मराठी

आगमनकाळ—तिसरा आठवडा

चारही खंड मऊ मुखपृष्ठाच्या छापील पुस्तकांच्या & ई-पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत!

अ‍ॅमेझॉन – गूगल प्ले – आयट्यून्स – बार्न्स अँड नोबल – आणि इतर ठिकाणीही!

अनुक्रमणिका


टीप: 16 डिसेंबरपर्यंत या प्रकरणातील चिंतनांचा उपयोग करा. त्या दिवसापासूनची योग्य चिंतने वाचण्यासाठी 17 डिसेंबरला थेट पुढील प्रकरणाकडे जा.

क्रुसात आनंद मानणे

आगमनकाळातील तिसरा रविवार (वर्ष अ)

“तुम्ही जे ऐकता आणि पाहता ते जाऊन योहानाला सांगा: आंधळ्यांना पुन्हा दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिऱ्यांना ऐकू येते, मृतांना पुन्हा जिवंत केले जाते आणि गरिबांना सुवार्ता सांगितली जाते. आणि जो माझ्यामुळे अडखळत नाही, तो धन्य.” मत्तय 11:4–6

कल्पना करा की तुमच्या चर्चमध्ये धर्मजागृतीचे आयोजन करण्यासाठी एक धर्मगुरू आले. त्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी चमत्कार करून आंधळ्यांना, अपंगांना, असाध्य आजाराने मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्यांना आणि बहिऱ्यांना बरे केले. त्यांनी मृतांनाही पुन्हा जिवंत केले तर? तुमची प्रतिक्रिया काय असेल? बहुधा तुम्ही थक्क व्हाल! तुम्ही आपल्या सर्व जवळच्या लोकांशी संपर्क साधाल, त्यांना त्या चमत्कारांविषयी सांगाल आणि पुढच्या सत्राला येण्याचा आग्रह कराल.

येशूंच्या सेवाकार्यात अनेक चमत्कार घडले, पण ते त्यांच्या कार्याचा सर्वांत महत्त्वाचा भाग मुळीच नव्हते. त्यांच्या चमत्कारांनी अशी शरीरे बरी झाली जी कधी ना कधी मरणारच होती; पण त्यांच्या उपदेशाने सदैव जिवंत राहणारे आत्मे बरे झाले. कारण त्यांचा उपदेश अखेरीस त्यांच्या सर्वांत महान कार्याकडे बोट दाखवत होता: आत्म्यांच्या तारणासाठी दुःख सहन करणे आणि मरण पत्करणे.

येशू या पृथ्वीवर वावरत होते, चमत्कार करत होते, सुवार्ता सांगत होते, आणि त्यांनी मरण पत्करून पुन्हा उठण्याचा तो काळ तुम्ही अनुभवला असता, तर त्यांच्या कोणत्या कृतीचा तुमच्यावर सर्वाधिक परिणाम झाला असता? आपल्या प्रभूच्या कार्याचा विचार करताना आपण ते एकसंधपणे पाहिले पाहिजे आणि त्यातील सर्वांत महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता कामा नये. श्रद्धेच्या दृष्टीने पाहता, येशूंचे दुःखसहन, मरण आणि पुनरुत्थान हीच त्यांची सर्वांत महान कृत्ये आहेत. दुःख आणि मरण स्वेच्छेने स्वीकारून त्यांनी सर्वांत वाईट गोष्टीचे रूपांतर सर्वांत उत्तम गोष्टीत केले: पापाचा परिणाम असलेले मरण त्यांनी अनंत जीवनाचे साधन बनवले. “आणि जो माझ्यामुळे अडखळत नाही, तो धन्य,” असे म्हणताना येशूंनी ज्यांना त्यांच्या क्रुसाचे अतिशय मोठे मोल उमगले, त्यांना धन्य म्हटले.

येशूंनी चमत्कार करावेत की त्यांनी दुःख सहन करून मरण पत्करावे, यांपैकी काय पाहायला आवडेल, असे आपण त्यांच्या पहिल्या अनुयायांना विचारले असते, तर त्यांनी बहुधा चमत्कार पाहणेच पसंत केले असते. अशा प्रश्नाने कदाचित ते गोंधळूनही गेले असते. एका महान संदेष्ट्याला दुःख सहन करताना आणि मरताना पाहावे, असे कोणाला का वाटेल? तरीही आज धर्मशास्त्राच्या दृष्टीने हे स्पष्ट आहे की येशूंचे दुःखसहन, मरण आणि पुनरुत्थान ही मानवी इतिहासातील सर्वांत महान कृत्ये आहेत.

आपली धन्य माता मरिया हिच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा. तिने हे सर्व पाहिले, तिचा पुत्र क्रुसाचे दुःख सोसत असताना ती त्याच्या पाठीशी उभी राहिली आणि तो पुन्हा उठला तेव्हा त्याच्यासोबत आनंदित झाली. आपल्या पुत्राचे काही चमत्कार पाहणे आवडेल की जगाला तारण मिळवून देणाऱ्या त्याच्या परिपूर्ण बलिदानाची साक्षीदार होणे आवडेल, असे आपण आपल्या धन्य मातेला विचारले असते, तर तिच्या पवित्र आणि दुःखी हृदयाने निःसंशयपणे त्याचे बलिदान पाहणेच निवडले असते.

आज आपल्या स्वतःच्या जीवनाच्या संदर्भात या प्रश्नांवर चिंतन करा. प्रार्थना करताना तुम्ही मुख्यतः काही कृपा, आशीर्वाद किंवा चमत्कार मागता का? की क्रूस स्वीकारता यावा म्हणून तुम्ही प्रामुख्याने प्रार्थना करता? देवाने तुमच्या जीवनातील काही दुःख दूर करावे यात तुम्हाला अधिक मोल वाटते, की त्याच्या क्रुसाच्या सामर्थ्याने तुमच्या दुःखाचे रूपांतर व्हावे यात? आपल्या प्रभूबरोबर मरण्यासाठी आणि प्रेमाचे जिवंत अर्पण होण्यासाठी कृपा मागा; इतरांसाठी आपले जीवन अर्पण करण्याचे बळ मागा. ज्याचे मोल चिरंतन आहे ते निवडून तुम्ही अधिक चांगला वाटा निवडता, आणि त्या वाट्यात तुम्हाला सदैव आनंद मिळेल.

