मराठी

संत योसेफला उद्देशून प्रार्थना

“पित्याच्या हृदयाने” (पात्रिस कोर्दे)
पोप फ्रान्सिस यांचे प्रेषितीय पत्र 

पोप फ्रान्सिस यांची प्रार्थना

पोप लिओ तेरावे यांची प्रार्थना

संत योसेफची लितानी

संत योसेफच्या नोव्हेनाची रोजची प्रार्थना

संत योसेफचा नोव्हेना

संत योसेफला सकाळचे समर्पण

संत योसेफला उद्देशून ‘स्मरण कर’ ही प्रार्थना

संत योसेफला आत्मसमर्पण

संत योसेफची तीस दिवसांची प्रार्थना

संत योसेफच्या सात दुःखांच्या आणि सात आनंदांच्या सन्मानार्थ प्रार्थना

संत योसेफविषयी पोप संत जॉन पॉल दुसरे यांचे प्रेषितीय बोधपत्र

संत योसेफविषयी इतर दस्तऐवज, शिकवण आणि प्रवचने

संत योसेफविषयी वार्तापत्रातील निवडक लेख


संत योसेफला उद्देशून पोप फ्रान्सिस यांची प्रार्थना

हे उद्धारकर्त्याच्या रक्षका,
धन्य कुमारी मरियेच्या पती, तुला नमन.
देवाने आपला एकुलता एक पुत्र तुझ्या स्वाधीन केला;
मरियेने तुझ्यावर विश्वास ठेवला;
तुझ्या सहवासात ख्रिस्त मनुष्य झाला.

हे धन्य योसेफा, आमच्यासाठीही
तू पिता आहेस हे दाखव
आणि जीवनाच्या वाटेवर आम्हाला मार्गदर्शन कर.
आम्हाला कृपा, दया आणि धैर्य मिळवून दे,
आणि सर्व अनिष्टांपासून आमचे रक्षण कर. आमेन.

(पोप फ्रान्सिस यांनी पात्रिस कोर्दे या पत्रात रचलेली प्रार्थना.)


 

संत योसेफला उद्देशून पोप लिओ तेरावे यांची प्रार्थना

हे धन्य योसेफा, आमच्या संकटात आम्ही तुझ्याकडे येतो. तुझ्या परमपवित्र पत्नीची मदत कळकळीने मागितल्यानंतर, आम्ही विश्वासाने तुझाही आश्रय मागतो.

देवाची निष्कलंक कुमारी माता हिच्याशी तुला जोडणाऱ्या प्रेमाच्या आणि ज्या पितृप्रेमाने तू बाल येशूला कवटाळलेस त्या प्रेमाच्या नावे आम्ही तुला नम्र विनंती करतो: येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताने विकत घेतलेल्या वारशाकडे कृपादृष्टीने पाहा आणि आमच्या गरजांच्या वेळी आपल्या सामर्थ्याने व बळाने आम्हाला साहाय्य कर.

हे पवित्र कुटुंबाच्या परम दक्ष रक्षका, येशू ख्रिस्ताच्या निवडलेल्या लेकरांचे रक्षण कर; हे परम प्रेमळ पित्या,
भ्रांतीचा कोणताही संसर्ग व बिघडवणारा कोणताही प्रभाव आमच्यापर्यंत पोहोचू देऊ नकोस; हे आमच्या परम सामर्थ्यवान रक्षका, आमच्यावर दया कर आणि अंधाराच्या सत्तेविरुद्धच्या आमच्या लढ्यात स्वर्गातून आम्हाला साहाय्य कर.

जसे तू एके काळी बाल येशूला जीवघेण्या संकटातून वाचवलेस, तसे आता देवाच्या पवित्र ख्रिस्तसभेचे शत्रूच्या सापळ्यांपासून आणि सर्व संकटांपासून रक्षण कर. आमच्यापैकी प्रत्येकालाही तुझ्या अखंड संरक्षणाचे कवच दे, जेणेकरून तुझ्या आदर्शाचा व साहाय्याचा आधार घेऊन आम्हाला भक्तिभावाने जगता यावे, पवित्रतेत मरण येावे आणि स्वर्गात चिरंतन आनंद प्राप्त व्हावा.

आमेन.

(पोप लिओ तेरावे यांनी 1889 सालच्या आपल्या क्वामक्वाम प्लुरिएस या परिपत्रकात रचलेली प्रार्थना.)


संत योसेफची लितानी

हे प्रभू, आमच्यावर दया कर.
हे ख्रिस्ता, आमच्यावर दया कर.
हे प्रभू, आमच्यावर दया कर. हे ख्रिस्ता, आमचे ऐक.
हे ख्रिस्ता, कृपापूर्वक आमचे ऐक.

हे स्वर्गातील देवपित्या, आमच्यावर दया कर.
हे देवपुत्रा, जगाच्या उद्धारकर्त्या, आमच्यावर दया कर.
हे पवित्र आत्म्या, हे देवा, आमच्यावर दया कर.
हे पवित्र त्रैक्या, एकच देवा, आमच्यावर दया कर.

