन, मी तुम्हाला सांगतो: तुम्ही मानवपुत्राचे मांस खाल्ले नाही आणि त्याचे रक्त प्यायले नाही, तर तुमच्यामध्ये जीवन नाही.” या शब्दांतून येशूचा अढळ आत्मविश्वास, दृढ खात्री आणि सामर्थ्य दिसून येते.

अर्थात, येशू देव आहे, म्हणून त्याच्याकडून अशीच अपेक्षा ठेवणे स्वाभाविक आहे. तरीही त्याचे उदाहरण प्रेरणादायी आहे आणि या जगात आपण सर्वांनी किती खंबीर असावे, हे ते दाखवून देते. आपण ज्या जगात राहतो, तिथे सत्याला सर्वत्र विरोध होतो. जग अनेक नैतिक सत्यांना विरोध करते, पण अनेक गहन आध्यात्मिक सत्यांनाही त्याचा विरोध आहे. पवित्र युखरिस्तासंबंधीची सुंदर सत्ये, दैनंदिन प्रार्थनेचे महत्त्व, नम्रता, देवाच्या हाती स्वतःला पूर्णपणे सोपवणे आणि देवाच्या इच्छेला सर्व गोष्टींपेक्षा अग्रस्थान देणे, ही अशा गहन सत्यांची काही उदाहरणे आहेत. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, जसजसे आपण आपल्या प्रभूच्या अधिक जवळ जातो, स्वतःला त्याच्या हाती अधिक पूर्णपणे सोपवतो आणि त्याचे सत्य अधिक ठामपणे घोषित करतो, तसतसा आपल्याला त्याच्यापासून दूर ओढण्याचा जगाचा दबाव अधिक जाणवेल.

मग आपण काय करावे? येशूच्या खंबीरपणातून आणि त्याच्या उदाहरणातून शिकावे. जेव्हा आपण एखाद्या कठीण परिस्थितीत सापडतो किंवा आपल्या श्रद्धेवर हल्ला होत आहे असे आपल्याला वाटते, तेव्हा आपण अधिक निष्ठावान राहण्याचा आपला निश्चय दृढ केला पाहिजे. यामुळे आपण अधिक खंबीर होऊ आणि आपल्यासमोर येणारी प्रलोभने देवाची कृपा मिळण्याच्या संधी ठरतील!

आज यावर चिंतन करा: तुमच्या श्रद्धेला आव्हान मिळते तेव्हा तुम्ही कशी प्रतिक्रिया देता? तुम्ही माघार घेता का, भीतीला शरण जाता का आणि इतरांनी दिलेल्या आव्हानांमुळे स्वतःला डळमळू देता का? की आव्हानांना सामोरे जाताना आपला निश्चय अधिक दृढ करता आणि छळातून आपली श्रद्धा शुद्ध होऊ देता? आपल्या प्रभूच्या खंबीरपणाचे आणि दृढ निश्चयाचे अनुकरण करण्याचा निर्णय घ्या. मग तुमच्याद्वारे त्याची कृपा आणि दया इतरांना अधिक स्पष्टपणे दिसेल.

हे प्रभू, तुझ्या दृढ निश्चयाचे बळ मला दे. तू माझ्यावर सोपवलेले कार्य मला स्पष्टपणे समजू दे आणि प्रत्येक बाबतीत न ढळता तुझी सेवा करण्यास मला मदत कर. जीवनातील आव्हानांना सामोरे जाताना मी कधीही घाबरून मागे हटू नये; उलट, पूर्ण अंतःकरणाने तुझी सेवा करण्याचा माझा निश्चय अधिकाधिक दृढ होत जावो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


पवित्र युखरिस्ताविषयीची गहन शिकवण

पास्काच्या तिसऱ्या आठवड्यातील शनिवार

यामुळे त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण आपल्या पूर्वीच्या जीवनपद्धतीकडे परतले आणि पुन्हा त्याच्याबरोबर चालले नाहीत. तेव्हा येशूने बारा शिष्यांना विचारले, “तुम्हालाही निघून जायचे आहे का?” शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “गुरुदेव, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने तुमच्याजवळ आहेत.” योहान 6:66-68

पेत्राचे उत्तर किती समर्पक आहे! या प्रसंगाची पार्श्वभूमी खरोखरच रंजक आणि बोधप्रद आहे. येशूने पवित्र युखरिस्तावरील आपले सुंदर आणि गहन विवेचन नुकतेच संपवले होते. त्याने स्पष्टपणे सांगितले होते की त्याचे मांस हे खरे अन्न आहे आणि त्याचे रक्त हे खरे पेय आहे; तसेच, तुम्ही मनुष्यपुत्राचे मांस खाल्ले नाही आणि त्याचे रक्त प्यायले नाही, तर तुमच्यामध्ये जीवन नाही.