हे माझ्या प्रभू, तू स्वतःचे बलिदान दिलेस. तुझे दुःखसहन आणि मरण यांमुळे मी अडखळू नये, वेदना, रक्त आणि देहाचे मरण यांच्या पलीकडे पाहावे आणि तुझ्या बलिदानाची अथांग समृद्धी शोधावी, असे आमंत्रण तू मला देतोस. मला श्रद्धेची दृष्टी दे, म्हणजे मला तुझा क्रूस स्वीकारण्याचे मोल तर समजेलच, पण तुझ्याबरोबर माझे जीवन अर्पण करून तुझे दुःखसहन माझ्या स्वतःच्या जीवनात जगण्याचे मोलही समजेल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


टीप: 16 डिसेंबरपर्यंत या प्रकरणातील चिंतनांचा उपयोग करा. त्या दिवसापासूनची योग्य चिंतने वाचण्यासाठी 17 डिसेंबरला थेट पुढील प्रकरणाकडे जा.

देवदूतांच्या कार्यात सहभागी होणे

आगमनकाळातील तिसरा रविवार (वर्ष ब)

देवाने योहान नावाच्या एका मनुष्याला पाठवले. तो साक्ष देण्यासाठी, म्हणजे प्रकाशाविषयी साक्ष देण्यासाठी आला, जेणेकरून त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. तो स्वतः प्रकाश नव्हता, तर प्रकाशाविषयी साक्ष देण्यासाठी आला होता. योहान 1:6–8

बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाला “देवाने पाठवले” होते. त्यामुळे तो देवाचा संदेशवाहक होता. संत योहान क्रिसोस्टोम त्याच्याविषयी म्हणतात: “आपल्या पदरचे काहीही न सांगण्यातच संदेशवाहकाचे श्रेष्ठत्व आहे.” योहानाचे सेवाकार्य ही त्याची स्वतःची कल्पना नव्हती. स्वतःच्या कौशल्याच्या बळावर त्याने नावीन्यपूर्ण प्रवचने तयार केली नाहीत. वक्तृत्वकला शिकण्यासाठी तो शाळेत गेला नाही. त्याचे कार्य अगदी साधे होते. देवाने त्याला जे सांगायला सांगितले तेवढेच त्याने सांगितले—ना त्याहून अधिक, ना कमी, ना त्यापेक्षा वेगळे काही.

आरंभीच्या ख्रिस्तसभेत योहान हा देवदूत होता असे शिकवणारी एक पाखंडी शिकवण होती. या शिकवणीला उत्तर देताना संत थॉमस अक्विनास योहानाच्या सुवार्तेवरील आपल्या भाष्यात म्हणतात, “खरे तर, योहान स्वभावतः देवदूत नव्हता, तरी त्याच्यावर सोपवलेल्या कार्याच्या दृष्टीने तो देवदूत होता, कारण त्याला देवाने पाठवले होते.” हे विचार करायला लावणारे विधान एका आध्यात्मिक सत्याकडे लक्ष वेधते: देवदूत हे पूर्णपणे आध्यात्मिक प्राणी असल्यामुळे ते मानवांपेक्षा वेगळे आहेत; तरीही मानवांना संदेशवाहक म्हणून देवदूतांच्या कार्यात सहभागी होण्याचे पाचारण आहे.

देवाने जे बोलण्याची प्रेरणा दिली तेवढेच योहान बोलला. म्हणूनच तो सर्व संदेशवाहकांमध्ये श्रेष्ठ ठरला आणि त्याचे कार्य खऱ्या अर्थाने देवदूताचे कार्य होते. आपणही तसेच केले पाहिजे. सुवार्ता सांगताना केंद्रस्थानी आपण नसतो. आपली कहाणी सांगून लोकांवर छाप पाडणे, आपल्या बुद्धिमत्तेमुळे नाव कमावणे किंवा आपल्या शब्दकौशल्याने लोकांना प्रेरित करणे, हा सुवार्ता सांगण्याचा हेतू नाही. देव आपल्या जीवनकथेचा, बुद्धिमत्तेचा किंवा शब्दकौशल्याचा उपयोग करू शकतो. पण देव आपल्याला जो संदेश सांगण्याची प्रेरणा देतो तोच आपण सांगतो आणि तो जसे वागण्याची प्रेरणा देतो तसेच वागतो, तेव्हाच आपण त्याचे खरे संदेशवाहक ठरतो.

सुवार्ता सांगण्यासाठी मोठी नम्रता लागते. इतरांना सुवार्ता सांगताना आपल्या बोलण्यात आणि कृतीत देवाच्या इच्छेकडे आपले लक्ष असते, तेव्हाच आपण नम्र असतो. आपण स्वतःच्या मनाने काहीही बोलू किंवा करू नये. देवाने प्रेरित केलेल्या संदेशाच्या आड आपण येऊ नये म्हणून आपल्या भावनांच्या आवेगांना, उस्फूर्त प्रतिक्रियांना आणि इच्छांना शिस्त लावली पाहिजे. येशू हाच तो शब्द आहे, जो आपण इतरांपर्यंत पोहोचवला पाहिजे. तो जिवंत शब्द आहे. म्हणून लक्ष त्याच्यावर असले पाहिजे, आपल्यावर नव्हे.

देवदूतांप्रमाणेच तुम्हालाही सोपवलेल्या पवित्र कार्यावर आज चिंतन करा. देवदूत हे शुद्ध आत्मे असल्याने ते एका अनोख्या रीतीने संदेश देतात. आपणही देवाच्या निर्देशानुसार त्याचे संदेशवाहक झाले पाहिजे. देव तुम्हाला कोणाकोणाला सुवार्ता सांगण्याची प्रेरणा देतो, याचा विचार करा. असे करताना देवाचा आवाज ऐकण्यासाठी अंतःकरणाचे कान लावून ठेवा. स्वतःच्या मनाने काहीही बोलू नये किंवा करू नये, यासाठी नम्रपणे प्रयत्न करा. योहानाने हे अगदी परिपूर्ण रीतीने केले; आपणही तसेच केले पाहिजे.