हे पवित्र मरिये, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे संत योसेफा, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे दाविदाच्या थोर पुत्रा, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे कुलपितरांच्या प्रकाशा, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे देवमातेच्या पती, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे कुमारी मरियेच्या शुचिर्भूत रक्षका, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे देवपुत्राच्या पालनकर्त्या पित्या, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे ख्रिस्ताच्या दक्ष रक्षका, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे पवित्र कुटुंबाच्या प्रमुखा, आमच्यासाठी प्रार्थना कर.

हे परम नीतिमान योसेफ, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे परम शुचिर्भूत योसेफ, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे परम विवेकी योसेफ, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे परम धैर्यवान योसेफ, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे परम आज्ञाधारक योसेफ, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे परम विश्वासू योसेफ, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे संयमाच्या आरशा, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे गरिबीवर प्रेम करणाऱ्या योसेफा, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे कामगारांच्या आदर्शा, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे गृहजीवनाच्या गौरवा, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे कुमारिकांच्या रक्षका, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे कुटुंबांच्या आधारस्तंभा, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे दुःखितांच्या सांत्वना, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे आजाऱ्यांच्या आशा, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे मरणासन्नांच्या आश्रयदात्या, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे दुष्ट आत्म्यांना भयभीत करणाऱ्या योसेफा, आमच्यासाठी प्रार्थना कर.
हे पवित्र ख्रिस्तसभेच्या रक्षका, आमच्यासाठी प्रार्थना कर.

हे जगाची पापे हरण करणाऱ्या देवाच्या कोकरा,
हे प्रभू, आम्हाला क्षमा कर!
हे जगाची पापे हरण करणाऱ्या देवाच्या कोकरा,
हे प्रभू, कृपापूर्वक आमचे ऐक!
हे जगाची पापे हरण करणाऱ्या देवाच्या कोकरा,
आमच्यावर दया कर!

वचन: देवाने त्याला आपल्या घराचा स्वामी केले,
प्रतिसाद:  आणि आपल्या सर्व संपत्तीवर अधिपती नेमले.

आपण प्रार्थना करूया
हे देवा, तुझ्या अवर्णनीय दैवी योजनेनुसार तू धन्य योसेफाला तुझ्या परमपवित्र मातेचा पती म्हणून निवडलेस. आम्ही तुला विनवतो, ज्याचा आम्ही पृथ्वीवर आमचा रक्षक म्हणून आदर करतो, तो स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करो. तू युगानुयुगे जगतोस आणि राज्य करतोस. आमेन.


संत योसेफाची दररोजची नोवेना प्रार्थना 

(विशेषतः मरियेचा पती संत योसेफ याच्या महासणाच्या तयारीसाठी 10–18 मार्च या काळात दररोज म्हटली जाणारी प्रार्थना)

हे संत योसेफ, देवाच्या सिंहासनासमोर तुझे संरक्षण इतके महान, सामर्थ्यशाली आणि तत्पर आहे की माझ्या सर्व चिंता आणि इच्छा मी तुझ्या हाती सोपवतो.

हे संत योसेफ, तुझ्या समर्थ मध्यस्थीने मला साहाय्य कर आणि तुझ्या दैवी पुत्राकडून, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे, मला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद मिळवून दे. अशा रीतीने, या पृथ्वीवर तुझ्या स्वर्गीय सामर्थ्याचा अनुभव घेऊन, सर्वांत प्रेमळ पित्याला मला कृतज्ञता आणि आदर अर्पण करता येवो.

हे संत योसेफ, तुझे आणि तुझ्या कुशीत झोपलेल्या येशूचे चिंतन करताना मला कधीच थकवा येत नाही. तो तुझ्या हृदयाशी विसावला असताना त्याच्याजवळ जाण्याचे धाडस मला होत नाही. माझ्या वतीने त्याला उराशी धर, त्याच्या सुंदर मस्तकाचे माझ्याकडून चुंबन घे आणि मी शेवटचा श्वास घेताना त्यानेही माझे चुंबन घ्यावे, अशी त्याला विनंती कर. हे संत योसेफ, या जगाचा निरोप घेणाऱ्या जिवांच्या आश्रयदात्या, माझ्यासाठी प्रार्थना कर.

आमेन.


कामगार संत योसेफाला प्रार्थना

हे गौरवशाली संत योसेफ, श्रमाला वाहून घेतलेल्या सर्वांचा आदर्श, मला अशी कृपा मिळवून दे की मी माझ्या अनेक पापांचे प्रायश्चित्त म्हणून प्रायश्चित्तभावनेने काम करावे; माझ्या स्वाभाविक ओढींपेक्षा कर्तव्याच्या हाकेला प्राधान्य देऊन सद्सद्विवेकबुद्धीने काम करावे; देवाकडून मिळालेल्या देणग्यांचा श्रमाद्वारे उपयोग करणे आणि त्या विकसित करणे हा सन्मान मानून कृतज्ञतेने व आनंदाने काम करावे; थकवा आणि परीक्षांना कधीही न डगमगता शिस्तीने, शांततेने, मितपणे आणि संयमाने काम करावे; आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, शुद्ध हेतूने व स्वतःच्या अहंभावापासून अलिप्त राहून काम करावे. मृत्यूची जाणीव मी सदैव डोळ्यांसमोर ठेवावी आणि वाया घालवलेला वेळ, उपयोगात न आणलेल्या प्रतिभा, करायचे राहून गेलेले सत्कर्म आणि यशामुळे आलेले पोकळ आत्मसंतोषाचे भाव, जे देवाच्या कार्याला इतके घातक आहेत, या सर्वांचा हिशेब मला द्यावा लागेल, याचे सतत भान ठेवावे.

