प्र. धर्मगुरू नेहमी काळे कपडे का घालतात?
उ. छान प्रश्न! आधी एक गोष्ट स्पष्ट करूया: धर्मगुरू नेहमीच काळे कपडे घालत नाहीत. ते कोणता पोशाख घालतात, हे ते काय करत आहेत यावर अवलंबून असते. मिस्साबली अर्पण करत नसताना ते पांढऱ्या कॉलरसह काळा कॅसॉक (घोट्यापर्यंत येणारा लांब झगा) घालतात. किंवा, देशातील बिशपांच्या परिषदेची परवानगी असेल, तर सार्वजनिक ठिकाणी ते पांढऱ्या कॉलरसह काळा सूट घालतात.
काळाच रंग का? काळा रंग हे शोकाचे आणि प्रायश्चित्ताचे चिन्ह आहे. हे जग आपल्याला जे देऊ शकते त्यापलीकडेही जीवनाला अर्थ आहे, याची आठवण धर्मगुरूंनी सामान्य ख्रिस्ती श्रद्धावंतांना करून द्यावी. काळ्या पोशाखाने धर्मगुरूंना आणि त्यांना पाहणाऱ्यांनाही याची आठवण व्हावी की आपण या जगाच्या फॅशनच्या मागे लागू नये. त्याऐवजी, केवळ आपल्या पापांसाठीच नव्हे, तर जगाच्या पापांसाठीही प्रायश्चित्त करण्यास आपल्याला बोलावले आहे, हे लक्षात ठेवावे.
या काळ्या पोशाखाचा एक व्यावहारिक उपयोगही आहे: पापस्वीकार किंवा आजाऱ्यांचे अभ्यंग यांसारख्या संस्कारांची गरज भासल्यास धर्मगुरू सहज ओळखता येतात. रस्त्यात एखादी व्यक्ती जवळ येऊन ‘मला पापस्वीकार करता येईल का?’ असे विचारते, तेव्हा धर्मगुरूंना आनंद होतो. अर्थात, व्यायाम करताना, अंगणात काम करताना किंवा झोपताना धर्मगुरू काळा कॅसॉक किंवा काळा सूट घालत नाहीत. तसेच, उष्णकटिबंधीय प्रदेशात धर्मप्रांताचे धर्मगुरू काळ्याऐवजी पांढरा पोशाख घालतात. तो केवळ उन्हाचा ताप कमी जाणवावा म्हणून नव्हे, तर काही संस्कृतींमध्ये पांढरा रंग हे शोकाचे चिन्ह आहे म्हणूनही घालतात.
जेएल