हे देवाच्या गौरवशाली शब्दा, लोकांना त्यांच्या जीवनात तुझीच गरज आहे. तुझी पवित्र इच्छा कळवणारा तुझा नम्र संदेशवाहक होण्यासाठी तू मला बोलावतोस. माझ्या सभोवतालच्या लोकांना जो संदेश ऐकण्याची गरज आहे, तो तू माझ्यावर अधिक विश्वासाने सोपवू शकावास म्हणून माझे मन आणि अंतःकरण तुझ्या प्रेरणेसाठी खुले ठेवण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


टीप: 16 डिसेंबरपर्यंत या प्रकरणातील चिंतनांचा उपयोग करा. त्या दिवसासाठीचे योग्य चिंतन वाचण्यासाठी 17 डिसेंबरला पुढील प्रकरणाकडे जा.

प्रीती आणि पश्चात्ताप

आगमनकाळातील तिसरा रविवार (वर्ष क)

लोकसमुदायाने बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाला विचारले, “आम्ही काय करावे?” त्याने त्यांना उत्तर दिले, “ज्याच्याजवळ दोन अंगरखे आहेत, त्याने त्यांपैकी एक अंगरखा ज्याच्याजवळ एकही नाही त्याला द्यावा. आणि ज्याच्याजवळ अन्न आहे, त्यानेही तसेच करावे.” लूक 3:10–11

बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचा उपदेश ऐकण्यासाठी लोकांचे थवे रानात येत होते. योहानाने त्यांना कडक शब्दांत फटकारले, “अहो सापांच्या पिलांनो! येणाऱ्या कोपापासून पळून जाण्याचा इशारा तुम्हाला कोणी दिला? तुमच्या पश्चात्तापाचा पुरावा म्हणून चांगली फळे द्या…” (लूक 3:7–8). हे ऐकल्यावर त्यांनी योहानाला विचारले की, आपण काय करावे.

त्या काळी विषारी सापांचा संबंध कपट, धोका आणि मृत्यू यांच्याशी जोडला जात असे. नराने मादीच्या शरीरातील अंडी फलित केल्यावर मादी त्या नराला मारून टाकते, असा सर्वसाधारण समज होता. पिले जन्माला आल्यावर ती आपल्या आईला मारून टाकतात, असेही लोक मानत. हा समज वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा असला, तरी योहानाने इतक्या कडक शब्दांत टीका का केली आणि ज्यांना त्याने साप म्हटले ते कसे वागत होते, हे समजण्यास तो मदत करतो.

आपण अब्राहामाचे वंशज आहोत एवढ्याच कारणाने आपले तारण होईल, असे त्या काळी अनेकांना वाटत असे. त्यांना “सापांची पिले” म्हणून फटकारताना योहानाने दाखवून दिले की त्यांच्यापैकी अनेकांनी आपला वंशपरंपरागत वारसाच नाकारला होता. कारण लोकांनी पश्चात्ताप करावा आणि देवाच्या कराराशी विश्वासू राहावे, असे सतत आवाहन करणाऱ्या संदेष्ट्यांचा संदेश त्यांनी नाकारला होता. जुन्या करारातील शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ संदेष्टा या नात्याने योहानाने आपल्या पश्चात्तापाच्या संदेशातून लोकांना पुन्हा त्या संदेष्ट्यांच्या संदेशाकडे वळवले. पश्चात्ताप करण्यास नकार देऊन त्यांनी त्या संदेष्ट्यांना जणू ‘मारून टाकले’ होते.

आजही हाच संदेश ऐकण्याची गरज अनेकांना आहे. केवळ कॅथलिक कुटुंबात जन्माला आलो म्हणून आपले तारण होईल, असा समज आजही अनेकांमध्ये आहे. बाप्तिस्मा हे कृपामय जीवनाचे प्रवेशद्वार आहे; पण केवळ बाप्तिस्म्याने आपले तारण होणार नाही. त्याला पश्चात्तापाची आणि प्रीतीची जोड असली पाहिजे.

आपल्या पश्चात्तापाचा पुरावा म्हणून चांगली फळे द्या, असे योहानाने लोकांना सांगितले. त्यासाठी त्याने ठोस मार्गही दाखवले—उदाहरणार्थ, आपले कपडे आणि अन्न गरजूंबरोबर वाटून घेणे. अशा रीतीने त्याने लोकांना अब्राहामाची खरी संतती होण्यास सांगितले: त्यांनी केवळ दहा आज्ञाच पाळू नयेत, तर त्याच्याआधी आलेल्या अनेक संदेष्ट्यांच्या उपदेशानुसारही वागावे. बाप्तिस्मा घेण्यासाठी आलेल्या जकातदारांना आणि सैनिकांनाही त्याने असेच व्यवहार्य मार्गदर्शन केले.

“तुमच्या पश्चात्तापाचा पुरावा म्हणून चांगली फळे” तुमच्या जीवनातील प्रीतीतून स्पष्टपणे दिसतात का, यावर आज चिंतन करा. ख्रिस्ती प्रीती ही स्वाभाविक प्रेमापेक्षा फार वेगळी आहे. स्वाभाविक प्रेम ही एक भावना आहे; ती आपल्याला जे आवडते त्याकडे ओढते. ख्रिस्ती प्रीती निःस्वार्थ आणि त्यागशील असते. ती आपल्याला आपल्या सभोवतालच्या लोकांचे भले करण्यास प्रवृत्त करते, विशेषतः त्यांना ख्रिस्ताकडे आणि तारणाकडे नेणारे कार्य करण्यास. प्रीती जीवन देते; ती स्वार्थापोटी दुसऱ्यांकडून घेत नाही. आपल्या जीवनात खरी ख्रिस्ती प्रीती नसेल, तर आपण पश्चात्ताप न केलेलेच राहतो आणि “सापांची पिले” ही फटकार ऐकण्यास पात्र ठरतो. आज योहानाचा उपदेश ऐका आणि चांगली फळे द्या. पापांचा पश्चात्ताप करून आणि खरी प्रीती कृतीतून दाखवून आपण आपला प्रभू आणि तारणारा ख्रिस्त याच्याशी खऱ्या अर्थाने एकरूप होतो, तेव्हाच ही फळे येतात.