सर्व काही येशूसाठी, सर्व काही मरियेच्या माध्यमातून, आणि हे कुलपित्या संत योसेफ, सर्व काही तुझ्या आदर्शानुसार. जीवनात आणि मृत्यूसमयी हेच माझे ब्रीद असो. आमेन.

(पोप संत पायस दहावे यांनी रचलेली प्रार्थना)


संत योसेफाला सकाळची अर्पणप्रार्थना

हे प्रिय आणि निवडलेल्या पित्या, माझा आणि माझ्या शरीराच्या व आत्म्याच्या प्रत्येक हालचालीच्या अर्पणाचा स्वीकार कर. तुझ्या माध्यमातून हे सर्व माझ्या धन्य प्रभूला अर्पण करण्याची माझी इच्छा आहे.

हे सर्व शुद्ध कर! या सर्वांचे परिपूर्ण सर्वस्वार्पण होऊ दे! माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका आध्यात्मिक कम्युनियन ठरो; प्रत्येक दृष्टी आणि विचार प्रेमाची कृती ठरो; प्रत्येक कृती एक मधुर बलिदान ठरो; प्रत्येक शब्द दैवी प्रेमाचा बाण ठरो; प्रत्येक पाऊल मला येशूच्या अधिक जवळ नेवो; आपल्या प्रभूची प्रत्येक भेट देवदूतांच्या सेवाकार्यांइतकी देवाला प्रिय ठरो; आणि हे प्रिय संता, तुझी प्रत्येक आठवण मी तुझे लेकरू आहे, याचे तुला स्मरण करून देवो.

ज्या प्रसंगी मी नेहमी कमी पडतो, ते प्रसंग मी तुझ्या हाती सोपवतो, विशेषतः . . . [ते प्रसंग सांगा].

दिवसभरातील माझ्या भक्तीच्या प्रत्येक छोट्या कृतीत कितीही उणिवा असल्या तरी तिचा स्वीकार कर आणि ती येशूला अर्पण कर. तो आपल्या दयेमुळे त्या सर्व उणिवांकडे दुर्लक्ष करील, कारण तो देणगीपेक्षा ती देणाऱ्याच्या प्रेमाला अधिक महत्त्व देतो.

आमेन.


संत योसेफाची स्मरणप्रार्थना

हे धन्य कुमारी मरियेच्या परमपवित्र पती, माझ्या महान रक्षक संत योसेफ, स्मरण कर की ज्याने तुझ्या संरक्षणाचा आश्रय घेतला किंवा तुझ्या साहाय्यासाठी याचना केली, असा कोणीही दिलासा मिळाल्याशिवाय राहिला नाही. म्हणून तुझ्या चांगुलपणावर विश्वास ठेवून मी तुझ्यासमोर येतो. हे उद्धारकर्त्याच्या पालनपित्या, माझ्या विनंत्या नाकारू नकोस, तर त्यांचा कृपापूर्वक स्वीकार कर.

आमेन.


संत योसेफाला आत्मसमर्पण

हे अतिप्रिय संत योसेफ, तुमच्या सन्मानार्थ मी स्वतःला समर्पित करतो आणि तुमच्या स्वाधीन होतो, जेणेकरून तारणाच्या मार्गावर तुम्ही सदैव माझे पिता, रक्षक आणि मार्गदर्शक राहावे. माझे हृदय अत्यंत शुद्ध व्हावे आणि आध्यात्मिक जीवनाविषयी माझ्या मनात उत्कट प्रेम असावे, अशी कृपा मला मिळवून द्या. तुमच्या उदाहरणाचे अनुसरण करून, येशूच्या दिव्य हृदयाशी आणि मरियेच्या निष्कलंक हृदयाशी एकरूप होऊन, माझी प्रत्येक कृती देवाच्या अधिक गौरवासाठी असो! हे धन्य संत योसेफ, तुमच्या पवित्र मृत्यूसमयी तुम्हाला लाभलेल्या शांतीत आणि आनंदात मला सहभागी होता यावे, म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा.

आमेन.


संत योसेफ यांची तीस दिवसांची प्रार्थना

एका प्राचीन परंपरेनुसार, येशूने आपले सार्वजनिक सेवाकार्य सुरू करण्याच्या थोडे आधी संत योसेफ यांचे निधन झाले. म्हणून संत योसेफ यांनी येशू आणि मरिया यांच्यासोबत घालवलेल्या ३० वर्षांच्या सन्मानार्थ पुढील प्रार्थना ३० दिवस म्हटली जाते.

