प्र. माझी श्रद्धा अधिक सखोल व्हावी असे मला वाटते, पण त्यासाठी नेमके काय करावे, हे मला कळत नाही. याविषयी मी माझ्या काही मित्रमैत्रिणींशी बोललो आहे. त्यांच्यापैकी काहींना माझे म्हणणे समजले असे वाटते, पण त्यांनाही काही उपाय सुचत नाहीत. मी नेहमीच मिस्साला जातो, पण रोज जाणे मला जमत नाही. मी जपमाळही पुष्कळदा म्हणतो. देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी मी काय करू शकतो, याबद्दल तुम्ही काही सुचवाल का?
उ. तुम्हाला तीन सर्वसाधारण सूचना द्याव्याशा वाटतात.
पहिली सूचना अशी की, तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या करत राहा आणि त्यांत आणखी काही गोष्टींची भर घाला. जपमाळ म्हणा, वारंवार मिस्साला जा, संतांची चरित्रे वाचा, कॅथलिक चर्चच्या शिकवणीचा अभ्यास करा, आध्यात्मिक साधनाशिबिरांत सहभागी व्हा, पवित्र शास्त्र वाचा (आणि त्यावरील दैनंदिन चिंतन वाचा), दररोज वैयक्तिक प्रार्थनेसाठी शांत वेळ राखून ठेवा, वगैरे. या गोष्टींमध्ये तुम्हाला जितके अधिक मन लावता येईल, तितके चांगले.
श्रद्धा अधिक सखोल करण्याचा आणखी एक आवश्यक मार्ग म्हणजे प्रेमभावनेत वाढणे. श्रद्धा आणि प्रेमभावना हातात हात घालून चालतात आणि एकीमुळे दुसरी बळकट होते. म्हणून इतरांवर प्रेम व्यक्त करण्याच्या संधी शोधा.
छोट्या गोष्टींनीही आपल्या श्रद्धेच्या जीवनात मोठा फरक पडतो. उदाहरणार्थ, क्षणभर थांबून एखाद्याकडे पाहून नुसते हसण्याची संधी शोधा. मायेचा आणि धीर देणारा एखादा शब्द बोला. एखाद्याच्या मदतीसाठी थोडे जास्त प्रयत्न का करू नयेत? एखाद्यासाठी दार उघडून धरणे, कोणाला गृहपाठात मदत करणे किंवा घरात आवराआवर करणे, अशा साध्या गोष्टीही करता येतात. आपल्या रोजच्या जीवनात प्रेमाने वागण्याच्या असंख्य संधी मिळतात. त्या कितीही छोट्या असल्या तरी त्या ओळखायच्या आणि त्यांचा उपयोग करून चांगले ते करायचे, एवढेच आपल्याला करायचे आहे.
मला द्यायची तिसरी सूचना पहिल्या दोन सूचनांपेक्षा थोडी वेगळी आहे. कधी कधी आपली श्रद्धा वाढत असते, पण ती वाढते आहे असं आपल्याला ‘जाणवत’ नाही. उलट, देव पूर्वीइतका जवळ नाही, असंही आपल्याला वाटू शकतं. आपण आपल्या भावभावनांवर प्रमाणापेक्षा जास्त विसंबून राहतो, तेव्हा असं होतं. उदाहरणार्थ, एखाद्या उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी आध्यात्मिक साधनाशिबिरात सहभागी होण्याची सुंदर संधी तुम्हाला मिळाली असेल. अशा शिबिरात आपल्याला ‘आध्यात्मिक आनंदाची उंच भरारी’ अनुभवायला मिळू शकते. शिबिरातून परतताना देव आजवर कधी नव्हता इतका जवळ आहे, असं आपल्याला वाटू शकतं. आपण नवे संकल्प करतो, आनंदाने भरून जातो, जीवनाविषयी आपल्याला नवा उत्साह वाटतो. पण काही आठवड्यांतच आपण पुन्हा पूर्वीसारखे होतो आणि तोच अनुभव पुन्हा मिळावा म्हणून पुढच्या शिबिराची वाट पाहू लागतो. हे सगळं चांगलंच आहे. आध्यात्मिक साधनाशिबिरं आणि त्यांत अनुभवायला मिळणारा उत्कट आध्यात्मिक आनंद हे श्रद्धा वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.
पण श्रद्धेच्या दीर्घ वाटचालीत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी: देव जवळ आहे असं वाटणं आणि प्रत्यक्षात देवाच्या जवळ असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
कधी कधी देव आपल्याला त्या सुखद आध्यात्मिक अनुभूती काही काळ देत नाही, जेणेकरून त्याच्याशी असलेली आपली निष्ठा अधिक दृढ करण्यास तो आपल्याला मदत करू शकेल. मुख्यतः त्याच्याशी असलेल्या निष्ठेमुळेच आपली श्रद्धा अधिक खोलवर रुजते. त्याच्या मार्गाने चालावंसं वाटतं म्हणूनच जर आपण त्या मार्गाने चालत असू, तर आपण खरोखरच त्याच्याशी निष्ठावान आहोत का? पण सुरुवातीच्या त्या सुखद अनुभूतींपैकी काही देवाने काढून घेतल्या, तरी आपण पूर्वीइतकेच निष्ठावान राहिलो, तर आपण योग्य मार्गावर आहोत हे आपल्याला समजतं. अशा वेळी आपली श्रद्धा अधिक खोलवर रुजत आहे, याची आपण खात्री बाळगू शकतो.
म्हणून भरपूर प्रार्थना करा, आपल्या श्रद्धेची शिकवण समजून घ्या आणि देवावर व आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करत जगण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला वचन देतो की तुमची श्रद्धा वाढेल, मग ती वाढते आहे असं तुम्हाला नेहमी जाणवलं नाही तरीही. आपली श्रद्धा अधिक खोलवर रुजावी अशी इच्छा तुमच्या मनात आहे, यातूनच तुम्ही योग्य मार्गावर आहात हे दिसतं. ती इच्छा जिवंत ठेवा. देव ती पूर्ण करील, याची मला पूर्ण खात्री आहे!
हे पुस्तकही तुम्हाला उपयुक्त ठरू शकतं: देवाशी ऐक्याकडे नेणारा गूढ प्रवास: संत जॉन ऑफ द क्रॉस यांची आध्यात्मिक शिकवण