हे प्रेमळ प्रभू, तू आपल्या जीवनात परिपूर्ण प्रीती प्रकट केलीस. एवढेच नव्हे, तर मी माझ्या पापाचा पश्चात्ताप करतो तेव्हा तुझ्या हृदयाने प्रेम करण्याची शक्तीही तू मला देतोस. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने केलेली कानउघाडणी मी मनावर घ्यावी आणि निःस्वार्थपणे व त्यागभावनेने माझ्या बाप्तिस्म्याला अनुरूप जीवन जगावे. तुझ्या पवित्र हृदयातील प्रीतीने मी इतरांवर आणि तुझ्यावर प्रेम करावे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


टीप: 16 डिसेंबरपर्यंत या प्रकरणातील चिंतनांचा उपयोग करा. त्या दिवसासाठीचे योग्य चिंतन वाचण्यासाठी 17 डिसेंबरला पुढील प्रकरणाकडे जा.

अविवेकाला सामोरे जाणे

आगमनकाळातील तिसऱ्या आठवड्याचा सोमवार

येशू मंदिराच्या परिसरात आला आणि शिकवत असताना मुख्य याजक व लोकांचे वडीलजन त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, “तू कोणत्या अधिकाराने ही कृत्ये करतोस? आणि हा अधिकार तुला कोणी दिला?” मत्तय 21:23

मुख्य याजक आणि लोकांचे वडीलधारी नेते यांच्यावर लोकांना शाश्वत तारणाकडे नेण्याची जबाबदारी होती. त्यांनी देवाची इच्छा पूर्ण करण्याची साधने व्हावे, संदेष्ट्यांप्रमाणे देवाचा संदेश सांगावा आणि पापांच्या प्रायश्चित्तासाठी पवित्र यज्ञ अर्पण करणारे याजक व्हावे, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र त्यांनी यापैकी कोणतीही भूमिका पार पाडली नाही.

शुभवर्तमानातील हा उतारा जसजसा पुढे जातो, तसतसे येशूने त्यांना इतक्या ठामपणे का फटकारले, हे अधिक स्पष्ट होते. “येशूने त्यांना उत्तर दिले, ‘मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही मला त्याचे उत्तर दिले, तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो हे मीही तुम्हाला सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा कोठून आला होता? तो स्वर्गाकडून होता की माणसांकडून?’” (मत्तय 21:24–25). दोन्हीपैकी कोणतेही उत्तर त्यांच्या हेतूला सोयीचे नव्हते, म्हणून धर्मनेत्यांनी उत्तर देण्याचे नाकारले. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गाकडून होता असे म्हटले, तर ‘मग तुम्ही योहानावर विश्वास का ठेवला नाही?’ असे येशू विचारेल, अशी त्यांना भीती होती. तो माणसांकडून होता असे म्हटले, तर योहानाला संदेष्टा मानणाऱ्या जमावाची त्यांना भीती होती. म्हणून त्यांनी सोयीची वाट धरली आणि म्हटले, “आम्हाला माहीत नाही.” त्यामुळे येशूनेही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

या धर्मनेत्यांना येशूने ज्या प्रकारे उत्तर दिले, त्यावरून आपल्या जीवनात आपल्या श्रद्धेला थेट आव्हान देणाऱ्यांना कसा प्रतिसाद द्यावा, हे आपल्याला समजते. काही वेळा आपल्याला अविवेकी टीकेला सामोरे जावे लागते. अशा वेळी रागावून त्या टीकेवरून वाद घालण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो. पण अशा संभाषणातून अनेकदा काहीच साधत नाही.

या उताऱ्यात आपल्या प्रभूने अविवेकाला अगदी वेगळ्या प्रकारे हाताळले. देव या नात्याने येशूने या धर्मनेत्यांचा न्याय केला, तरी एक मनुष्य म्हणून त्यांच्याशी बोलताना त्याने त्यांना दोषी ठरवण्याचा किंवा स्वतःचा बचाव करण्याचा पवित्रा घेतला नाही. उलट, त्याने असा प्रश्न विचारला की त्यांना स्वतःच्या अविवेकाला सामोरे जावे लागले आणि तो उघड झाला. त्यांनी आपला अविवेक मान्य करण्यास नकार दिला तेव्हा येशू मौन राहिला.

यातून एक गोष्ट लक्षात येते: एखाद्याच्या अविवेकी बोलण्याला त्याच पातळीवर उतरून उत्तर देण्यात क्वचितच काही फायदा असतो. त्यांनी आपल्याला दोष दिला तरी मनातल्या मनात त्यांना क्षमा करणे म्हणजे त्यांच्याशी त्यावरून वाद घालणे आवश्यक आहे असे नाही. कोणी नम्रपणे आणि प्रामाणिकपणे आपल्याला जाब विचारला, तर समंजस संवादाला वाव मिळतो. पण आपल्या कृतींविषयीचे त्यांचे प्रश्न अविवेकी असतील, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच बहुतेकदा योग्य ठरते. ही प्रेमाची वाट आहे: यात आपण आपल्या प्रभूचे अनुकरण करतो, अविवेकी टीकेची धार कमी होते आणि नंतर अधिक समंजस संवाद साधण्याची शक्यता निर्माण होते.

येशूला त्याच्या काळातील अविवेकी धर्मनेत्यांशी वागताना जो अनुभव आला, तसाच अनुभव तुम्हालाही तुमच्या जीवनातील काही व्यक्तींशी वागताना येतो का, यावर आज चिंतन करा. काही जणांना खंबीरपणे साथ देणारे आणि दृढ श्रद्धा असलेले कुटुंबीय व मित्र लाभतात, तर इतरांना तसे भाग्य लाभत नाही. टीका झाली तरी तुम्ही आपली श्रद्धा उघडपणे कशी जगावी, अशी देवाची इच्छा आहे, याचा विचार करा. टीका होते तेव्हा येशूने दाखवलेल्या नम्रतेचे आणि सुज्ञतेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही अपायकारक आणि अविवेकी संभाषणांत ओढले जाणार नाही.

हे खऱ्या ज्ञानाच्या प्रभू, परिपूर्ण प्रीतीने आणि सत्यनिष्ठेने लोकांशी कसे वागावे, हे तुला नेहमीच माहीत होते. ज्यांना तुझ्या करुणेची गरज होती त्यांच्याशी तू करुणेने वागलास. जे अविवेकी होते त्यांना तू नम्रपणे त्यांचा अविवेक दाखवून दिलास. मला सुज्ञतेचे वरदान दे, म्हणजे माझ्या जीवनातील लोकांशी मी नेहमी तुझ्या पवित्र इच्छेनुसार वागेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


टीप: 16 डिसेंबरपर्यंत या प्रकरणातील चिंतनांचा उपयोग करा. त्या दिवसासाठीचे योग्य चिंतन वाचण्यासाठी 17 डिसेंबरला पुढील प्रकरणाकडे जा.