हे सदैव धन्य आणि गौरवशाली संत योसेफ, दयाळू आणि प्रेमळ पिता, दुःखात असलेल्या सर्वांच्या मदतीला धावून येणारे मित्र! तुम्ही अनाथांचे प्रेमळ पिता आणि रक्षक, असहायांचे कैवारी आणि गरजू व दुःखी जनांचे आश्रयदाते आहात.

माझ्या विनंतीकडे कृपादृष्टीने पाहा. माझ्या पापांमुळे माझ्या देवाची रास्त नाराजी मी ओढवून घेतली आहे; म्हणून दुःखाने मला चारही बाजूंनी वेढले आहे. हे नाझरेथच्या कुटुंबाचे प्रेमळ रक्षक, मदत आणि संरक्षण मिळावे म्हणून मी तुमच्याकडे येतो. तुम्हाला विनवणी आहे की, पित्याच्या ममतेने माझ्या कळकळीच्या प्रार्थना ऐका आणि मी मागत असलेली कृपा मला मिळवून द्या.

देवाच्या सनातन पुत्राच्या असीम दयेचे स्मरण करून मी ही विनंती करतो. याच दयेने त्याला आपले मानवी स्वरूप धारण करण्यास आणि या दुःखमय जगात जन्म घेण्यास प्रवृत्त केले.

बेथलेहेमच्या धर्मशाळेत पवित्र कुमारीला आसरा मिळाला नाही, आणि देवाच्या पुत्राचा जन्म होऊ शकेल असे घरही सापडले नाही, तेव्हा तुम्ही सोसलेल्या थकव्याचे आणि क्लेशांचे स्मरण करून मी ही विनंती करतो. सर्वत्र नकार मिळाल्यामुळे स्वर्गाच्या राणीला एका गुहेत जगाच्या तारणाऱ्याला जन्म द्यावा लागला.

आराधनेस पात्र अशा त्या बाळाला तुम्ही दिलेल्या ‘येशू’ या पवित्र नावाच्या माधुर्याचे आणि सामर्थ्याचे स्मरण करून मी ही विनंती करतो.

पवित्र शिमोनचे भविष्यकथन ऐकून तुम्हाला झालेल्या तीव्र वेदनांचे स्मरण करून मी ही विनंती करतो. आपल्या पापांमुळे आणि आपल्यावर असलेल्या त्यांच्या अपार प्रेमामुळे बाळयेशू आणि त्याची पवित्र माता यांना पुढे दुःख भोगावे लागेल, असे त्याने सांगितले होते.

बाळयेशूचे शत्रू त्याच्या जिवावर उठले आहेत, असे देवदूताने तुम्हाला सांगितले, तेव्हा तुमच्या अंतःकरणाला झालेल्या दुःखाचे आणि वेदनेचे स्मरण करून मी ही विनंती करतो. त्यांच्या दुष्ट कटापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला बाळयेशू आणि त्याची धन्य माता यांच्यासह इजिप्तला पळून जावे लागले.

त्या लांबच्या आणि धोकादायक प्रवासात तुम्ही सोसलेल्या सर्व क्लेशांचे, थकव्याचे आणि श्रमांचे स्मरण करून मी ही विनंती करतो.

आपल्या देशात परत जाण्याची आज्ञा मिळाल्यावर तुम्ही केलेल्या दुसऱ्या प्रवासात पवित्र बाळाचे आणि त्याच्या निष्कलंक मातेचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या सर्व काळजीचे स्मरण करून मी ही विनंती करतो.

नाझरेथच्या शांत जीवनात तुम्ही अनुभवलेल्या अनेक सुखदुःखांचे स्मरण करून मी ही विनंती करतो. आराधनेस पात्र असलेले ते बाळ तीन दिवस तुम्हाला आणि त्याच्या मातेला सापडले नाही, तेव्हा तुम्हाला झालेल्या अतोनात दुःखाचे स्मरण करून मी ही विनंती करतो.

बाळयेशू मंदिरात सापडल्यावर तुम्हाला झालेल्या आनंदाचे आणि नाझरेथमध्ये त्याच्या सहवासात राहून तुम्हाला लाभलेल्या दिलाशाचे स्मरण करून मी ही विनंती करतो.

तुमची आज्ञा पाळताना येशूने दाखवलेल्या विलक्षण नम्रतेचे स्मरण करून मी ही विनंती करतो.

हे जीवन आणि येशू व मरिया यांचा सहवास सोडण्याची देवाची आज्ञा तुम्ही पूर्ण प्रेमाने आणि त्याच्या इच्छेशी एकरूप होऊन स्वीकारली, त्याचे स्मरण करून मी ही विनंती करतो.

जगाच्या तारणाऱ्याने मृत्यू आणि नरक यांच्यावर विजय मिळवून आपल्या राज्याचा अधिकार स्वीकारला आणि विशेष सन्मानाने तुम्हाला त्या राज्यात नेले, तेव्हा तुमचे अंतःकरण ज्या आनंदाने भरून गेले, त्याचे स्मरण करून मी ही विनंती करतो.