युखरिस्ताविषयीच्या त्याच्या शिकवणुकीमुळे पुष्कळ जण “आपल्या पूर्वीच्या जीवनपद्धतीकडे परतले आणि पुन्हा त्याच्याबरोबर चालले नाहीत.” दुसऱ्या शब्दांत, युखरिस्ताविषयीची येशूची शिकवण स्वीकारणे आणि तिच्यावर विश्वास ठेवणे पुष्कळांना कठीण गेले.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, युखरिस्ताविषयीची ही गहन शिकवण दिल्यानंतर तिच्यामुळे पुष्कळ जण येशूला सोडून गेले, तरी त्याने माघार घेतली नाही किंवा आपण जे सांगितले ते बदलले नाही. उलट, त्याने आपल्या प्रेषितांना विचारले की त्यांनाही निघून जायचे आहे का.

येशूंनी प्रेषितांना विचारलेल्या या प्रश्नाचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. हा प्रश्न इतक्या थेटपणे विचारून येशू त्यांना निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य देतात. त्यांनी नुकतीच दिलेली शिकवण मान्य करण्यासाठी ते प्रेषितांवर दबाव आणत नाहीत. ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण येशू त्यांच्या निर्णयावर आग्रह न धरता त्यांना पवित्र युखरिस्ताविषयीची आपली गौरवशाली शिकवण पूर्णपणे स्वेच्छेने स्वीकारण्याचे आमंत्रण देतात. ती शिकवण स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे खरे स्वातंत्र्य त्यांना आहे. याच स्वातंत्र्यामुळे येशूंवरील त्यांची श्रद्धा मुळापासून अधिक दृढ होऊ शकते.

पेत्र पुढे होऊन एक सुंदर उत्तर देतो: “गुरुदेव, आम्ही कोणाकडे जावे?” पेत्राच्या या शब्दांतून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली म्हणजे, लोक येशूला सोडून जात असल्यामुळे हा प्रसंग कठीण होता. दुसरी म्हणजे, ही अडचण असूनही आपण विश्वास ठेवला पाहिजे, याची पेत्राला आणि इतर प्रेषितांना जाणीव होती. पुष्कळांनी येशूला सोडले आणि त्याची वचने स्वीकारण्यास नकार दिला, एवढ्याने प्रेषितांनीही त्याला सोडून जावे असे काही कारण नव्हते. खरे तर, पेत्राच्या शब्दांतून त्यांची श्रद्धा व्यक्त होते: येशूवर त्यांचा इतका पूर्ण विश्वास बसला होता की त्याला सोडून जाणे हा निव्वळ मूर्खपणा ठरला असता. ते कोणाकडे जाणार होते? ते त्याला का सोडणार होते? त्या क्षणी येशूचे अनुसरण करणे ही ‘लोकप्रिय’ निवड नव्हती, तरीही पेत्र येशूवरील आपली श्रद्धा पुन्हा ठामपणे व्यक्त करतो.

आज तुम्ही येशूशी किती निष्ठेने बांधील आहात, यावर चिंतन करा. त्याचे अनुसरण करायचे की त्याला सोडून जायचे, हे ठरवण्याचे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, हे लक्षात ठेवा. पण त्याचे अनुसरण करण्याचे तुम्ही ठरवले, तर ते अर्धवट मनाने करू नका. येशूची वचने सामर्थ्यशाली आहेत; ती आपल्यासमोर आव्हान ठेवतात आणि आपल्याकडून बरेच काही मागतात. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि पूर्ण अंतःकरणाने व दृढ निष्ठेने त्याचे अनुसरण करावे, अशी त्याची इच्छा आहे. सार्वकालिक जीवनाची वचने केवळ येशूजवळच आहेत; आपण ती वचने पूर्ण ताकदीनिशी स्वीकारली पाहिजेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

हे प्रभू, मी तुझ्यामागे आलो नाही, तर दुसऱ्या कोणाकडे जाऊ? तुझ्यावरच विश्वास ठेवण्याची आणि तुझ्यामागे चालण्याची मी निवड करतो. तू जे काही शिकवले आहेस ते सर्व मनापासून स्वीकारायला आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी स्वेच्छेने तुझी निवड करायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पुनरुत्थानकाळाचा चौथा आठवडा

अनुक्रमणिका


मऊ बांधणीच्या पुस्तकाच्या स्वरूपात & ई-पुस्तक म्हणूनही उपलब्ध