नम्रपणे पश्चात्ताप करा आणि आज्ञा पाळा

आगमनकाळाच्या तिसऱ्या आठवड्यातील मंगळवार

“तुम्हाला काय वाटते? एका माणसाला दोन मुलगे होते. तो पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘बाळा, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.’ मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ पण नंतर त्याने आपले मन बदलले आणि तो गेला. तो माणूस दुसऱ्या मुलाकडे गेला आणि त्यालाही तीच आज्ञा दिली. त्याने उत्तर दिले, ‘होय, बाबा,’ पण तो गेला नाही. त्या दोघांपैकी कोणी आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली?” मत्तय 21:28–31

येशूने हा प्रश्न मुख्य याजकांना आणि लोकांच्या वडीलधाऱ्या नेत्यांना विचारला. उताऱ्यात पुढे येशू त्यांना त्यांची जागा दाखवून देत म्हणतो, “आमेन, मी तुम्हाला सांगतो, जकातदार आणि वेश्या तुमच्या आधी देवाच्या राज्यात प्रवेश करत आहेत.” मुख्य याजक आणि लोकांचे वडीलधारी नेते हे दुसऱ्या मुलासारखे होते, असे तो स्पष्ट करतो. त्यांनी देवाच्या आज्ञा पाळण्याची केवळ तोंडदेखली तयारी दाखवली, पण नम्रपणे पश्चात्ताप करून त्या आज्ञा पाळल्या नाहीत.

“जकातदार आणि वेश्या” देवाच्या राज्यात प्रवेश करत होते, ही गोष्ट आपल्याला मोठी आशा देते. जो कोणी नम्रपणे देवाचे ऐकतो, पश्चात्ताप करतो आणि त्याच्या आज्ञा पाळू लागतो, तो देवाच्या दयेपासून वंचित नाही. दोन्ही मुलांपैकी कोणाचाही प्रतिसाद आदर्श नव्हता, तरी आपण पहिल्या मुलासारखे अधिक असावे, अशी आशा करूया.

जेव्हा आपण देवाचे वचन ऐकतो आणि पवित्रतेत अधिकाधिक वाढण्याचे त्याचे आवाहन समजून घेतो, तेव्हा ते आपल्याला आव्हानात्मक वाटते. शुभवर्तमानाचा अधिक खोल अर्थ आपल्याला उलगडतो, तेव्हा अनेकदा आपली पहिली प्रतिक्रिया “नाही!” अशी असते. आपल्या पापी सवयी सोडणे कठीण असते आणि आपल्या पतित मानवी स्वभावाला देवाच्या इच्छेनुसार वळवणेही अवघड असते. त्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे सुरुवातीला कठीण वाटले, तर आश्चर्य मानू नका.

देवाचा आवाज आणि त्याची इच्छा आपल्याला अधिक स्पष्टपणे समजू लागतात, तेव्हा आपला पहिला प्रतिसाद नेहमी पश्चात्तापाचाच असला पाहिजे. याचे आपल्याला आश्चर्य वाटायला नको. देवाच्या अधिक जवळ जायचे असेल आणि त्याच्या इच्छेनुसार जगायचे असेल, तर आपण पश्चात्तापाची सवय लावून घेतली पाहिजे. सुरुवातीला पश्चात्ताप करणे आपल्याला अनेकदा नकोसे वाटते, पण तसे व्हायला नको. देव आपल्याला आज्ञापालनासाठी बोलावतो, तेव्हा पहिल्या मुलाप्रमाणे आपणही ‘नाही’ म्हणू. पण पश्चात्तापाची सवय लावून घेतली, तर कालांतराने पश्चात्ताप करण्यातच आपल्याला मोठा आनंद मिळेल. हळूहळू आपले उत्तर ‘हो, मी जाईन’ असे होईल. आणि मग आज्ञापालनाचे मोल समजल्यामुळे आपण खरोखर जाऊ.

आज यावर चिंतन करा: तुम्ही अनेकदा केवळ तोंडदेखले देवाचे म्हणणे मान्य करून त्याच्या इच्छेनुसार वागत असल्याचे भासवता का? की पश्चात्ताप करण्याची देवाची हाक तुम्हाला नेहमीच अधिकाधिक खोलवर जाणवते? पश्चात्ताप करणाऱ्या जकातदारांच्या आणि वेश्यांच्या जागी स्वतःला पाहा. आपली पापे त्यांच्या निदर्शनास आणून दिली गेली, तेव्हा त्यांनी जी नम्रता दाखवली, तिचे अनुकरण करा. पश्चात्ताप ही स्वातंत्र्याची सुरुवात आहे आणि देवाशी अधिक एकरूप होण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे, हे लक्षात ठेवा.

हे माझ्या प्रभू, तुझ्या मागण्या कठीण असल्या तरी तुझी प्रत्येक आज्ञा प्रेमाची आज्ञा आहे. तुझे आज्ञापालन करणे सुरुवातीला अनेकदा कठीण जाते, तरी त्याचे मोठे मोल मला समजू दे. तुझा आवाज ऐकण्यासाठी, माझ्या पापाचा पश्चात्ताप करण्यासाठी आणि सर्व गोष्टींत तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मला आवश्यक ते धैर्य आणि निष्ठा दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


टीप: 16 डिसेंबरपर्यंत या प्रकरणातील चिंतनांचा उपयोग करा. त्या दिवसासाठीचे योग्य चिंतन वाचण्यासाठी 17 डिसेंबरला पुढील प्रकरणाकडे जा.