मरियेला देहासह आणि आत्म्यासह गौरवाने स्वर्गात घेण्यात आले, त्या घटनेचे आणि देवाच्या सान्निध्यात तिच्यासोबत तुम्ही अनुभवत असलेल्या अखंड आनंदाचे स्मरण करून मी ही विनंती करतो. हे प्रेमळ पिता, तुमच्या सर्व क्लेशांचे, दुःखांचे आणि आनंदांचे स्मरण करून मी तुम्हाला विनवतो: माझी प्रार्थना ऐका आणि मी जे मागतो ते मला मिळवून द्या.

(येथे आपल्या विनंत्या सांगा किंवा मनात आठवा.)

ज्यांनी मला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे, त्या सर्वांना देवाच्या योजनेनुसार त्यांच्या हिताचे असे सर्व काही मिळवून द्या. शेवटी, माझ्या प्रिय आश्रयदात्या आणि पित्या, माझ्या आणि माझ्या सर्व प्रियजनांच्या अखेरच्या क्षणी आमच्याजवळ राहा, म्हणजे आम्ही येशू, मरिया आणि योसेफ यांचे स्तवन सदासर्वकाळ गात राहू.

“हे संत योसेफ, तुमच्या प्रेमळ आश्रयाने आम्ही संकटांतून मुक्त होऊन निष्कलंक जीवन जगावे.”


संत योसेफ यांच्या सात दुःखांच्या आणि सात आनंदांच्या सन्मानार्थ प्रार्थना

या भक्तीची उत्पत्ती: दोन फ्रान्सिस्कन धर्मबंधू फ्लँडर्सच्या किनाऱ्यालगत जहाजाने प्रवास करत होते. तेव्हा एक भयंकर वादळ उठले आणि जहाज आपल्या तीनशे प्रवाशांसह बुडाले. मात्र, त्या दोन धर्मबंधूंनी तीन दिवस आणि तीन रात्री एका लाकडी फळीला धरून ठेवले आणि ते सतत संत योसेफांकडे प्रार्थना करत राहिले. संत योसेफ एका तरुणाच्या रूपात त्यांना प्रकट झाले आणि त्यांनी त्या दोघांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. मग त्यांनी त्या दोघांना सांगितले की, आपल्या सात दुःखांच्या आणि सात आनंदांच्या स्मरणार्थ त्यांनी दररोज ‘हे आमच्या पित्या’ आणि ‘नमो मरिये’ या प्रार्थना प्रत्येकी सात वेळा म्हणाव्यात. खालील प्रार्थना वंदनीय जानुआरियुस सार्नेल्ली, सी.एस.एस.आर. (निधन 1744) यांनी रचल्या. ही भक्ती आचरणात आणण्यासाठी त्या म्हणता येतील. या प्रार्थना सलग सात रविवारी, सलग सात दिवस किंवा सर्व एकाच वेळी म्हणता येतात. ज्यांना ही प्रार्थना दररोज म्हणायची आहे, त्यांच्यासाठी पुढील क्रम हा एक पर्याय आहे:

पहिले दुःख / पहिला आनंद: दर रविवारी

दुसरे दुःख / दुसरा आनंद: दर सोमवारी

तिसरे दुःख / तिसरा आनंद: दर मंगळवारी

चौथे दुःख / चौथा आनंद: दर बुधवारी

पाचवे दुःख / पाचवा आनंद: दर गुरुवारी

सहावे दुःख / सहावा आनंद: शुक्रवारी

सातवे दुःख / सातवा आनंद: शनिवारी


पहिले दुःख: संत योसेफांच्या मनातील शंका.

तिचा पती योसेफ नीतिमान होता. तिची जाहीर नाचक्की होऊ नये म्हणून त्याने तिला गुप्तपणे सोडून देण्याचा विचार केला. (मत्तय 1:19)

पहिला आनंद: देवदूताचा संदेश.

तो या गोष्टींचा विचार करत असतानाच, पाहा, प्रभूचा एक दूत त्याला स्वप्नात प्रकट होऊन म्हणाला, “दाविदाच्या पुत्रा योसेफा, तुझी पत्नी मरिया हिचा स्वीकार करण्यास भिऊ नकोस, कारण तिच्या उदरी गर्भ पवित्र आत्म्यापासून राहिला आहे.” (मत्तय 1:20)

हे परमपवित्र मरियेचे निर्मळ पती, गौरवशाली संत योसेफ, आपल्या निष्कलंक पत्नीला गुप्तपणे सोडून देण्याचा विचार करताना तुमचे हृदय किती अस्वस्थ आणि व्याकूळ झाले होते! पण देवदूताने देहधारणेचे परम उदात्त रहस्य तुम्हाला उलगडून सांगितले, तेव्हा तुमचा आनंद अवर्णनीय होता!

