मराठी

परिचय

अनुक्रमणिकेकडे परत जा

आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर आपण आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, मनाने, आत्म्याने आणि सर्व सामर्थ्याने प्रेम करावे, असे आपल्याला पाचारण आहे (पाहा मत्तय 22:37). ख्रिस्ती म्हणून जगायचे असेल, तर ही ऐच्छिक गोष्ट नाही! ही देवाने दिलेली प्रेमाची आज्ञा आहे आणि त्याच्या दैवी जीवनात सहभागी होण्याचे आमंत्रणही आहे. हे शब्द आपण ऐकावेत, मनात खोलवर रुजवावेत आणि आपल्या दैनंदिन जीवनात ते आचरणात आणण्याची इच्छा बाळगावी.

हे आपण कसे करायचे? आपल्या संपूर्ण अस्तित्वाने देवावर प्रेम कसे करायचे? ‘संपूर्ण अंतःकरणाने, मनाने, आत्म्याने आणि सर्व सामर्थ्याने’ म्हणजे आपल्यात जे काही आहे त्या सर्वांनी! म्हणजे आपले संपूर्ण अस्तित्व. आपले अख्खे जीवन. म्हणून देवाने आपल्याला जसे प्रेम करायला बोलावले आहे, तसे त्याच्यावर प्रेम करण्यासाठी आपण स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले पाहिजे. म्हणजेच, आपले काहीही राखून न ठेवता आपण या प्रेमात उतरले पाहिजे. तर मग, हे आपण कसे करायचे?

याचे उत्तर आहे उपासना! देवाची उपासना करणे म्हणजे त्याने आपल्याला जसे प्रेम करायला बोलावले आहे, तसे त्याच्यावर प्रेम करणे. देवाची उपासना करणे म्हणजे तोच खरोखर आपल्या जीवनाचा देव आहे हे मान्य करणे आणि आपल्या व त्याच्यामध्ये इतर कशालाही येऊ न देणे. म्हणजे आपले अंतःकरण, आत्मा आणि मन देवामध्ये तल्लीन होऊ देणे आणि त्याच्या सान्निध्याने भरून जाऊ देणे. हीच उपासना. आणि हेच आपल्या जीवनाचे पाचारण आहे.

देवाच्या उपासनेसाठी दोन मूलभूत गोष्टी आवश्यक आहेत. हे अगदी सोपे आहे. पहिली गोष्ट म्हणजे देव आपल्यामध्ये कार्य करतो. तो आपल्याशी बोलतो, आपल्याला हाक देतो आणि त्याच्या कृपेच्या जीवनात सहभागी होण्यासाठी आपल्याला आमंत्रण देतो. म्हणून उपासनेत पहिली आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की देव आपल्या जीवनात कार्य करतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्या अद्भुत आमंत्रणाला आपण प्रतिसाद देतो. म्हणजे आपण देवाला ‘हो’ म्हणतो. त्याच्या आमंत्रणाला ‘हो’ आणि त्याच्या इच्छेलाही ‘हो’. हा होकार विशेषतः आत्मसमर्पणातून व्यक्त होतो. आपल्या कल्पनेपलीकडे आपल्यावर प्रेम करणाऱ्या देवाच्या त्या गौरवशाली आमंत्रणाला आपण स्वतःला पूर्णपणे समर्पित करून प्रतिसाद देतो!

उपासना म्हणजे प्रार्थना. ती खरीखुरी प्रार्थना आहे. पण ती केवळ चर्चमध्ये किंवा प्रार्थनेसाठी ठरवलेल्या वेळी आपण करतो ती प्रार्थना नाही. उलट, आपण जे काही करतो त्यातून आणि आपल्या संपूर्ण अस्तित्वाने अहोरात्र देवाची उपासना करण्याचे पाचारण आपल्याला आहे. अमुक वेळी उपासना करायची आणि इतर वेळी करायची नाही, असे आपण ठरवू शकत नाही. देवाच्या सान्निध्यात सतत राहून सर्व काही त्याला समर्पित करण्याचे हे पाचारण आहे.

हे खरे असले, तरी आपल्यापैकी प्रत्येकाने दररोज, आणि विशेषतः रविवारी, केवळ देवाच्या प्रत्यक्ष उपासनेसाठी वेळ राखून ठेवणेही महत्त्वाचे आहे. होय, आपण त्याच्या सान्निध्यात सतत राहण्याचा आणि क्षणोक्षणी त्याच्या इच्छेला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण हे नीट जमण्यासाठी, आपण दुसरे काहीही न करता केवळ त्याची उपासना करू असा वेळ हवा. जीवनातील इतर सर्व कामे बाजूला ठेवून, आपल्या देवावर प्रेम करण्यासाठी आणि त्याची प्रत्यक्ष उपासना करण्यासाठी आपले संपूर्ण लक्ष त्याच्याकडे लावायला आपल्याला वेळ हवा. हे आपल्याला नीट जमले, तर दैनंदिन जीवनात देवाच्या सान्निध्यात राहणे आपल्याला अधिक सहज जमेल.

हे पुस्तक त्रिएक देवाच्या उपासनेविषयी आहे! या पानांत जे मांडले आहे, त्याहून महत्त्वाचे जीवनात दुसरे काहीही नाही. हे महत्त्व पुस्तकाचे स्वतःचे नसून, त्यातून आपल्याला समजणाऱ्या सत्यांचे आहे.

या पुस्तकाचे दोन मुख्य भाग आहेत. पहिल्या भागात आपल्या चर्चच्या संस्कारांमधून आपण प्रार्थना कशी जगतो, याविषयी सांगितले आहे. संस्कार कधीकधी कोरडे, कंटाळवाणे आणि तेच ते पुन्हा केल्यासारखे वाटू शकतात. कधीकधी ते केवळ आज्ञापालन म्हणून करणे ‘बंधनकारक’ असलेले पोकळ विधी वाटू शकतात. पण संस्कारांचा अर्थ योग्य रीतीने समजून आपण त्यांत मनापासून सहभागी होतो, तेव्हा ते आपल्या देवाशी जवळीक साधण्याचे सर्वांत मोठे साधन ठरतात. ते आपल्या स्वतःच्या जीवनाचा भाग बनतात. ते खऱ्या अर्थाने आपले होतात. मग आपण म्हणू शकतो: माझी कॅथलिक उपासना! 

या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात प्रार्थनेच्या इतर सर्व प्रकारांचा विचार केला आहे. त्यात प्रार्थनेच्या विविध पद्धती आणि प्रार्थनेचा अर्थ उलगडून सांगितला आहे. तेव्हा मोकळ्या मनाने हे पुस्तक वाचायला घ्या. उपासनेच्या सर्व प्रकारांतून तुम्हाला स्वतःच्या अधिक जवळ आणण्याची देवाची इच्छा आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही त्याला ओळखावे आणि आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, मनाने, आत्म्याने आणि सर्व सामर्थ्याने त्याच्यावर प्रेम करावे, अशी त्याची इच्छा आहे. आणि त्यासाठीचा मार्ग म्हणजे प्रार्थना!

माझ्यासाठी प्रार्थना म्हणजे अंतःकरणाची भरारी. ती म्हणजे स्वर्गाकडे वळवलेली एक साधी नजर, ओळखीची आणि प्रेमाची एक आर्त हाक, जिच्यात कसोटी आणि आनंद या दोन्हींचा स्वीकार आहे (लिझियूची संत तेरेझ, आत्मचरित्रात्मक हस्तलिखिते, C 25r). (कॅथलिक चर्चची धर्मशिक्षणसंहिता #2558)