मशीहाचे कार्य

आगमनकाळाच्या तिसऱ्या आठवड्यातील बुधवार

त्या वेळी योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलावले आणि प्रभूकडे असे विचारायला पाठवले, “जो येणार आहे तो तूच आहेस का, की आम्ही दुसऱ्या कोणाची वाट पाहावी?” लूक 7:18–19

यशया संदेष्ट्याने सांगितले होते की मशीहा येईल तेव्हा, “आंधळ्यांच्या डोळ्यांना दिसू लागेल आणि बहिऱ्यांचे कान उघडतील. मग लंगडा हरिणासारखी उडी मारील आणि मुक्याची जीभ आनंदाने गाईल” (यशया 35:5–6). म्हणूनच, बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचे दोन शिष्य येशूला तोच मशीहा आहे का, हे विचारायला आले, तेव्हा येशूने उत्तर दिले, “तुम्ही जे पाहिले व ऐकले ते जाऊन योहानाला सांगा: आंधळ्यांना पुन्हा दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिऱ्यांना ऐकू येते, मृतांना पुन्हा जिवंत केले जाते आणि गरिबांना शुभवर्तमान सांगितले जाते” (लूक 7:22).

येशू खरोखरच मशीहा होता! त्याने केलेली कृत्ये आणि त्याने घोषित केलेले शुभवर्तमान यांवरून याची खात्री पटली. यशया संदेष्ट्याने ज्याच्याविषयी सांगितले होते आणि देवाचे लोक ज्याची वाट पाहत होते, तो हाच होता.

आज बहुतेक लोकांनी एखादा दृश्य चमत्कार घडताना प्रत्यक्ष पाहिलेला नसला, तरी येशूचे चमत्कार आजही आपल्याला त्याच्याविषयी साक्ष देतात. तोच आपला मशीहा आहे आणि आपण केवळ त्याचेच अनुसरण केले पाहिजे, याची खात्री त्याच्या चमत्कारांतून आपण करून घेतली पाहिजे. त्यामुळे त्याने आपल्या सार्वजनिक सेवाकार्यात जे काही घोषित केले, ते सर्व आपण दृढ विश्वासाने स्वीकारू.

कधीकधी येशूला आपला मशीहा म्हणून आपल्या जीवनात स्वीकारण्यापेक्षा चमत्कार घडावेत, अशीच आपल्याला अधिक ओढ असते. चमत्कार करणे हा येशूच्या सेवाकार्याचा अंतिम उद्देश नव्हता. तो तेव्हा कोण होता आणि आजही कोण आहे, याची साक्ष देण्यासाठी त्याने त्या चिन्हांचा उपयोग केला. फार पूर्वी दिलेली ती साक्ष जशी ती चिन्हे प्रत्यक्ष पाहणाऱ्यांसाठी होती, तशीच ती आज आपल्यासाठीही आहे.

बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने तुरुंगातून आपल्या शिष्यांना येशूकडे पाठवले, या प्रसंगावर चिंतन करताना स्वतःला योहानाच्या जागी पाहा. योहानाने येशूच्या सार्वजनिक सेवाकार्याची केवळ सुरुवात पाहिली होती आणि कदाचित त्याचा एकही चमत्कार प्रत्यक्ष पाहिला नव्हता. तरी यशयाने ज्याच्याविषयी भविष्यवाणी केली, तो मशीहा येशूच आहे, असा विश्वास ठेवण्यासाठी चमत्कारांविषयी इतरांनी दिलेली साक्ष योहानाला पुरेशी होती. त्याचप्रमाणे, येशूचे अनेक चमत्कार प्रत्यक्ष पाहणाऱ्या त्या पहिल्या शिष्यांची साक्ष आपल्यालाही विश्वास ठेवण्यासाठी पुरेशी ठरली पाहिजे. आपण विश्वास ठेवला की आपल्या प्रभूच्या कार्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आपल्या जीवनात घडेल: शुभवर्तमानाची घोषणा ऐकण्यासाठी आपली अंतःकरणे खुली होतील आणि आपण ती ऐकू. दृश्य चमत्कारांपेक्षा कितीतरी अधिक सामर्थ्याने शुभवर्तमानच आपल्याला अनंतकाळासाठी बदलेल.

आज यावर चिंतन करा: तुम्ही बहुतेक वेळा कशासाठी प्रार्थना करता आणि देवाकडे काय मागता? दुःख भोगणाऱ्यांसाठी आणि आजारी लोकांसाठी प्रार्थना करणे चांगले आहे. पण मशीहाने जो शुभवर्तमानाचा संपूर्ण संदेश घोषित केला आणि जो तो आजही घोषित करत आहे, तो ऐकणे आणि तो ऐकता यावा म्हणून प्रार्थना करणे त्याहून महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम अशी प्रार्थना करा की तुमची आणि तुम्ही ज्यांच्यासाठी प्रार्थना करता त्यांची अंतःकरणे देव जे काही सांगतो ते सर्व स्वीकारण्यासाठी दररोज खुली राहावीत, जेणेकरून मशीहाच्या कार्याचे फळ आपल्या जीवनात अनंतकाळ टिकेल.

हे माझ्या प्रभू, माझ्या मशीहा, आम्हाला पापापासून वाचवण्यासाठी आणि आमच्या जीवनात तुझी कृपा ओतण्यासाठी तू पृथ्वीवर आलास. माझे हृदय तुझ्या कृपेसाठी खुले कर, म्हणजे मशीहा म्हणून तू करत असलेल्या कार्याने माझ्यात परिवर्तन घडेल आणि तू मला जसा सेवक होण्यास बोलावले आहेस तसा मी होईन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


टीप: 16 डिसेंबरपर्यंत या प्रकरणातील चिंतनांचा उपयोग करा. त्या दिवसासाठीचे योग्य चिंतन वाचण्यासाठी 17 डिसेंबरला पुढील प्रकरणाकडे जा.

मनाने नम्र असणारे

आगमनकाळातील तिसऱ्या आठवड्याचा गुरुवार

बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचे निरोप घेऊन आलेले दूत निघून गेल्यावर, येशू जमलेल्या लोकांशी योहानाविषयी बोलू लागला. “तुम्ही वाळवंटात काय पाहायला गेला होतात…?” लूक 7:24

येशू जमावाला हा प्रश्न तीनदा विचारतो. पहिल्यांदा तो असा प्रश्न विचारतो, ज्याचे उत्तर उघड आहे: “वाऱ्याने डोलणारा बोरू पाहायला तुम्ही गेला होतात काय?” यातून हे स्पष्ट होते की योहान आपल्या उपदेशात डळमळणारा किंवा लोकमतानुसार तडजोड करणारा नव्हता. लोकांनी त्याचा संदेश स्वीकारला असो वा नसो, तो संदेश ठाम आणि स्पष्ट होता.