तुमच्या या दुःखाचे आणि आनंदाचे स्मरण करून आम्ही तुम्हाला विनवतो: जसे तुम्हाला सदाचारी जीवनाचा आणि येशू व मरिया यांच्या कुशीत पवित्र मरणाचा आनंद लाभला, तसाच आनंद आम्हालाही लाभो आणि त्याने आमच्या आत्म्यांना आता आणि आमच्या अखेरच्या क्षणाच्या दुःखात सांत्वन मिळो.

हे आमच्या पित्या . . .
नमो मरिये . . .
पित्याला गौरव असो . . . 

आपण प्रार्थना करूया.

हे देवा, तुझ्या अवर्णनीय दैवी व्यवस्थेनुसार तू धन्य योसेफांना आपल्या परमपवित्र मातेचे पती म्हणून निवडलेस. आम्ही तुला विनवतो: पृथ्वीवर आमचे रक्षणकर्ते म्हणून ज्यांचा आम्ही आदर करतो, त्यांनी स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी, असे वरदान आम्हाला दे. तू युगानुयुगे जिवंत आहेस आणि राज्य करतोस. 

आमेन.


दुसरे दुःख: येशूचा दारिद्र्यात झालेला जन्म.

तिने आपल्या प्रथमपुत्राला जन्म दिला, त्याला बाळंतवस्त्रांत गुंडाळले आणि गव्हाणीत ठेवले, कारण उतारशाळेत त्यांच्यासाठी जागा नव्हती. (लूक 2:7)

दुसरा आनंद: तारणाऱ्याचा जन्म.

देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका, कारण पाहा, सर्व लोकांना मोठा आनंद देणारी सुवार्ता मी तुम्हाला सांगतो: आज दाविदाच्या नगरात तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे; तो ख्रिस्त प्रभू आहे.” (लूक 2:10-11)

हे परमधन्य कुलपित्या, गौरवशाली संत योसेफ, देहधारी शब्दाचे पालनपिता होण्यासाठी तुमची निवड झाली. इतक्या दारिद्र्यात बाळ येशूचा जन्म झालेला पाहून तुम्हाला दुःख झाले; पण देवदूतांचे स्तोत्र ऐकून आणि त्या तेजोमय रात्रीचे वैभव पाहून तुमच्या दुःखाचे क्षणात स्वर्गीय आनंदात रूपांतर झाले.

तुमच्या या दुःखाचे आणि आनंदाचे स्मरण करून आम्ही तुम्हाला कळकळीने विनवतो: या जीवनाचा प्रवास संपल्यावर देवदूतांची स्तुतिगीते ऐकण्याची आणि स्वर्गीय वैभवाच्या तेजात आनंद मानण्याची कृपा आम्हाला मिळवून द्या.

हे आमच्या पित्या . . .
नमो मरिये . . .
पित्याला गौरव असो . . . 

आपण प्रार्थना करूया.

हे देवा, तुझ्या अवर्णनीय दैवी व्यवस्थेनुसार तू धन्य योसेफांना आपल्या परमपवित्र मातेचे पती म्हणून निवडलेस. आम्ही तुला विनवतो: पृथ्वीवर आमचे रक्षणकर्ते म्हणून ज्यांचा आम्ही आदर करतो, त्यांनी स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी, असे वरदान आम्हाला दे. तू युगानुयुगे जिवंत आहेस आणि राज्य करतोस. 

आमेन.


तिसरे दुःख: सुंता.

त्याची सुंता करण्यासाठी आठ दिवस पूर्ण झाल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. तो गर्भात येण्यापूर्वीच देवदूताने त्याला हे नाव दिले होते. (लूक 2:21)

तिसरा आनंद: येशूचे पवित्र नाव.

तिने आपल्या प्रथमपुत्राला जन्म देईपर्यंत त्याने तिच्याशी वैवाहिक संबंध ठेवले नाहीत. त्याने त्याचे नाव येशू ठेवले. (मत्तय 1:25)

हे गौरवशाली संत योसेफ, तुम्ही देवाची आज्ञा निष्ठेने पाळली. बाल तारणाऱ्याच्या सुंतेच्या वेळी त्याचे अमूल्य रक्त सांडताना पाहून तुमचे हृदय विदीर्ण झाले; पण येशूच्या नावाने तुम्हाला नवजीवन दिले आणि तुमचे हृदय शांत आनंदाने भरून गेले.

तुमच्या या दुःखाचे आणि आनंदाचे स्मरण करून आम्ही विनवतो: या जीवनात सर्व पापांपासून मुक्त होण्याची आणि येशूचे पवित्र नाव हृदयात व ओठांवर ठेवून आनंदाने मरण पावण्याची कृपा आम्हाला मिळवून द्या.

हे आमच्या पित्या . . .
नमो मरिये . . .
पित्याला गौरव असो . . . 

आपण प्रार्थना करूया.

हे देवा, तुझ्या अवर्णनीय दैवी व्यवस्थेनुसार तू धन्य योसेफांना आपल्या परमपवित्र मातेचे पती म्हणून निवडलेस. आम्ही तुला विनवतो: पृथ्वीवर आमचे रक्षणकर्ते म्हणून ज्यांचा आम्ही आदर करतो, त्यांनी स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी, असे वरदान आम्हाला दे. तू युगानुयुगे जिवंत आहेस आणि राज्य करतोस. 