आपल्या जीवनात आपण सर्वप्रथम सत्याचा शोध घेतला पाहिजे, मग ते ऐकणे कठीण असले तरीही. शुभवर्तमान आपल्याला नेहमीच आव्हान देईल आणि आपल्याला आपल्या सुखसोयींच्या चौकटीबाहेर पडायला लावेल. याची जाणीव असेल, तर जीवन बदलणारा शुभवर्तमानाचा संदेश स्वीकारून तो आचरणात आणणे आणि पश्चात्तापाच्या आवाहनाला प्रतिसाद देणे आपल्याला सोपे जाईल. सत्य इतरांपर्यंत कसे पोहोचवावे, हेही आपण योहानाकडून शिकले पाहिजे. आपल्या बोलण्याचा आणि कृतीचा पाया नेहमी प्रेम असला पाहिजे; पण ते प्रेम सत्यावर आधारलेले असले पाहिजे. आपल्या बोलण्याला किंवा आपण आपल्या आचरणातून घालून दिलेल्या उदाहरणाला इतरांनी विरोध केला, तरी शुभवर्तमानातील तारणदायी सत्य पोहोचवण्याचे साधन होण्याचा आपला निर्धार त्या विरोधामुळे ढळू देता कामा नये.

दुसऱ्यांदा येशू असाच प्रश्न विचारतो: “उंची वस्त्रे घातलेल्या एखाद्या माणसाला पाहायला तुम्ही गेला होतात काय?” दुसऱ्या शब्दांत, खरे शुभवर्तमान सुखसोयींचे, भौतिक समृद्धीचे किंवा लौकिक प्रतिष्ठेचे आश्वासन देत नाही. या जगातील गोष्टी नाशवंत आहेत. खऱ्या शुभवर्तमानाचा शोध घेताना जे शाश्वत आहे तेच आपल्याला सापडेल. खऱ्या शुभवर्तमानाची घोषणा करण्यात आणि त्यानुसार जगण्यात गरिबी, त्याग, साधेपणा, नम्रता आणि उदारता यांसारखे अनेक गुण दिसून येतात.

शेवटी येशू विचारतो, “मग तुम्ही काय पाहायला गेला होतात? एखादा संदेष्टा? होय, मी तुम्हांला सांगतो, संदेष्ट्याहूनही श्रेष्ठ असा मनुष्य. त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे: पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवत आहे; तो तुझ्यापुढे तुझा मार्ग तयार करील. मी तुम्हांला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये योहानापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही…” (लूक 7: 26–28).

योहानाचा बाप्तिस्मा स्वीकारणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने समाजाने दूर लोटलेले लोक, जकातदार आणि वेश्या होत्या. त्यामुळे लवकरच सुरू होणाऱ्या ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी ते आधीच तयार झाले. अर्थात, श्रीमंत, प्रभावशाली आणि सत्ताधारी लोक, तसेच परुशी व शास्त्री यांनीही नम्र होऊन योहानाचे सेवाकार्य स्वीकारले असते, तर ख्रिस्त ज्या राज्याची स्थापना करण्यासाठी आला होता, त्या राज्याचे शुभवर्तमान स्वीकारण्यास तेही तयार झाले असते. दुःखाची गोष्ट अशी की त्यांचे वागणे “वाऱ्याने डोलणाऱ्या बोरूसारखे” आणि “उंची वस्त्रे घालणाऱ्या” लोकांसारखेच होते.

आज तुम्ही कोणाची संगत निवडता, यावर चिंतन करा. गरीब, साधे, पापी आणि समाजाने दूर लोटलेले लोक यांच्यात राहणे निवडा. नम्रतेमुळे तुम्हाला या जगाची पोकळ दिखाऊपणाची ओढ आणि इतर स्वार्थी प्रवृत्ती यांवर मात करता येईल. त्यामुळे तुम्हीही “देवाचा न्यायीपणा मान्य कराल,” देव तुमच्या निदर्शनास आणून देतो त्या पापांचा रोज पश्चात्ताप कराल आणि त्याच्या तारणदायी शुभवर्तमानावर व कृपेवर भरवसा ठेवाल.

हे माझ्या सत्यस्वरूप प्रभू, तुझे वचन पाप्यांच्या हृदयाला भेदते आणि त्यांनी पश्चात्ताप करून तुझ्याकडे वळले पाहिजे, याची त्यांना जाणीव करून देते. मला नम्र कर, म्हणजे तुझे वचन स्वीकारण्यास मी अधिक तयार होईन आणि पापापासून दूर होऊन तुझ्याकडे वळण्यास कधीही कचरणार नाही. सर्व सांसारिक ओढींपासून आणि गर्वापासून मला मुक्त कर, म्हणजे तुझ्यामागे चालणाऱ्या नम्र हृदयाच्या लोकांमध्ये माझाही समावेश होईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


टीप: 16 डिसेंबरपर्यंत या प्रकरणातील चिंतनांचा उपयोग करा. त्या दिवसासाठीचे योग्य चिंतन वाचण्यासाठी 17 डिसेंबरला पुढील प्रकरणाकडे जा.

कृपेची तेजस्वी ज्योत

आगमनकाळातील तिसऱ्या आठवड्याचा शुक्रवार

“योहान हा जळणारा आणि प्रकाश देणारा दिवा होता, आणि काही काळ त्याच्या प्रकाशात आनंद मानण्यात तुम्ही समाधानी होता. परंतु माझ्याजवळ योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी साक्ष आहे. पित्याने मला पूर्ण करण्यासाठी दिलेली जी कार्ये मी करतो, तीच कार्ये माझ्या बाजूने साक्ष देतात की पित्याने मला पाठवले आहे.” योहान 5:35–36

योहानाला “जळणारा आणि प्रकाश देणारा दिवा” म्हटले आहे आणि त्याचे अनुयायी “काही काळ त्याच्या प्रकाशात आनंद मानण्यात समाधानी होते.” या रूपकातून आपल्याला समजते की आपल्याला सतत मनपरिवर्तन आणि अंतःकरणातील बदल यांसाठी बोलावले आहे. आपल्या श्रद्धेच्या वाटचालीच्या सुरुवातीला ख्रिस्ताला “हो” म्हणणे हे केवळ पहिले पाऊल आहे. अनेकदा लोक तिथेच थांबतात आणि त्या पहिल्या निवडीवर समाधानी राहतात. पण शुभवर्तमान आपल्याला सतत श्रद्धेत अधिक खोल जाण्यास बोलावते. गंभीर पापांपासून दूर राहणे आणि देवावर श्रद्धा ठेवणे हे पहिले पाऊल आहे. पण ख्रिस्ताचे मनःपूर्वक अनुयायी होऊन शाश्वत गौरवाची सर्वोच्च उंची गाठण्यासाठी स्वतःला तयार करायचे असेल, तर यानंतर आणखी अनेक पावले उचलावी लागतील!

जेव्हा आपण प्रथम शुभवर्तमान ऐकतो आणि त्याच्या तारणदायी संदेशाला प्रतिसाद देतो, तेव्हा आपल्याला शांती आणि आनंद लाभतात. देव कोण आहे हे ज्याला उमजू लागते, अशा एखाद्या लहान मुलालाही ख्रिस्ती असण्यात आनंद मिळतो. मुले प्रथम पवित्र ख्रिस्तप्रसाद ग्रहण करतात आणि प्रथमच समेटाचा संस्कार स्वीकारतात, शुभवर्तमानातील कथा जाणून घेतात आणि योग्य काय व अयोग्य काय हे शिकतात. तेव्हा देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यात आणि प्रार्थना करू लागण्यात त्यांना समाधान वाटते व उत्साह येतो. त्याचप्रमाणे, एखाद्या प्रौढ व्यक्तीच्या जीवनात प्रथम मनपरिवर्तन घडते आणि ती देवाच्या मार्गाने चालण्याचा, प्रार्थनामय जीवनाला सुरुवात करण्याचा आणि देवाच्या इच्छेशी अधिक सुसंगत असे जीवन जगण्याचा प्रामाणिक निर्णय घेते, तेव्हा तिलाही आनंद आणि शांती लाभतात.

या शुभवर्तमानातील कदाचित सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे येशूचे हे शब्द: “माझ्याजवळ योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी साक्ष आहे.” पश्चात्ताप करा आणि मशीहाची वाट पाहा, हा योहानाचा संदेश म्हणजे आपले पहिले पाऊल आहे, शेवटचे नव्हे. पुढे येशू “पित्याने मला पूर्ण करण्यासाठी दिलेली कार्ये” यांविषयी बोलतो, तेव्हा तो आपल्या संपूर्ण सार्वजनिक सेवाकार्याविषयी, आपल्या मृत्यू व पुनरुत्थानाविषयी, आपण विपुलतेने दिलेल्या पवित्र आत्म्याविषयी आणि या तारणदायी कृत्यांचा आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनावर काळाच्या ओघात आणि अनंतकाळात होणाऱ्या परिणामांविषयी बोलत आहे.

योहानाचा पश्चात्तापाचा आरंभीचा संदेश हा हृदयाला आनंद देणारा प्रकाश आहे. पण योहानानंतर आपल्या प्रभूच्या व्यक्तीत जे काही प्रकट झाले, ते आपल्या कल्पनेपलीकडे तेजाने झळकणाऱ्या सूर्यासारखे आहे. आपण हळूहळू आणि सातत्याने देवाच्या तेजस्वी प्रकाशाकडे वळावे आणि दररोज त्या प्रकाशात अधिकाधिक न्हाऊन निघावे, अशी देवाची इच्छा आहे. तो प्रकाश म्हणजे स्वतः देवच. यासाठी सतत मनपरिवर्तन घडत राहणे, पापी सवयींपासून अधिक खोलवर शुद्ध होणे, अधिक नियमितपणे व मनापासून प्रार्थना करणे आणि देवावरील व इतरांवरील प्रेमात वाढणे आवश्यक आहे.

आपल्याआधी होऊन गेलेले थोर संत साक्ष देतात की चांगले असणे आणि संत असणे यात फरक आहे. चांगले असणे म्हणजे त्या जळत्या, प्रकाश देणाऱ्या दिव्याच्या उजेडाचा आनंद घेण्यासारखे आहे. संत असणे म्हणजे सूर्याच्या तेजात ओढले जाणे आणि आपल्या प्रभूच्या हृदयात धगधगणाऱ्या प्रेमाने स्वतःही पेटून उठणे.

देवाजवळ आपल्याला देण्यास याहून कितीतरी अधिक आहे, या आध्यात्मिक सत्यावर आज चिंतन करा. देव इतका पवित्र, इतका गौरवशाली आणि आपल्या आकलनाच्या इतका पलीकडे आहे की पवित्रतेत वाढण्याचा आपण कधीही कंटाळा करता कामा नये. स्वतःच्या जीवनाचा विचार करताना, ‘आहे तेवढे पुरे’ ही आत्मसंतुष्ट वृत्ती सोडण्याचा प्रयत्न करा आणि सर्वशक्तिमान देवाच्या तेजाकडे वळण्याचा अधिक मूलगामी निर्णय घ्या. तुमच्या जीवनातील श्रद्धेची ज्योत त्याला पुन्हा प्रज्वलित करू द्या आणि ती ज्योत भडकून तिचा प्रखर अग्नी होऊ द्या. त्या गौरवशाली ध्येयापर्यंत नेणाऱ्या कोणत्याही निःस्वार्थ त्यागाचा स्वर्गात आपल्याला कधीही पश्चात्ताप होणार नाही.

हे परमतेजस्वी प्रभू, कधी कधी तुझ्यावर माझे जेवढे प्रेम आहे तेवढ्यावरच मी समाधानी राहतो. त्यामुळे तुझ्या परिवर्तन घडवणाऱ्या प्रेमाग्नीच्या तेजात मला सहभागी करण्यासाठी तू मला अधिक जवळ ओढतोस, तेव्हा मी तुला तसे करू देत नाही. तुझ्या अधिक जवळ येण्याची ओढ माझ्यात पुन्हा जागव आणि थोर संत होण्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते करण्याचे धैर्य मला दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

अनुक्रमणिका


चारही खंड पेपरबॅक & ई-पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहेत!

अ‍ॅमेझॉन – गूगल प्ले – आयट्यून्स – बार्न्स अँड नोबल – आणि इतर ठिकाणीही!