आमेन.


चौथे दुःख: शिमोनची भविष्यवाणी.

शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला आणि बाळाची आई मरिया हिला म्हटले, “पाहा, इस्राएलातील अनेकांच्या पतनासाठी व उत्थानासाठी आणि ज्याला विरोध केला जाईल असे चिन्ह होण्यासाठी या बालकाची नेमणूक झाली आहे. आणि तुझ्याही आत्म्याला तलवार भेदून जाईल.” (लूक 2:34)

चौथा आनंद: मुक्तीचे परिणाम.

त्याच वेळी ती तेथे आली आणि प्रभूची स्तुती करू लागली. यरुशलेमच्या मुक्तीची वाट पाहणाऱ्या सर्वांना ती त्या बालकाविषयी सांगू लागली. (लूक 2:38)

हे गौरवशाली संत योसेफ, आमच्या मुक्तीच्या रहस्यांत सहभागी झालेल्या परम विश्वासू संता, येशू आणि मरिया यांच्या दुःखांविषयी शिमोनने केलेली भविष्यवाणी ऐकून तुम्ही जीवघेण्या भीतीने थरथरलात. पण त्याच वेळी, असंख्य आत्म्यांना तारण व गौरवशाली पुनरुत्थान लाभेल, या त्याच्या भविष्यवाणीने तुमचे अंतःकरण धन्य आनंदाने भरून गेले.

या दुःखाच्या व या आनंदाच्या स्मरणार्थ, येशूच्या पुण्याईने आणि कुमारी माता मरियेच्या मध्यस्थीने गौरवशाली पुनरुत्थानासाठी पूर्वनियुक्त झालेल्यांमध्ये आमचाही समावेश व्हावा, अशी विनंती आमच्यासाठी करा.

हे आमच्या पित्या . . .
नमो मरिये . . .
पित्याला गौरव असो . . . 

आपण प्रार्थना करूया.

हे देवा, तुझ्या अवर्णनीय दैवी व्यवस्थेनुसार तू धन्य योसेफांना आपल्या परमपवित्र मातेचे पती म्हणून निवडलेस. आम्ही तुला विनवतो: पृथ्वीवर आमचे रक्षणकर्ते म्हणून ज्यांचा आम्ही आदर करतो, त्यांनी स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी, असे वरदान आम्हाला दे. तू युगानुयुगे जिवंत आहेस आणि राज्य करतोस. 

आमेन.


पाचवे दुःख: इजिप्तला पलायन.

मग तो उठला आणि रात्रीच बालकाला व त्याच्या आईला घेऊन इजिप्तला निघून गेला. (मत्तय 2:14)

पाचवा आनंद: इजिप्तच्या मूर्तींचे पतन.

इजिप्तविषयीचा भविष्यवाणीचा संदेश. पाहा, प्रभू वेगवान मेघावर आरूढ होऊन इजिप्तमध्ये येईल. त्याच्या उपस्थितीने इजिप्तच्या मूर्ती हादरतील आणि इजिप्तच्या लोकांचे हृदय त्यांच्या आतच विरघळून जाईल. (यशया 19:1)

हे गौरवशाली संत योसेफ, देहधारी देवपुत्राचे परम दक्ष रक्षक, परमेश्वराच्या पुत्राचा सांभाळ व सेवा करताना, विशेषतः इजिप्तला पलायन करताना, तुम्हाला किती कष्ट पडले! तरीही देव स्वतः सदैव तुमच्या सान्निध्यात होता आणि इजिप्तच्या मूर्ती त्याच्यासमोर जमिनीवर कोसळताना तुम्ही पाहिल्यात, याचा तुम्हाला किती आनंद झाला!

या दुःखाच्या व या आनंदाच्या स्मरणार्थ, नरकातील त्या जुलमी सत्ताधाऱ्यापासून, विशेषतः पापाला प्रवृत्त करणारे प्रसंग टाळून, सुरक्षित राहण्याची कृपा आम्हाला मिळवून द्या. सांसारिक आसक्तीची प्रत्येक मूर्ती आमच्या अंतःकरणातून कोसळून पडो. आम्ही येशू आणि मरिया यांच्या सेवेत पूर्णपणे समर्पित होऊ; केवळ त्यांच्यासाठीच जगू आणि आनंदाने मरण पत्करू.

हे आमच्या पित्या . . .
नमो मरिये . . .
पित्याला गौरव असो . . . 

आपण प्रार्थना करूया.

हे देवा, तुझ्या अवर्णनीय दैवी व्यवस्थेनुसार तू धन्य योसेफांना आपल्या परमपवित्र मातेचे पती म्हणून निवडलेस. आम्ही तुला विनवतो: पृथ्वीवर आमचे रक्षणकर्ते म्हणून ज्यांचा आम्ही आदर करतो, त्यांनी स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी, असे वरदान आम्हाला दे. तू युगानुयुगे जिवंत आहेस आणि राज्य करतोस. 

आमेन.


सहावे दुःख: इजिप्तहून परत येणे.

पण आपल्या वडिलांच्या, हेरोदाच्या, जागी आर्खेलाव यहुदियावर राज्य करीत आहे, हे ऐकून त्याला तिथे जायला भीती वाटली. स्वप्नात त्याला सावध करण्यात आले, तेव्हा तो गालील प्रदेशात निघून गेला. (मत्तय 2:22)

सहावा आनंद: नाझरेथ येथे येशू आणि मरिया यांच्यासोबतचे जीवन.

प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या सर्व गोष्टी पूर्ण केल्यावर ते गालीलातील आपल्या नाझरेथ नगरात परतले. (लूक 2:39)

हे गौरवशाली संत योसेफ, या पृथ्वीवरील देवदूता, स्वर्गाचा राजा तुमच्या आज्ञा पाळतो हे पाहून तुम्ही विस्मित झालात. येशूला इजिप्त देशातून परत आणताना तुम्हाला दिलासा वाटला, पण आर्खेलावाच्या भीतीने त्या दिलाशाला बाधा आली. तरीही देवदूताने धीर दिल्यावर तुम्ही येशू आणि मरिया यांच्यासह नाझरेथमध्ये आनंदाने राहिलात.

या दुःखाच्या व या आनंदाच्या स्मरणार्थ, आमचे अंतःकरण अहितकारक भीतीपासून मुक्त व्हावे, अशी विनंती आमच्यासाठी करा. त्यामुळे विवेकाच्या शांतीत आम्हाला आनंद लाभो, येशू आणि मरिया यांच्यासोबत आम्हाला सुरक्षितपणे जगता येवो आणि तुमच्याप्रमाणेच त्यांच्या सान्निध्यात आम्हाला मरण येवो.

हे आमच्या पित्या . . .
नमो मरिये . . .
पित्याला गौरव असो . . . 

आपण प्रार्थना करूया.

हे देवा, तुझ्या अवर्णनीय दैवी व्यवस्थेनुसार तू धन्य योसेफांना आपल्या परमपवित्र मातेचे पती म्हणून निवडलेस. आम्ही तुला विनवतो: पृथ्वीवर आमचे रक्षणकर्ते म्हणून ज्यांचा आम्ही आदर करतो, त्यांनी स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी, असे वरदान आम्हाला दे. तू युगानुयुगे जिवंत आहेस आणि राज्य करतोस. 

आमेन.


सातवे दुःख: बाल येशू हरवणे.

तो सापडला नाही, म्हणून ते त्याचा शोध घेण्यासाठी यरुशलेमला परतले. (लूक 2:45)

सातवा आनंद: बाल येशू मंदिरात सापडणे.

तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात सापडला. तो धर्मशिक्षकांमध्ये बसून त्यांचे ऐकत होता आणि त्यांना प्रश्न विचारत होता. (लूक 2:46)

हे गौरवशाली संत योसेफ, सर्व पावित्र्याचे आदर्श, तुमची काहीही चूक नसताना बाल येशू हरवला, तेव्हा तुम्ही दुःखाने तीन दिवस त्याचा शोध घेतलात. अखेर तो मंदिरात धर्मपंडितांमध्ये बसलेला तुम्हाला पुन्हा सापडला, तेव्हा तुम्हाला मोठा आनंद झाला.

या दुःखाच्या व या आनंदाच्या स्मरणार्थ, आम्ही तुम्हाला अंतःकरणापासून कळकळीची विनंती करतो: मरणकारक पापामुळे येशूला गमावण्याचे दुर्दैव आमच्यावर कधीही ओढवू देऊ नका. पण हे घोर दुर्दैव आमच्यावर ओढवलेच, तर येशू पुन्हा सापडेपर्यंत अखंड पश्चात्तापाने त्याचा शोध घेण्याची कृपा आम्हाला मिळवून द्या. विशेषतः मृत्यूच्या क्षणी, त्याची अपार दया आमच्यावर करण्यास तो तत्पर असलेला आम्हाला सापडो. अशा रीतीने आम्हाला स्वर्गात जाऊन त्याच्या सान्निध्याचा आनंद घेता येवो आणि तेथे तुमच्यासह त्याच्या दैवी दयेचे स्तवन आम्हाला सदासर्वकाळ गाता येवो.

हे आमच्या स्वर्गातील पित्या . . .
हे कृपापूर्ण मरिये, तुला नमन असो . . .
पित्याला, पुत्राला व पवित्र आत्म्याला गौरव असो . . . 

आपण प्रार्थना करूया.

हे देवा, तुझ्या अवर्णनीय दैवी व्यवस्थेनुसार तू धन्य योसेफांना आपल्या परमपवित्र मातेचे पती म्हणून निवडलेस. आम्ही तुला विनवतो: पृथ्वीवर आमचे रक्षणकर्ते म्हणून ज्यांचा आम्ही आदर करतो, त्यांनी स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी, असे वरदान आम्हाला दे. तू युगानुयुगे जिवंत आहेस आणि राज्य करतोस. 

आमेन.